चालू घडामोडी - १७ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 17, 2019 | Category : Current Affairsमुलींच्या गटात भारताला कोरिया, इटलीचे आव्हान :
 • जागतिक मल्लखांब स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय पुरुष मल्लखांबपटूंनी अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र मुलींच्या गटातील पोल मल्लखांब प्रकारात भारतीय मुलींना कोरिया आणि इटलीच्या मुलींनी आव्हान दिले. रविवारी स्पर्धेची सांगता होणार असून वैयक्तिक विजेतेपदासह सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

 • शनिवारी शिवाजी पार्कवर राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, अभिनेते नसीरुद्दीन शहा, राष्ट्रीय मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष रमेश इंदोलिया आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेचा प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यानंतर कमला मेहता शाळेच्या अंध विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके, समर्थ व्यायामशाळेच्या मल्लखांबपटूंच्या कसरती आणि मानवी मनोरे यांचे सादरीकरण करण्यात आले.

 • विदेशी खेळाडूंनी मल्लखांब आणि दोरीवर केलेल्या मल्लखांब प्रदर्शनानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सर्वागसुंदर खेळाचे कौशल्य दाखवत उपस्थित क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेमध्ये इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी अशा देशांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे औचित्य साधून मल्लखांब या खेळासाठी झटलेल्या सुरेश देशपांडे , रिचर्ड पेअर्सन , अच्युत साठय़े व उलगा दुराई  यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुण्यात राज्य कृषी विभागाच्या पुरस्कारांचं वितरण :
 • पुणे : राज्य कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं 14 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये वितरण करण्यात आलं. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

 • यावेळी 112 शेतकऱ्यांसह संलग्न क्षेत्रातील व्यक्तीना गौरविण्यात आले. 2015 आणि 2016 मधील पुरस्कार्थी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कृषी विभागातील सन्मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राज्यापाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते चंद्रशेखर भडसावले आणि शिवनाथ बोरसे यांना देण्यात आलं. महिलांनाही जिजामाता कृषीभूषण पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आलं.

 • या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यापाल सी. विद्यासागर राव, कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते.

शिर्डीच्‍या साईबाबा संस्‍थानकडून शहीदांच्या कुटुंबीयांसाठी २.५१ कोटी रुपयांची मदत :
 • शिर्डी : जम्‍मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्यामध्‍ये 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने 2.51 कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

 • जम्मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड हल्‍ल्यामध्‍ये 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा सर्व स्‍तरातून संताप व निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. या हल्‍ल्याला देशाचे सैन्‍य आणि शासन उत्तर देईलच पण आपल्‍या संवेदना सर्व देशाने व्‍यक्‍त केलेल्‍या आहेत आणि त्‍या संवेदनांचा आदर श्री साईबाबा संस्‍थान करत आहे.

 • त्‍या संवेदना व्‍यक्‍त करुन या हल्‍ल्यात शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्‍तांच्‍या व श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍यावतीने 2.51 कोटी रुपयांचा निधी देण्‍यासंदर्भात मी संस्‍थानच्‍या सर्व विश्‍वस्‍तांची चर्चा केली आहे. मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयास व शासनाच्‍या परवानगीस अधिन राहून सदरचा निधी देण्‍यात येईल असेही डॉ. हावरे यांनी सांगितले.

 • याआधी  पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांसाठी श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून 51 लाखांची मदत जाहीर केली आहे. याबाबत श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातली क्वीन मँरी टेक्निकल इन्स्टिटयूटच्या माध्यमातून 25 लाखांची करणार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. श्री सिद्धिविनायक मंदीर न्यास विश्वस्त मंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मंजूरीसाठी पाठवला आहे.

सुशील चंद्रा भारताचे नवे निवडणूक आयुक्त :
 • नवी दिल्ली : भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत.

 • चंद्रा यांचा जन्म 15 मे 1957 चा असून ते 1980 च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकारी आहेत. त्यांनी आय.आर.एस. सेवेदरम्यान उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात आदी राज्यामध्ये काम केले आहे. रुरकी विद्यापीठ तसेच डेहराडून येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे.

 • चंद्रा यांनी अंतर्गत कररचना आणि अन्वेषण कार्यात विशेष योगदान दिले आहे. मुंबई येथे अन्वेषण विभागाचे संचालक आणि गुजरातचे अन्वेषण महासंचालक म्हणून प्रभावी कामकाज केले असून सिंगापूर, आयआयएम बेंगळुरू आदी ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

 • निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार संभाळण्यापूर्वी ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, महसूल विभागांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सी.बी.डी.टी.) अध्यक्ष म्हणून तसेच सी.बी.डी.टी.चे सदस्य (अन्वेषण) म्हणून कार्यरत होते.

दहशतवादाविरोधात सर्वपक्षीय एकता, त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर :
 • नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षांनी मान्य केलं.

 • बैठकीत सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली. दहशतवादाला देशातूल उखडून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची विनंती विरोधीपक्षांच्या नेत्यांनी मान्य केली. या बैठकीत एक त्रिसूत्री प्रस्तावही मंजूर करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, भाकपचे डी. राजा, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

 • पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून, त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात  आले.

काय आहे त्रिसूत्री प्रस्ताव

 • 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.
 • सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतो.
 • गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत या आव्हानाचा मिळून सामना करत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईत आम्ही सुरक्षा दलांसोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहोत.
अमेरिकेच्या व्हिसासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात :
 • 1. तुमचा सध्याचा पासपोर्ट. तुम्ही जितका काळ अमेरिकेत राहणार आहात, तितक्या कालावधीपर्यंत या पासपोर्टची मुदत असायला हवी. तुम्ही तुमचे सर्व जुने पासपोर्ट आणल्यास ते जास्त सोयीचं ठरेल. 

 • 2. DS-160 कन्फर्मेशन पेज

 • 3. तुम्हाला मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत. या पत्रात मुलाखतीची तारीख असते. दूतावासात प्रवेश करण्यासाठी हे पत्र गरजेचं आहे. 

 • 4. तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी आवश्यक इतर कागदपत्रं.

 • काही विशिष्ट प्रकारच्या व्हिसासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना शैक्षणिक संस्थेकडून देण्यात आलेला आय-20 फॉर्म आणि SEVIS पेमेंटची पावती गरजेची असते. H1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी I-797 नोटीस ऑफ ऍक्शनची झेरॉक्स किंवा मूळ प्रत आणावी. जे एक्स्चेंज व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी DS-2019, SEVIS पेमेंटची पावती आणि प्रशिक्षण योजना (लागू होत असल्यास) ही कागदपत्रं घेऊन यावीत. विशिष्ट प्रकारच्या व्हिसासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद :
 • भारताची फुलराणी म्हणून ओळख मिळवलेल्या सायना नेहवालने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सायनाने सिंधूचा दोन सेटमध्ये पराभव केला. सायनाचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद ठरलं आहे.

 • याआधी २००६, २००७ आणि २०१८ साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घालत सायनाने आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.

 • सायनाने सिंधूची झुंज सरळ दोन सेटमध्ये २१-१८, २१-१५ अशी मोडून काढली. सिंधूने याआधी २०११ आणि २०१३ साली राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. पुरुषांमध्ये सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करत राष्ट्रीय विजेतेपदांची हॅटट्रीक साजरी केली. सौरभने १७ वर्षीय लक्ष्यला २१-१८, २१-१३ च्या फरकाने हरवत आपलं तिसरं विजेतेपद मिळवलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

 • १९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

 • १९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.

 • २००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म 

 • १८५४: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)

 • १८७४: अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९५६)

 • १९६३: एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८८१: क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन.

 • १८८३: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

 • १९७८: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९१०)

 • १९८६: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९५)

 • १९८८: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

टिप्पणी करा (Comment Below)