चालू घडामोडी - १६ ऑक्टोबर २०१८

Date : 16 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्र सरकार ‘एम.फील’ आणि ‘पीएचडी’च्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत :
  • आता केंद्रीय विद्यापीठांमध्ये एम.फील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखत घेणाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. कारण मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) २०१६ च्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

  • ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, एम.फील आणि पीएचडीसाठीची किमान पात्रता आणि प्रक्रिया नियम २०१८ मध्ये केंद्र सरकार दुसऱ्यांदा सुधारणा करणार आहे. या नियमानुसार विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेत ७० टक्के तर उरलेले ३० टक्के गुण मुलाखतीतून मिळतील. सध्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेलाच विद्यार्थी केवळ मुलाखतीसाठी पात्र ठरतो.

  • त्यानंतर मुलाखतीनंतरच त्याला प्रवेश द्यायचा किंवा नाही हे निश्चित केले जाते. मात्र, नव्या सुधारणेनुसार ही पद्धत बंद होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या सुधारणेला मंजूरी दिली आहे. त्यानुसार याच आठवड्यात ही सुधारणा लागू केली जाईल. सर्व विद्यापीठांना लवकरच या सुधारणेबाबत सूचना देण्यात येणार आहेत, असे सुत्रांकडून कळते.

  • दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठासहीत सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये २०१७ मध्ये हा नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार, २०१६ च्या युजीसीच्या नियमावलीनुसार, एम.फील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुलाखतीत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक होते.

देशात ‘आयआयटी-मुंबई’ अव्वल :
  • नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला दुसरे आणि आयआयटी-मद्रासला तिसरे स्थान मिळाले आहे.

  • विशेष म्हणजे याच कंपनीने यापूर्वी केलेल्या जागतिक पाहणीत भारतात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला सर्वात चांगले मानांकन मिळाले होते.

  • या विरोधाभासावर स्पष्टीकरण देताना कंपनीच्या जनसंवाद विभागाच्या संचालिका सिमोना बिझोझिरो यांनी सांगितले की, जागतिक आणि भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांच्या मानांकनाठी वापरलेले निकष वेगवेगळे होते. त्यामुळे एकाच संस्थेचा जागतिक यादीत आणि भारतीय यादीत वेगळा क्रमांक लागला आहे.

  • जागतिक पातळीवर शिक्षणसंस्थांना मानांकन देताना संस्थेच्या शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी ४० टक्के गुण होते. तर भारतीय पातळीवर याच बाबीसाठी ३० टक्के गुण होते. भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन करताना शैक्षणिक लौकिकासाठी ३० टक्के, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या लेखी असणाऱ्या लौकिकासाठी २० टक्के, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तरासाठी २० टक्के, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये पीएचडीधारक कर्मचाऱ्यांच्या प्रमाणासाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार दर प्राध्यापक शोधनिबंधांसाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार प्रत्येक शोधनिबंधाच्या झालेल्या उल्लेखांसाठी ५ टक्के, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रमाणासाठी प्रत्येकी २.५ टक्के अशी गुण विभागणी केली होती.

सॅमसंग घेऊन येतोय डबल स्क्रीनचा स्मार्टफोन :
  • सॅमसंग कंपनी मागील काही दिवसांपासून नवनवीन मॉडेल सादर करुन आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. ड्युल सिम कार्डसारखेच आता मोबाईलला दोन स्क्रीन असणार आहेत. सॅमसंग कंपनी लवकरच आपला हा नवीन फोन लाँच करणार आहे. हा फ्लिप फोन असणार आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy W2019 असे आहे. या स्मार्टफोनची डिझाईन W2018 यासारखीच असणार आहे. यामध्ये ड्यूअल रियर कॅमराही असणार आहे.

  • W2018मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रैगन ८३५ प्रोसेसर होते, तर W2019मध्ये W2019 ८४५ प्रोसेसर असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. W2019 या सॅमसंगच्या फोनमध्ये ४.२ इंचाचे दोन फूल एचडी डिस्प्ले ( 1920 x 1080 पिक्सल) असणार आहेत. या फोनची बॅटरी तीन हजार वॅटची आहे. या स्मार्टफोनचे डाइमेंशन 132.9x63x2x17.3(mm) आहे.

  • सॅमसंगचा W2018 हा नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या फोनच्या खासियतबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, हा फोन टॅबलेटप्रमाणे काम करणार आहे.

  • सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोनची निर्मीती करत बाजारात नवीन पर्याय उपलब्ध केला आहे. महत्वाचे म्हणजे सध्या हे फक्त प्रायोगिक तत्वावर करण्यात आले आहे. जर सॅमसंगच्या दोन्ही फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या दोन्ही फोनची अपडेट व्हर्जन बाजारात येण्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन, अॅलन यांची संपत्ती :
  • मुंबई: जगातील बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. 70 च्या दशकात बिल गेट्स यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टचा पाया घातला होता. कॅन्सरने त्रस्त असलेल्या पॉल यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

  •  पॉल यांनी दोन आठवड्यापूर्वीच आपल्याला कॅन्सरने घेरल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. 9 वर्षांपूर्वीही त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र कॅन्सरने पुन्हा उभारी घेतल्याने पॉल यांची प्रकृती बिघडली होती.

  • दरम्यान, पॉल अॅलन यांच्या निधनामुळे मायक्रोसॉफ्टने आपला शोकसंदेश जारी केला. “पॉल यांनी आमची कंपनी, इंडस्ट्री आणि समाजासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे” असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

  • मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ सत्या नडेला यांनीही शोक व्यक्त करताना, पॉल यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक म्हणून केलेलं काम मोठं आहे. त्यांनी नवनवे प्रोडक्ट आणले, त्यांच्या अनुभवाने संस्था मोठी झाली, त्याचवेळी त्यांनी जगालाही बदललं, असं म्हटलं.

मोदींच्या परदेश दौऱ्यांवर खर्च झालेल्या १४७४ कोटींमधून देशाला काय फायदा झाला :
  • राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांच्या परदेश दौऱ्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचे शतक पूर्ण होत असून यामधून काय साधले असा सवाल राष्ट्रवादीने पंतप्रधानांना विचारला आहे.

  • ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ म्हणत मागील दीड महिन्यापासून राष्ट्रवादीकडून राज्य आणि केंद्र सरकारला #जवाबदो हॅशटॅग वापरून रोज एक प्रश्न विचारला जात आहे. आजचा ४२वा प्रश्न उपस्थित करताना राष्ट्रवादीने मोदींच्या परदेश दौऱ्यावर काही हजार कोटी खर्च झाला मात्र त्यातून देशाला काय फायदा झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये, “पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर जवळजवळ एक हजार ४७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

  • आता विदेश दौऱ्यांचे शतकही पूर्ण होईल. या विदेश दौऱ्यांमुळे देशाला नक्की काय फायदा झाला आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करण्यात आले आहे. तसेच या ट्विटबरोबर एक व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी परदेश दौऱ्यांचे शक्तीशाली आवरण परिधान केल्याचे दाखवण्यात आले असून हातात मात्र परदेश दौऱ्यांचे अपयश दाखवण्यात आले आहे. एका पोडियम समोर पंतप्रधान मोदी भाषण देताना दाखवण्यात आले असून ते १४७४ कोटी रुपये आणि दौऱ्यांचे शतकावर उभे असल्याचे व्यंगचित्रात दिसत आहे.

  • पंतप्रधान मोदींने मागील चार वर्षांमध्ये ८६ देशांना भेट दिली आहे. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी जुलै महिन्यामध्ये त्यांनी रेवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने मोदींच्या परदेश दौऱ्यांवर चार वर्षांमध्ये एक हजार ४७४ कोटी रुपये खर्च करण्यात आला.

  • मोदींच्या आधी पंतप्रधान पदावर असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा आकडा मोदींच्या चार वर्षाच्या कार्यकाळातील खर्चाच्या अर्ध्याहूनही कमी आहे. पुढील महिन्यामध्ये जी-२० परिषदेसाठी मोदी अर्जेंटिनाला रवाना होणार आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन / जागतिक अन्न दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

  • १९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

  • १९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

  • १९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

  • १९७८: माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.

  • १९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • १९८६: ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शिखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.

  • १९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

जन्म 

  • १८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)

  • १८८६: इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन  यांचा जन्म.

  • १८९०: वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

  • १८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून१९७४)

  • १९०७: कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८२)

  • १९२६: केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.

  • २००३: नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)

  • १९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

  • १९५०: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.

  • १९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म: १ ऑक्टोबर १८९५)

  • १९८१: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचे निधन. (जन्म: २० मे १९१५)

  • २००२: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२३)

  • २०१३: भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.