चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ एप्रिल २०१९

Date : 17 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दी न्यूयॉर्क टाइम्स, दी वॉल स्ट्रीट जर्नल यांना पुलित्झर पुरस्कार :
  • अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.

  • न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

  • ट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी २०१८ मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये अग्यारीतील गोळीबारात ११ जण ठार झाले होते त्याच्या वार्ताकनासाठी पिटसबर्ग पोस्ट गॅझेटला ब्रेकिंग न्यूज गटात गौरवण्यात आले आहे.

  • असोसिएटेड प्रेसला येमेन युद्धाच्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार मिळाला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी वार्ताकनासाठी रॉयटर्सला आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार जाहीर झाला आहे. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी गटात मध्य अमेरिकेतून अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या छायाचित्रांसाठी रॉयटर्सला पुरस्कार मिळाला आहे. कथा विभागात रिचर्ड पॉवर्स यांनी दी ओव्हरस्टोरी कथेसाठी तर नाटक  गटात जॅकी सिब्लिस ड्ररी यांनी पुरस्कार पटकावले आहेत. इतिहासाचा पुलित्झर पुरस्कार फ्रेड्रिक डग्लस- प्रॉफेट ऑफ फ्रीडम या डेव्हीड ब्लाइट यांच्या पुस्तकास मिळाला आहे. तर जीवनचरित्र गटात तो जेफ्री स्टेवर्ट यांना दी न्यू नेग्रो- दी लाइफ ऑफ अलेन लॉकी या पुस्तकासाठी जीवनचरित्र पुरस्कार मिळाला आहे.

वेल्लोरची निवडणूक रद्द :
  • निवडणुकीत मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी कठोर पाऊल उचलले असून तामिळनाडूतील वेल्लोर येथे गुरुवारी १८ एप्रिलला होणारी निवडणूकच रद्द केली आहे. गेल्या दोन आठवडय़ांत द्रमुकच्या नेत्यांकडून हस्तगत झालेल्या बेहिशेबी रकमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • याप्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी निवडणूक आयोगाने २०१७मध्ये तामिळनाडूतील राधाकृष्णनगर येथील विधानसभा निवडणूक दोनदा रद्द केली होती. तसेच अण्णाद्रमुकशी संबंधित नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड होताच अरवकुडुची आणि तंजावर येथील निवडणूक पुढे ढकलली होती. २०१२मध्ये झारखंडमधील राज्यसभेच्या दोन जागांची निवडणूकही धनप्रभाव रोखण्याच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती.

  • द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे कोषाध्यक्ष दुराइमुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर येथील पक्षाचे उमेदवार काथिर आनंद यांच्या घरातून २९ मार्चला साडेदहा लाखांची बेहिशेबी रोकड हस्तगत झाली होती. तसेच १ एप्रिलला दुराईमुरुगन यांच्या निकटच्या एका व्यक्तीच्या सिमेंट गोदामातून ११ कोटी ५३ लाख रुपये हस्तगत झाले होते. ही रोकड दुराईमुरुगन यांच्या महाविद्यालयातून या गोदामात हलवण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींनी त्यानुसार वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केली आहे.

  • प्राप्तिकर खात्याने आनंद यांच्या घरावर आणि सिमेंट गोदामावर टाकलेल्या छाप्यानंतर आनंद यांच्यासह गोदामाचा मालक पी. श्रीनिवासन आणि अन्य एक सहकारी दामोदरन या तिघांविरोधात प्राथमिक तक्रारही नोंदवली आहे. दुराईमुरुगन यांनी मात्र प्राप्तिकर विभागाचे छापे हा कट असल्याचा आरोप केला आहे. वेल्लोरमध्ये अण्णाद्रमुक आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात द्रमुकतर्फे आनंद हे उभे होते. ही जागा द्रमुक जिंकण्याची जोरदार चर्चा होती.

टिक-टॉक अ‍ॅपवर केंद्र सरकारची बंदी :
  • नवी दिल्ली : सोशल मीडियात प्रचंड क्रेझ असणाऱ्या टिक-टॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्र सरकारने गुगलला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप काढण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर लोकांना टिकटॉक अ‍ॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अ‍ॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येईल.

  • सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा आदेश काढला. टिकटॉक अ‍ॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

  • मात्र काही जण या अ‍ॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अ‍ॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिकटॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिर्डी रामनवमी उत्सव काळात साईंच्या चरणी कोट्यवधींच दान :
  • शिर्डी : शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सव काळात आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी भरभरुन दान दिलं आहे. रामनवमी उत्सवाच्या चार दिवसात साई भक्तांनी एकूण चार कोटी 16 लाखांची देणगी साईचरणी अर्पण केली आहे. 12 ते 15 एप्रिल दरम्यान झालेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली.

  • शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येतो. या उत्सव काळात लाखो भाविक देशभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. यावर्षीही लाखो भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावली. शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीमध्ये भाविकांनी 1 कोटी 92 लाख दान केलं. तर डोनेशन काउंटरवर 98 लाख , क्रेडिड कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 11 लाख रुपये जमा झाले.

  • तर 7 लाख 61 हजारांचे सोने, 1लाख 11 हजाराची चांदी आणि 14 देशांचे पाच लाखांचे चलन असे एकंदरीत 4 कोटी 16 लाख रुपयांची देणगी साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. रामनवमी उत्सव काळाता साईसंस्थानने आलेल्या भक्तांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप, भोजन व्यवस्था, निवासव्यवस्था यासह सुरक्षेची विशेष काळजी घेत उत्सवाचे योग्य नियोजन केले होते.

प्रियांका गांधी निवडणूक लढवणार नाहीत, काँग्रेसच्या सूत्रांची माहिती :
  • नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणूक लढणार की नाही? लढणार तर कुठून लढणार? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे. प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील, असेही अंदाज बांधले जात होते. मात्र प्रियांका गांधी निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  • प्रियांका गांधी यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी बनवण्यात आलं आहे. त्यानंतर प्रियांका गांधींनी निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती. वाराणसीत तर प्रियांका गांधी यांनी स्वत: कार्यकर्त्यांना मी निवडणूक लढावी की नाही? असा प्रश्न विचारला होता.

  • त्यानंतर कार्यकर्त्यांना प्रियांका गांधी यांना 'गंगा की बेटी' म्हणत वाराणसीतून निवडणूक लढण्याचं आवाहन केलं होतं. मात्र प्रियांका गांधी यांच्याकडून याबाबत काही स्पष्ट उत्तर मिळालं नाही.

  • प्रियांका गांधी मोदींना काटे की टक्कर देऊ शकतात - पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांचं नावाची येथून चर्चा आहे. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, वाराणसीत प्रियंका गांधी नरेंद्र मोदींना काटे की टक्कर देऊ शकतात. त्यामुळे प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार अशी रंगली आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील 'त्या' संपत्तीचं गूढ काय - काँग्रेसचा सवाल :

  • नवी दिल्ली : निवडणुकीची रणधुमाळी ऐन भरात असतानाच आज काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधल्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधीनगरमध्ये मोदींच्या नावावर असलेल्या एका प्लॉटची मालकी, त्याचा नंबर याबाबतची खोटी माहिती दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेच्या आधारे काँग्रेसनं हा आरोप केला आहे.

  • पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधल्या प्राँपर्टीचं रहस्य काय? मोदींच्या शपथपत्रात त्याबदद्ल उलटसुलट माहिती का सांगितली जाते? हे प्रश्न आज काँग्रेसनं उपस्थित केले. सुप्रीम कोर्टात मोदींनी त्यांच्या शपथपत्रात संपत्तीची माहिती दडवल्याबाबत याचिका दाखल झाली आहे. त्यावरुन काँग्रेसनं मोदींवर हे थेट आरोप केले आहेत.

  • गांधीनगरमधील प्राईम लोकेशनचा 411 हा प्लॉट आपल्या नावावर असल्याचं मोदींनी 2007 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात म्हटलं होतं. 326 चौरस मीटरचा हा प्लॉट ज्याची खरेदी किंमत तेव्हा 1. कोटी 30 लाख सांगितली होती. आज बाजारभावानं त्याची किंमत 1 कोटी 18 लाख आहे.

  • पण 2012, 2014 नंतरच्या निवडणुकांमध्ये मात्र या प्लॉटबद्दलची माहिती शपथपत्रात देताना अनेक बदल करण्यात आले आहेत. एक तर या प्लॉटचा नंबर 411 ऐवजी 401 ए करण्यात आला, मोदी त्याचे पूर्ण मालक नव्हेत तर एक चतुर्थांशच मालक असल्याचं सांगितलं गेलं.

  • महत्त्वाची बाब म्हणजे 401 नावाचा हा प्लॉट अरुण जेटलींनीही त्यांच्या नावावर असल्याचं शपथपत्रात सांगितलं आहे. गुजरातमधील लँड रेकॉर्डनुसार 401 अ असा कुठला प्लॉट नोंद नसल्याचंही काँग्रेसचं म्हणणं आहे. तसेच शपथपत्रात अशी संपत्तीची माहिती मोदी का दडवत आहेत, असा काँग्रेसचा सवाल आहे.

  • माजी पत्रकार साकेत गोखले यांनी सुप्रीम कोर्टात मोदींच्या संपत्तीबाबत ही याचिका दाखल केली. काही पत्रकार या संपत्तीची माहिती काढायला गेले असता, त्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळेच इतकी गुप्तता का पाळली जातेय असा सवाल काँग्रेस उपस्थित केला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४६: सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

  • १९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

  • १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

  • १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.

  • १९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

  • २००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जन्म 

  • १४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

  • १८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)

  • १८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

  • १८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

  • १८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

  • १९१६: जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)

  • १९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९०: अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १७०६)

  • १८८२: फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)

  • १९४६: भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)

  • १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)

  • १९९७: ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१६)

  • १९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.

  • २००१: वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)

  • २०११: विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९२६)

  • २०१२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: १७ जुन १ ९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.