चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१८

Date : 17 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार :
  • पुणे : एमआयटीच्यावतीने ८ व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन दि. १९, २० व २१ जानेवारी दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे करण्यात आले आहे.

  • या परिषदेमध्ये ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांना मैत्रेयी पुरस्काराने तर खासदार सुस्मिता देव यांना गार्गी पुरस्काराने गौरवियात येणार आहे.आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे.

  • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सिनेअभिनेत्री मनीषा कोईराला, खासदार दुष्यन्त चौटाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी दिली.

  • यावेळी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास, अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, संचालिका डॉ. सायली गणकर उपस्थित होते. विविध पक्षातील १२ तरुण आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. छात्र संसदेचा समारोप २१ जानेवारी रोजी होणार आहे.

सैनिकांसाठी ७२००० असॉल्ट रायफल, ९४००० कार्बाइन खरेदीसाठी ३६०० कोटी मंजूर :
  • केंद्र सरकारने असॉल्ट रायफल आणि कार्बाइन खरेदीसाठी ३५४७ कोटी रूपयांना मंजुरी दिली आहे. सीमेवर तैनात सैनिकांना तात्काळ याचा पुरवठा केला जावा यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) ७२००० असॉल्ट रायफ आणि ९३८९५ कार्बाइनच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली.

  • या खरेदीमुळे सशस्त्र दलांना छोट्या हत्यारांची भासणारी कमतरता दूर होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहे. ही खरेदी सरकार ते सरकार म्हणजेच ‘जी टू जी’ स्तरावर केली जाऊ शकते.

  • संरक्षण मंत्रालयाच्या एका पत्रकानुसार संरक्षण डिझाइन आणि संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्रातील भागीदारी आणि मेक इन इंडिया कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी डीएसीने संरक्षण साहित्य खरेदी प्रक्रियेतील ‘मेक टू’ श्रेणीत महत्वपूर्ण बदल केले आहेत.

  • उद्योगास अनुकूल आणि यावर सरकारचे कमीत कमी नियंत्रण राहावे यासाठी डीएसीनेही ही प्रक्रिया सुलभ बनवली आहे. संशोधित प्रक्रियेनुसार आता संरक्षण मंत्रालयाला उद्योगाकडून प्रस्ताव स्वीकारण्याची परवानगी असेल आणि स्टार्टअपला भारतीय भारतीय सशस्त्र दलांसाठी उपकरण विकसित करण्याची परवानगी असेल.

  • मेक टू योजनेसाठी किमान योग्यतेबाबत असलेल्या नियमांमध्येही सूट देण्यात आली आहे. यामध्ये क्रेडिट रेटिंगशी संबंधित अटी हटवण्यात आल्या आहेत आणि शुद्ध संपत्तीचा मापदंडही काढण्यात आला आहे. यापूर्वी मेक टू प्रक्रियेनुसार केवळ दोन विक्रेत्यांना प्रोटोटाइप उपकरण विकसित करण्यासाठी निवडले गेले होते.(source :loksatta)

जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला :
  • लिसोथो : सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती. आपल्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे हिरे, रत्न असावे, त्याचा भारदस्त टोप आपल्या शिरावर असावा, असाच प्रयत्न त्याकाळी राजेशाहीचा होता. हेच आकर्षण आजही कायम आहे.

  • वेगवेगळे हिरे, रत्नांचा खजाना साठविणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असले, तरीही वेगवेगळी माहिती मात्र सामान्य माणूस ठेवत असतो. जगातील आगळे-वेगळे वैशिष्ट्य असणार्‍या चार हिर्‍यांच्या यादीत आता आणखी एका हिर्‍याची भर पडली आहे. हा हिरा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा ठरणार आहे.

  • लिसोथो येथील एका हिरे व रत्न कंपनीने जगातील सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा हिरा शोधल्याचा दावा सोमवारी केला. या हिर्‍याची किंमत ४0 मिलिअन डॉलर एवढी असून, दक्षिण आफ्रिकन देशात तो शोधण्यात आला.

  • ९१0 कॅरेटचा हा हिरा अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगण्यात आले. २00६ नंतर अनेक मौल्यवान हिर्‍यांचा शोध घेतल्याचे जेम डायमंडचे चीफ एक्झिकेटिव्ह क्लिफोर्ड एल्फीक यांनी सांगितले. हिरे आणि रत्नांच्या जाणकार असलेले बेन डेव्हिस यांनी या हिर्‍याचा शोध अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

हज यात्रेवरील अनुदान बंद; मोदी सरकारचा निर्णय :
  • हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून सुप्रीम कोर्टाने २०१२ मध्येच टप्प्याटप्प्यात हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याची आदेश सरकारला दिले होते. हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

  • जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे श्रद्धास्थान असून भारतातील हजारो मुस्लीम या यात्रेसाठी जातात. केंद्र सरकारच्या हज धोरणाचा मसुदा ऑक्टोंबरमध्ये सादर करण्यात आला होता. अफजल अमनुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या समितीने मसुदा तयार केला होता. या समितीनेही हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याची शिफारस केली होती.

  • मंगळवारी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याची घोषणा केली. केंद्र सरकार हज यात्रेवर दरवर्षी ७०० कोटी रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान आता बंद केले जाणार आहे.

  • यावर्षी देशातील १ लाख ७५ हजार मुस्लीम हज यात्रेसाठी जाणार होते. हज यात्रेतून वाचणारे अनुदानाचे पैसे अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शिक्षणावर खर्च केले जातील, असे नक्वी यांनी सांगितले. या अनुदानाचा मुस्लिमांना होत नव्हता. काही धनदांडगे मुस्लीम व हज यात्रेचे एजंट यांनाच या अनुदानाचा ‘लाभ’ मिळायचा, असा आरोप त्यांनी केला.(source :loksatta)

चौरंगी हॉकी स्पर्धा - भारत-जपान लढत आज :
  • तौरंगा (न्यूझीलंड) : भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. भारतीय संघ पाच दिवसीय दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये बेल्जियम आणि न्यूझीलंड संघांसोबतही खेळणार आहे. येथे चार दिवस सराव केल्यानंतर ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगने नव्या मोसमाची शानदार सुरुवातीची

  • आशा व्यक्त केली आहे. रूपिंदरपाल सिंग म्हणाला, ‘संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आम्ही चांगला सराव केला असून, विजयी सुरुवातीची अपेक्षा आहे.’ रूपिंदर, बीरेंद्र लाकडा, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, गुरिंदर सिंग बचाव फळीची जबाबदारी सांभाळणार आहेत. वर्षाची पहिली स्पर्धा असून लय गवसण्यासाठी विजयाने सुरुवात करणे आवश्यक आहे, असेही रूपिंदर म्हणाला.

  • आम्ही भुवनेश्वरमध्ये ओडिशा पुरुष हॉकी विश्व लीग फायनलमध्ये त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती; पण आता कामगिरीत सातत्य राखावे लागेल. बचाव फळीची कामगिरी चांगली व्हायला हवी. श्रीजेशचे संघातील पुनरागमन चांगली बाब आहे. कारण बलाढ्य संघांविरुद्ध त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल.

शारापोव्हा, हॅलेप, मुगुरुझा दुसऱ्या फेरीत :
  • मारिया शारापोव्हा, सिमोना हॅलेप व गर्बिन मुगुरुझा या विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला विभागात विजयी सलामी दिली. पेत्रा क्विटोव्हाला मात्र पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले.

  • माजी विजेत्या शारापोव्हाने जर्मनीच्या तात्जना मारियाला ६-१, ६-४ असे पराभूत केले. २००८ मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या शारापोव्हाने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळाला अचूक सव्‍‌र्हिसची जोड दिली. अग्रमानांकित हॅलेपला ऑस्ट्रेलियाच्या डेस्टॅनी एईवाविरुद्ध ७-६ (७-५), ६-१ असा विजय मिळवताना सुरुवातीला झगडावे लागले.

  • दोन वर्षांपूर्वी येथे अजिंक्यपद मिळवणाऱ्या अँजेलिक कर्बरने अ‍ॅनालिना फ्रीडसमचा ६-०, ६-४ असा पराभव केला. यंदाच्या वर्षी सलग दहा सामनेजिंकणाऱ्या कर्बरला या लढतीत विजय मिळवताना खूप झुंजावे लागले नाही.

  • द्वितीय मानांकित मुगुरुझाने फ्रान्सच्या जेसिका पोन्चेटवर ६-४, ६-३ अशी मात केली. आठव्या मानांकित कॅरोलिना गार्सियाने जर्मनीच्या कॅरिना विथोफ्टचा ७-५, ६-३ असा पराभव केला. सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाने विजयी प्रारंभ करताना पॅराग्वेच्या व्हेरोनिका सिपेडी रोईगीला ६-३, ६-३ असे निष्प्रभ केले.

  • आंद्रिया पेटकोविकने २७व्या मानांकित क्विटोव्हाचा ६-३, ४-६, १०-८ असा उत्कंठापूर्ण लढतीत पराभव केला. इंग्लंडची योहाना कोन्ताने अमेरिकेच्या मेडिसन ब्रेंगेलचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले.(source :loksatta)

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.

  • १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

  • १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

  • १९५६: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

  • २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

  • २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

जन्म

  • १८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)

  • १९०५: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.

  • १९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)४)

  • १९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)

  • १९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे२०१४)

  • १९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)

मृत्यू

  • १७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.

  • १८९३: अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)

  • १८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.

  • १९६१: काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९२५)

  • १९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)

  • १९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.

  • २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.

  • २००८: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च१९४३)

  • २०१०: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)

  • २०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)

  • २०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल१९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.