चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ सप्टेंबर २०१९

Date : 16 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तेल टंचाईचे सावट - सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन थांबवलं :
  • इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांना ड्रोनने निशाना केलं. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

  • जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या अरामको कंपनीच्या दोन क्षेत्र बॉम्ब वर्षावाने हादरली. शनिवारी इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस या दोन ठिकाणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोनमधून हल्ले केले. या हल्ल्यानंतर दोन्ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी नियंत्रित क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, अरामकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • सौदी सरकारच्या या निर्णयामुळे जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला ९.८५ मिलियन बॅरल होते.

  • अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. “हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी होणार आहे”, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी दिली आहे.

भारताबरोबर युद्ध झाल्यास पाकिस्तानच्या पराभवाची शक्यता – इम्रान खान :
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा अणवस्र हल्ल्याची भाषा केली आहे. मात्र याबरोबरच त्यांनी हे देखील मान्य केले की, पाकिस्तानचे जर भारताबरोबर पारंपारिक युद्ध झाले तर यात पाकिस्तानला पराभवास सामोरे जावे लागेल. शिवाय या सर्वांचे परिणाम भयानक असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

  • काश्मीर मुद्यावरून भारताला अणवस्र हल्ल्याची धमकी दिल्याबद्दल अल जजीरा या वृत्तवाहिनीकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान बोलत होते.

  • यावेळी इम्रान खान यांनी हे देखील सांगितले की, या युद्धात पराभवाच्या छायेत असलेल्या देशाकडे केवळ दोनच पर्याय असतील ते म्हणजे एकतर त्याने आत्मसमर्पण करावे अन्यथा शेवट्च्या क्षणापर्यंत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहवे. अशावेळी पाकिस्तान शेवटपर्यंत लढेल आणि हेच कारण आहे की, जेव्हा एखादा अणवस्रधारी देश शेवटच्या क्षणापर्यंत लढतो तेव्हा परिणाम भयावह असतात.

  • म्हणूनच आम्ही संयुक्त राष्ट्राशी संपर्क साधला आहे व प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघनटेशी संपर्क साधत आहोत, जेणेकरून त्यांनी आता तरी या मुद्यावर पावलं उचलाचला हवीत. काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्यात आल्याबद्दल बोलताना इम्रान खान यांनी, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला असल्याचा आरोप केला.

उत्तर प्रदेश, हरयाणातही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची चाचपणी :
  • ‘आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मोहीम राबविण्याचा निर्णय महत्त्वाचा आणि धाडसी होता. गरज भासल्यास उत्तर प्रदेशातही ही मोहीम राबविण्यात येईल’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हरयाणातही या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी दिले.

  • योगी आदित्यनाथ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना राज्य सरकारच्या कामगिरीबरोबरच अयोध्या खटला,  राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आदी मुद्यांवर भाष्य केले. आसाममध्ये या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करायला हवे. उत्तर प्रदेशमध्येही गरज भासल्यास ही मोहीम राबविण्यात येईल. आसामच्या अनुभवाद्वारे उत्तर प्रदेशातही ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवता येईल, असे आदित्यनाथ म्हणाले.

  • हरयाणामध्येही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री खट्टर यांनी दिले. हरयाणात विधानसभा निवडणुका होणार असून महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने खट्टर यांनी न्या. एच. एस. भल्ला (निवृत्त), माजी नौदल प्रमुख सुनील लांबा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे समर्थन केले. हरयाणात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम राबवण्याबाबत आपण भल्ला यांचा सल्ला मागितला आहे, असे खट्टर म्हणाले.

इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी मात, १९७२ नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित :
  • लंडन : केनिंग्टन ओव्हलवरच्या पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात करुन मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडेच अॅशेसचा मान कायम राहिला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं.

  • पण स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीचच्या भेदक आक्रमणामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांत आटोपला. ब्रॉड आणि लीचने प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर ज्यो रुटने दोन विकेट्स घेतल्या. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडमध्ये 18 वर्षांनंतर अॅशेस मालिका जिंकण्याचं स्वप्नं अधुरं राहिलं.

  • इंग्लंड - 294 (पहिला डाव) आणि 329 (दुसरा डाव)

  • ऑस्ट्रेलिया - 225 (पहिला डाव) आणि 263 (दुसरा डाव)

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय ओझोन दिन.

महत्वाच्या घटना 

  • १९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

  • १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.

  • १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

  • १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

  • १९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

  • १९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

  • १९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १३८६: इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)

  • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

  • १८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)

  • १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)

  • १९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)

  • १९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

  • १९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)

  • १९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.

  • १९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६)

  • १८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

  • १९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)

  • १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)

  • १९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८६)

  • १९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.

  • १९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)

  • १९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

  • २०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.