चालू घडामोडी - १६ ऑगस्ट २०१८

Date : 16 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन :
  • मुंबई भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या  77 व्या वर्षी वाडेकरांनी अखेरचा श्वास घेतला.

  • अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.

  • अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. वाडेकरांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) मुंबईत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे भाऊ अशोक वाडेकर यांनी दिली. अजित वाडेकर यांची दोन्ही मुलं सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ती परतल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  • अजित वाडेकर यांचा अल्पपरिचय : अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 रोजी मुंबईत झाला. आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन, इंजिनिअर व्हावं, अशी अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं.

इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान :
  • नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवी मजल गाठत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती अध्यक्ष के. सिवान यांनी बुधवारी येथे दिली. गगनयान मोहिमेंतर्गत चार वर्षांत अवकाशात मानव पाठविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • मानव क्रू मोड्यूल व पर्यावरण नियंत्रण तसेच जीवनरक्षक प्रणालीसारखे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. इस्रोने २०२२मध्ये प्रक्षेपणापूर्र्वी दोन मानवरहित मिशनची व एक यान पाठविण्याची तयारी केली आहे. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क-३च्या आधारे हे यान अवकाशात सोडले जाईल.

  • २०२२मध्ये अंतराळवीर अवकाशात तिरंगा फडकावतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात केल्यानंतर काही वेळात सिवान यांनी मोहिमेची माहिती दिली. अंतराळात मानव पाठविण्याची मोहीम फत्ते केल्यास अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरेल. वायुदलाचे माजी वैमानिक राकेश शर्मा हे अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले होते. ते तत्कालीन सोव्हियत युनियनच्या सोयूझ टी-११ मोहिमेत सहभागी झाले होते.

  • २ एप्रिल १९८४ला सोयूझ यानाचे प्रक्षेपण झाले होते. यापूर्वी कल्पना चावला आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनीही अंतराळप्रवास केला होता. अमेरिकेचे कोलंबिया यान पृथ्वीच्या वातावरणात परतताना नष्ट झाले होते. त्यात कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

६० वर्षांपूर्वी चोरलेली बुद्धांची मूर्ती ब्रिटनकडून भारताला परत :
  • लंडन : ब्रिटनने भारताला 72 व्या स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट दिली. बिहारच्या नालंदामधील संग्रहालयातून 60 वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली गौतम बुद्धांची मूर्ती देशाला परत करण्यात आली. लंडन मेट्रोपोलिटन पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात बाराव्या शतकातील ही कांस्य मूर्ती परत केली.

  • नालंदामध्ये असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थानाच्या संग्रहालयातून 1961 साली 14 मूर्ती चोरण्यात आल्या होत्या. त्यापैकी ही एक मूर्ती आहे. चांदीचा मुलामा जडवण्यात आलेली ही कांस्याची मूर्ती बाराव्या शतकात तयार करण्यात आली होती.

  • लंडनमध्ये ही मूर्ती लिलावात निघाली, तेव्हा ही तीच चोरलेली मूर्ती असल्याचं समोर आली. त्यामुळे मूर्तीच्या डीलर आणि मालकाला याविषयी माहिती देण्यात आली. अखेर त्यांनी कला आणि पुरातत्व विभागाशी सहकार्य करुन मूर्ती भारताला परत करण्याची तयारी दाखवली. मात्र सहा दशकांच्या कालावधीत ती मूर्ती कित्येक जणांनी हाताळली असेल, असा कयास वर्तवला जात आहे.

  • इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यदिनी स्कॉटलंड यार्डाने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ब्रिटनमधील भारतीय राजदूत वाय. के. सिन्हा यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. 'अनमोल बुद्धा'ची मूर्ती परत करुन ब्रिटनने चांगलं पाऊल उचलल्याची भावना सिन्हांनी व्यक्त केली.

केवळ भारतचं नव्हे तर या देशातही १५ ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन :
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आजच्याच दिवशी फक्त भारतच नाही तर, जगातील आणखी तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं. 

  • भारताव्यतिरिक्त ज्या तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, बहरिन आणि कांगो या देशांचा समावेश आहे. 

  • खरं तर आपल्या देशाला ब्रिटीश 1947 रोजी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1948 रोजी स्वतंत्र करणार होते. पण महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटिशांनी एक वर्षाआगोदर 15 ऑगस्ट 1947रोजीच स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. 

  • जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1910 ते 1945 पर्यंत कोरिया जापानच्या गुलामगिरीत होता. आज आपण ज्या देशांना दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून ओळखतो, ते आधी एकत्र होते. त्यानंतर 1948मध्ये त्यांना दोन देशांमध्ये वेगळं करण्यात आलं.

  • 15 ऑगस्ट 1971पर्यंत मुळचा अरबांचा देश असलेला बहरिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. सध्याची बहरिनची राजधानी मनामा आहे. 15 ऑगस्ट 1960रोजी कांगो फ्रांसपासून वेगळा झाला. कांगो जवळपास 80 वर्षांपर्यंत फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. 

ड्रॅगनच्या 'बड्या घरचा, पोकळ वासा'; शहरांवर कर्जाचे डोंगर :
  • बिजिंग : भारताला नेहमी आव्हाने देत असणारा चीन जगातील अनेक देशांमध्ये आपला व्यापार वाढविण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानसह आशिया खंडातील इतर देशांना पैशांची खिरापत वाट असला तरीही चीनमधील अनेक शहरांमध्ये पैसे नसल्याने विकासकामे ठप्प झालेली आहेत. हुनान प्रांताच्या चांगदी येथील शहरांची अवस्था बिकट बनली आहे. 

  •  साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीनमध्ये आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर उभे ठाकले असून यामुळे बरेच सरकारी प्रकल्प ठप्प झाले आहेत. काही काळापूर्वी चांगदीमध्ये रस्त्यांचे निर्माण वेगात करण्यात आले. मात्र, आता या कामांची स्थिती खूप मंदावली आहे.

  • चांगदी हे एकमेव शहर आर्थिक समस्यांमध्ये गुरफटलेले नसून अन्य शहरेही यात आहेत. या शहरांच्या प्रशासनांना स्टेट बँकिंग व्यवस्थेकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटली गेली. या पैशांतून या स्थानिक प्रशासनांनी पायाभूत सुविधांवर मोठा खर्च केला. मात्र, हे कर्ज फेडण्यास ही शहरे असमर्थ बनली आहेत.

  • कर्जाच्या पैशातून रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वे, गगनचुंबी इमारती आणि खेळांची अद्ययावत मैदाने यांच्यावर मोठा खर्च करण्यात आला. यामुळे मागील दशकात चीनचा विकास वेगाने झाला खरा मात्र, हे केल्यामुळे बिजिंगवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. 2017 मध्ये चीनच्या विकास दराच्या तब्बल 256 टक्के कर्ज वाढले होते. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

  • १९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

  • १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.

  • १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.

  • १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.

  • २०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

जन्म

  • १८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)

  • १९०४: हिंदी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)

  • १९१३: इस्त्रायलचे ६वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९२)

  • १९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.

  • १९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.

  • १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.

  • १९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

  • १९५८: अमेरिकन गायिका मॅडोना यांचा जन्म.

  • १९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

  • १९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.

  • १९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.

मृत्यू

  • १७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

  • १८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

  • १८८८: कोका-कोलाचे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३१)

  • १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८७०)

  • १९७७: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९३५)

  • १९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.

  • १९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)

  • २०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ – नवी दिल्ली)

  • २००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.

  • २०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.