चालू घडामोडी - १७ फेब्रुवारी २०१८

Date : 17 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चांद्रयान-२ चे एप्रिलमध्ये प्रक्षेपण :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान-२ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे प्रणुख जितेंद्र सिंग यांनी शुक्रवारी दिली.

  • भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून त्याला ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.

  • चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा सोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान योग्य कालावधी आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल, असे सिवन म्हणाले.

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे खूप कठीण काम आहे. त्या भागात लाखो वर्षांपूर्वी तयार झालेले खडक आहेत. त्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.(source :loksatta)

अमेझॉनला रोखण्यासाठी वॉलमार्ट फ्लिपकार्टला विकत घेणार :
  • मुंबई : भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात अमेझॉनची पकड घट्ट होत चालली आहे. त्यामुळेच 'वॉलमार्ट' या अमेरिकन रिटेलर कंपनीने भारतीय बाजारपेठेत हातपाय पसरण्याचा चंग बांधला आहे. वॉलमार्टनं फ्लिपकार्ट कंपनीमधील 40 टक्के शेअर्स खरेदी करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.

  • फ्लिपकार्ट कंपनीची किंमत यापूर्वी 12 अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आली होती. मात्र जपानच्या सॉफ्ट बँक व्हिजन फंड कंपनीनं फ्लिपकार्टमधील 2.5 अब्ज डॉलर्स किमतीचे 20 टक्के शेअर्स खरेदी करण्याची तयारी दाखवली होती.

  • ई-कॉमर्स क्षेत्रातील अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास अमेरिकेप्रमाणे भारतातही अमेझॉन विरुद्ध वॉलमार्ट हा सामना रंगेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील रिटेल क्षेत्रावर वॉलमार्टची नजर आहे. फ्लिपकार्टचं मिंत्रा, जबाँग, ईबे इंडिया, फोनपे ताब्यात घेण्यासाठी वॉलमार्टचे प्रयत्न आहेत.

  • वॉलमार्ट-फ्लिपकार्टमधील व्यवहार अद्याप प्राथमिक पातळीवर आहे. दोन्ही कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.(source :abpmajha)

शतकी खेळीसह विराटने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला :
  • सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली.

  • विराट कोहली वन डे इतिहासात पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा केल्या. या अगोदर हा विक्रम टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर होता. विराटने या सहा सामन्यांमध्ये 558 धावा केल्या.

  • रोहित शर्माने 2013-14 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 491 धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने मोडित काढला. विराटने डर्बनमध्ये नाबाद 112, केपटाऊनमधील तिसऱ्या सामन्यात नाबाद 160 आणि सहाव्या सामन्यातही नाबाद 129 धावांची खेळी केली. तर पोर्ट एलिझाबेथमधील वन डेत अर्धशतकी खेळी केली होती.

  • याशिवाय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये 9500 धावाही पूर्ण केल्या.

साहित्य संमेलनाला पुढच्या वर्षी 50 लाखांचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा :
  • बडोदा : पुढच्या संमेलनापासून साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान 50 लाख रुपये करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते बडोद्यात आयोजित 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.

  • "मराठी भाषा आणि साहित्य सदैवच कालसुसंगत राहिले आहे. एक प्रमुख भाषा म्हणून मराठीकडे जगभर पाहिजे जाते. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तिला ज्ञानभाषा म्हणून पुढे आणण्यासाठी आजच्या डिजिटल युगाशी सुसंगत मराठीचा वापर ही काळाची गरज आहे.", असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  • मराठीच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना भेटणार - मुख्यमंत्री - "मराठीची ताकद मोठी आहे. कुठलेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता मराठी भाषेत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करीत आहे. सर्व साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन आपण लवकरच मा. पंतप्रधान महोदयांना भेटण्यासाठी जाऊ.", असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरुन दिले.

  • महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत होत असलेल्या या संमेलनाला अनेक साहित्यिक, साहित्यरसिक उपस्थित आहेत. शुक्रवारी दुपारी बडोद्यात संमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.(source :abpmajha)

जर्मनीत सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याच्या हालचाली :
  • नवी दिल्ली : जर्मनीत एका अतिमहत्त्वकांक्षी योजनेवर काम सुरु आहे. ज्यानुसार सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचं नियोजन आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी या योजनेवर काम सुरु आहे. लक्झरियस कार बनवणाऱ्या या देशाने जगभराला विचार करण्यास भाग पाडलं आहे, की प्रदूषण रोखण्यासाठी हाही एक पर्याय होऊ शकतो का?

  • एका मोठ्या घोटाळ्यानंतर या योजनेवर काम सुरु करण्यात आलं आहे, ज्यामध्ये जर्मनीची प्रसिद्ध कार कंपनी वोक्सवॅगनचं नाव आलं होतं. वायू प्रदूषणासंदर्भातील हा घोटाळा होता. या कंपनीने आपल्या कंपनीच्या कारपासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी देशाला आणि जगाला चुकीची माहिती दिली होती. ज्यानंतर कार परत मागवण्यात आल्या आणि कंपनीला जगभरात मोठ्या विरोधाचाही सामना करावा लागला.

  • जर्मनीच्या पर्यावरण मंत्री बारबरा हेंड्रिक्स यांनी अन्य दोन मंत्र्यांसोबत याबाबत माहिती दिली. ''आम्ही सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा विचार करत आहोत, ज्यामुळे कार वापरणाऱ्यांची संख्या कमी होईल. यासाठी युरोपियन युनियनचे आयुक्त कार्मेन्यू वेल्ला यांना पत्रही लिहिण्यात आलं आहे,'' अशी माहिती हेंड्रिक्स यांनी दिली. वायू प्रदूषणाचा सामना करणं ही जर्मनीची सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • या वर्षाअखेर ही योजना जर्मनीतील पाच मोठ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केली जाईल. जर्मनीच्या चान्सलर यांचं हे अंतरिम सरकार आहे आणि युतीच्या सरकारची अंतिम रचना कशी असेल, हे अद्याप अस्पष्ट असल्याने जर्मनीसाठी हा निर्णय घेणं अवघड आहे. त्यामुळे औद्योगिक विश्वात आपली छाप सोडणाऱ्या जर्मनीत या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(source :abpmajha)

रेल्वे डब्यांवर आरक्षित आसनांचा तक्ता चिटकवणं होणार बंद, प्लॅटफॉर्मवर बसविणार डिजिटल स्क्रीन :
  • नवी दिल्ली- रेल्वे प्रवासासाठी रिजर्व्हेशन केल्यानंतर प्रवासाच्या आधी एक्स्प्रेस ट्रेनवर आसनांचा तक्ता चिकटवला जातो. प्रवास करण्याच्या आधी ट्रेन स्थानकावर आल्यानंतर आधी तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना ट्रेनवर लावलेला तो तक्ता पाहावा लागतो.

  • पण आता रेल्वे डब्यांवर आरक्षित आसनांचा तक्ता चिकटवणं बंद होणार आहे. त्याऐवजी रेल्वे स्थानकातील ज्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार असेल त्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल डिस्प्लेद्वारे हा तक्ता प्रसिद्ध केला जाणार आहे. रेल्वे स्टेशनवर लावलेल्या प्लाझ्मा स्क्रीनवरील यादीत प्रवाशांना त्यांचं नाव पाहता येणार आहे. 

  • रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी ही प्रायोगिक योजना असून सुरुवातीला ती सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. येत्या १ मार्च २०१८ या तारखेपासून हा नवा बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने आपल्या संबंधीत विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत. देशभरातील A1, A आणि B दर्जाच्या रेल्वेस्थानकांवरच हा प्रयोग केला जाणार आहे.

  • रेल्वेच्या माहितीनुसार या तीन श्रेणीच्या एकुण स्थानकांची संख्या जवळपास 400 आहे. यामध्ये दिल्लीतील सहापेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा सहभाग आहे.  रेल्वेकडून याधी अशा प्रकारचा प्रयोग नवी दिल्ली रेल्वे स्थानक, हजरत निझामुद्दीन स्थानकासह देशातील विविध शहारांमधील सहा स्टेशनवर करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर रेल्वेकडून जवळपास 400 रेल्वे स्थानकावरील कागदी तक्ता चिकटविण्याचं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.(source :lokmat)

मराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे :
  • महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे :  मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.

  • या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने साहित्य संमेलनाचा निधी वाढविण्यासाठी पुढील

  • अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

  • इमारत बंद, शाळा नव्हे! राज्यातील १,३०० मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्या संदर्भात तावडे म्हणाले, ‘‘पटसंख्या कमी असलेल्या अनेक शाळा राज्यात आहेत.

  • अशा शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेमध्ये शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे, शाळा बंद केलेल्या नाहीत, तर इमारती बंद झाल्या आहेत.’’

  • मराठीचा वापर वाढविणार मराठी भाषेच्या वापरासाठी सक्ती करता येणार नाही. त्यामुळे आग्रह करून मराठीचा वापर वाढविण्यावर राज्य सरकारचा भर राहील. इतर विषयांमधून मराठी वेगळी काढून विद्यापीठ स्थापन करणे अवघड आहे. विद्यापीठामध्ये मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यावर सरकारचा भर असेल, असे तावडे म्हणाले.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

  • १९२७: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.

  • १९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

  • १९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.

  • २००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म

  • १८५४: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)

  • १८७४: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९५६)

  • १९६३: एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १६००: सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो यांना बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.

  • १८८१: क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन.

  • १८८३: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

  • १९७८: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९१०)

  • १९८६: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९५)

  • १९८८: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.