चालू घडामोडी - १७ ऑगस्ट २०१८

Date : 17 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अटलअस्त! वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार :
  • नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातला भीष्म पितामह हरपला आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

  • काल संध्याकाळी अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

  • आज सकाळी 9 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता राष्ट्रीय स्मृतीथळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाजपेयी यांच्या निधनामुळं देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

  • अटलजींच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फुलांनी सजवलेला रथ सज्ज करण्यात आलाय. दिल्लीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्ग बदलण्यात आले आहेत.

इटलीमध्ये का लावली १२ महिन्यांची आणीबाणी :
  • जिनिव्हा : इटलीतील जिनिव्हा येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल कोसळून 39 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कान्टे यांनी बुधवारपासून 12 महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. तसेच या घटनेची चौकशी आणि बचाव कार्यासाठी 40 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

  • मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेमध्ये मोरांदी पूल कोसळल्याने 35 कार व काही ट्रक 150 फूट खाली पडल्या होत्या. यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुलाच्या मलब्याखाली बरेचजण दबले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य बुधवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. रेल्वे मार्गावर हा पूल पडल्याने रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे. 

  • दरम्यान, या पुलाची देखरेख करणारी कंपनी ऑटोस्ट्रेडवर कारवाई करण्यात येणार असून या कंपनीची मान्यता काढून घेण्यात येणार असल्याचे कान्टे यांनी सांगितले. 

  • १९६७ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ९० मीटर उंच आणि १ किलोमीटर लांबीचा हा पूल फ्रान्सच्या दिशेने जाणाऱ्या १०, तर उत्तर मिलानच्या दिशेने जाणाऱ्या सात मुख्य मार्गांना जोडतो.

गुजराती 'मल्ल्या'ला दुबईतून अटक; वाचा किती कोटींचा केला बँक घोटाळा...
  • नवी दिल्ली : भारतात हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे 31 उद्योगपती परदेशात फुर्रर झाले आहेत. गुजरातच्याबडोद्यातील अशाच एका औषध कंपनीच्या मालकाला तब्बल 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्या प्रकरणात दुबईत अटक करण्यात आली आहे. 

  • नितीन संदेसरा असे या ठगाचे नाव असून त्याने व त्याचा भाऊ चेतन याने आंध्रा बँकेद्वारा चालविण्यात येत असलेल्या बँकांच्या समुहाला 5 हजार कोटींचा चुना लावला आहे. नितीन याच्या अटकेमुळे या घोटाळ्याशी असलेले राजकीय संबंधही उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

  • नितीन याच्याविरोधात उच्च न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढला होता. या आधारावर दुबईच्या पोलिसांनी त्याला अटक केली. दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

  • नितीन संदेसरा हा बँकांना चुना लावून परदेशात पलायन केलेल्या 31 उद्योगपतींपैकी एक आहेत. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वीच दोन्ही भाऊ आपल्या परिवारांसह गेल्या वर्षीच देश सोडून पळाले होते. इडीदेखील या दोघांच्या मागावर होती. तसेच त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती.

दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद :
  • नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतलेअनेक रस्ते आज बंद राहणार आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड आणि पंजाबमध्ये शुक्रवारी सरकारी कार्यालयं आणि स्कूल-कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.

  • उत्तर प्रदेश सरकारनं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये आज सरकारी कार्यालयं, स्कूल आणि कॉलेज बंद राहणार आहेत. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 8 आठवड्यांहून अधिक काळ त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही टि्वटरवरून दुःख व्यक्त केलं आहे.

  • दिल्ली सरकारमधील सर्व कार्यालयं, शाळा-कॉलेज आणि इतर संस्था अटलजींच्या निधनाच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार आहेत, अशीही माहिती सिसोदिया यांनी दिली. योगी सरकारनं वाजपेयींच्या निधनावर राज्यात सात दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. यादरम्यान सर्व सरकारी भवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली आणण्यात आला.

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार :
  • मुंबई : भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  • मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात बुधवारी (15 ऑगस्ट) रात्री अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधनझालं. वाडेकर 77 वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे.

  • वरळीतील राहत्या घरी आज अजित वाडेकरांचं पार्थिव सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित वाडेकर यांची दोन्ही मुलं परदेशात असल्यामुळे त्यांचे अंत्यविधी आज करण्यात येणार आहेत.

  • अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

  • १८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

  • १९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

  • १९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

  • २००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

जन्म

  • १७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)

  • १८४४: इथियोपियाचे सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.

  • १८६६: हैदराबादचे सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

  • १८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.

  • १८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

  • १९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

  • १९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

  • १९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.

  • १९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.

  • १९४४: ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.

  • १९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.

  • १८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

  • १९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

  • १९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

  • १९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.