चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९

Date : 17 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सिकाई मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुळेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड :
  • गडचिरोली : गडचिरोलीमधील मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुळे या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीची बाल गटात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते 24 जानेवारी रोजी तिला सन्मानीत करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभाग दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार देतं. एंजलच्या या कामगिरीने गडचिरोली जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.

  • एंजलने सिकाई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात देशासाठी अनेक सुवर्ण पदक पटकावली आहेत. याच कामगिरीची दखल घेत महिला आणि बालकल्याण विभागाने तिला हा पुरस्कार जाहीर केला आहे.

  • एंजल देवकुळे गडचिरोलीतील स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. अवघ्या 10 वर्षाच्या वयात तिने आतापर्यंत तब्बल 40 सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. अत्यंत कमी वयात एंजलने परिश्रम आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन या बळावर हे यश मिळवलं असल्याचं तिचे पालक सांगतात. तिच्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी पालकांनी समाधान व्यक्त केलंय.

  • एंजलला आजवर सिकाई मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील नैपुण्यासाठी देश विदेशातही गौरवण्यात आले आहे. जगातील सर्वात कमी वयाची मार्शल आर्ट खेळाडू म्हणून ती प्रचलित आहे. आशिया अवॉर्डसह जिल्हा गौरव पुरस्कार, असे सन्मानही तिने मिळवले आहेत.

बँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा :
  • अचानक तुमच्या बँक खात्यात जर काही रक्कम जमा झाली तर तुम्ही नक्कीच खूष व्हाल. मात्र, ही रक्कम जर काही हजारांमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा आनंद गगनात मावणार नाही. अगदी अशीच स्थिती पश्चिम बंगालमधील काही लोकांच्या बाबतीत घडली आहे. त्यांच्या बँक खात्यात अचानक १० ते २५ हजार रुपये जमा झाले आहेत. ते ही एकदा नव्हे तर दोनदा. ही रक्कम कोणी जमा केली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, पंतप्रधान मोदींचीच ही कृपा असावी असा दावा काही लाभार्थींनी केला आहे.

  • सुत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात हा चमत्कार घडला असून येथील ज्या नागरिकांचे बँक खाती स्टेट बँक, युनायटेड बँक आणि युको बँकेत आहेत. अशा काही जणांच्या खात्यावर एनईएफटीद्वारे ही रक्कम जमा झाली आहे.

  • जिल्ह्यातील केतुग्राम नगरपंचायतीतील शिबलून, बेलून, टलाबाडी, सेनपाडा, अम्बालग्राम, नबग्राम आणि गंगाटीकुरी येथील बँकांमध्ये हा प्रकार घडला आहे. आपल्या खात्यात पैसे जामा झाल्यानंतर ते काढण्यासाठी या ग्रामस्थांनी बँकांच्या बाहेर रांगाही लावल्याचे चित्र आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की, खात्यात पैसे येतील हे कदाचित तेच पैसे असतील, अशी प्रतिक्रिया केतुग्रामचे आमदार शहनवाज शेख यांनी दिली आहे. तसेच ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत त्यांनीही हे पैसे सरकारनेच आमच्या खात्यात जमा केले असावेत, असा दावा केला आहे. मात्र, हे पैसे नक्की कोण पाठवत आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन त्याचा तपास केला जात असल्याचे कटवाचे अधिकारी सौमेन पल यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षांत १०० वाघांचा मृत्यू :
  • वाघांची संख्या जेवढय़ा झपाटय़ाने वाढत आहे, तेवढय़ाच वेगाने वाढणारी वाघांच्या मृत्यूची आकडेवारीदेखील चिंतेत भर घालणारी आहे. विशेष म्हणजे गस्ती पथक असतानाही वाघांचे मृत्यू अनेक दिवस उघडकीस न येणे हे अधिक चिंताजनक आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर २०१८ या वर्षांत १०० वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यात २७ वाघांच्या मृत्यूसह मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर २० वाघांच्या मृत्यूसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • वाघांच्या संवर्धनाबाबतीत अग्रक्रमाने नाव घेतले जाणारे मध्य प्रदेश हे राज्य. मात्र, या राज्यातही आता वाघांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे. वाघांच्या संरक्षणातील त्यांची कामगिरी खालावत आहे. गेल्या पाच वर्षांत मध्य प्रदेशात एकूण ८९ वाघांचा मृत्यू झाला. त्यातील ११ मृत्यू हे वाघांच्या बछडय़ांचे होते.

  • २०१८ या एका वर्षांत २७ वाघ या राज्यात मृत्युमुखी पडले. मध्य प्रदेशसारख्या व्याघ्र संवर्धनाबाबत आघाडीवर असणाऱ्या राज्यात वाघांच्या मृत्यूची आकडेवारी ही वन्यजीवप्रेमींसाठी धक्कादायक बाब आहे. २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

  • २०१८ मध्ये १०० तर २०१७ मध्ये ११५ वाघ मृत्युमुखी पडले होते. या वर्षी पुन्हा ही आकडेवारी वाढणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. वाघांचे अस्तित्व हे पर्यावरणासाठी आवश्यक आहे, पण त्यांचे संरक्षण हे मोठे आव्हान आहे. नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वाघांना वाचवावेच लागणार आहे.

सर्वच क्षेत्रांत चीनचा शक्तिविस्ताराचा प्रयत्न :
  • वॉशिंग्टन : हवाई, सागरी, अवकाश व सायबर क्षेत्रात चीन आपली शक्ती वाढवित असून या भागात आपली मर्जी लादण्याचा त्यांचा इरादा आहे, असा धोक्याचा इशारा अमेरिकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • श्रीलंकेतील हंबणतोटा, पाकिस्तानातील ग्वादर यासह आफ्रिका व मध्यपूर्वेतील काही बंदरांवर चीनने आपला दावा सांगितला असून चीनची  शक्ती अमर्याद वाढवण्याचा हेतू लपून राहिलेला नाही असे संरक्षण गुप्तचर खात्याचे अधिकारी डॅन टेलर यांनी सांगितले. पेंटॅगॉनने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ट्रम्प प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की, आम्ही अमेरिकी काँग्रेसचा एक अहवाल या निमित्ताने जाहीर करीत आहोत. दक्षिण चिनी सागर व इतर ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचे चीनचे प्रयत्न असून त्यांनी लष्कराचे आधुनिकीकरण सुरू केलेआहे.

  • सागरी, हवाई, अवकाश, माहिती अशा सर्वच क्षेत्रात चीनने काही योजना त्यासाठी सुरू केल्या आहेत. चायना मिलिटरी  पॉवर मॉडर्नायझिंग, अ फोर्स टू फाइट अँड विन या अहवालात ही मांडणी केली असल्याचे टेलर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दशकात एडनच्या आखातात चाचेगिरी विरोधात चीनने मोहिमा आखण्याच्या निमित्ताने हात पाय पसरण्याचा प्रयत्न केला.

  • आता पूर्व व दक्षिण चिनी सागरात त्यांचे वर्चस्व असून पीपल्स लिबरेशन आर्मीने नवीन शतकातही मोहीम राबवली आहे. चीनने सर्व मार्गानी तंत्रज्ञान मिळवून सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत. काही क्षेत्रात चीन जगात आघाडीवर आहे. चीन नवीन मध्यम व लांब पल्ल्याची बॉम्बफेकी विमाने तयार करीत आहे. जगाच्या मंचावर मध्यवर्ती भूमिका पार पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

नवा CBI संचालक निवडण्यासाठी २४ जानेवारीला बैठक :
  • नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची २४ जानेवारीला बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडणार आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे.

  • सरकारने २१ जानेवारीला बैठकीचा प्रस्तावर दिला होता. पण मल्लिकार्जून खर्गे यांना २४ किंवा २५ जानेवारीला बैठक हवी होती असे सूत्रांनी सांगितले. अखेर परस्परसहमतीने नव्या संचालकांची निवड करण्यासाठी २४ जानेवारीची तारीख ठरवण्यात आली. निवड समितीने आलोक वर्मा यांना हटवल्यापासून सीबीआय संचालकाचे पद रिक्त आहे.

  • आयपीएस अधिकारी नागेश्वर राव सध्या हंगामी सीबीआय संचालक म्हणून कामकाज संभाळत आहेत. सीबीआय संचालकपद रिक्त ठेवल्याबद्दल काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरु होती.

भारत अब्जावधी डॉलर्स मोजणार, अमेरिकेकडून घेणार संरक्षण सामग्री :
  • भारताने अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. भारत दरवर्षी अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलर्सचे तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच १८ अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

  • अमेरिकेकडून भारतात होणाऱ्या निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे असे अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिकेतील उद्योजकांसमोर बोलताना सांगितले. मागच्या दोन वर्षात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारामध्ये ११९ अब्ज डॉलर्सवरुन १४० अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.

  • हर्षवर्धन श्रृंगला यांच्या सम्मानार्थ भारत-अमेरिका व्यावसायिक परिषदेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आधीपेक्षा आता भारत मोठया प्रमाणात अमेरिकेकडून खरेदी करत आहे असे त्यांनी सांगितले. तेल आणि गॅस क्षेत्राचा विचार केल्यास भारत अमेरिकेकडून दरवर्षी पाच अब्ज डॉलर्सची खरेदी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • भारतीय हवाई कंपन्यांनी ३०० विमानांसाठी ४० अब्ज डॉलर्सची ऑर्डर दिल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत असलेले २ लाख २७ हजार विद्यार्थी अमेरिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ६.५ अब्ज डॉलर्सचा हातभार लावत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारी तूट कमी करण्याविषयी चर्चा झाली होती.

विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि डालमिया यांचे निधन :
  • नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून डालमिया आजारी होते. विश्व हिंदू परिषदचे वरिष्ठ नेते अशोक सिंहल आणि गिरिराज किशोर यांच्यासहीत डालमिया यांनी राम जन्मभूमी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.  

  • डालमिया यांचे पार्थिव दुपारी 3 वाजेपर्यंत नवी दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

  • यानंतर 4:30 वाजता निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1979 पासून डालमिया विश्व हिंदू परिषदेसोबत जोडले गेले आहेत. उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदांनंतर, 2005पर्यंत त्यांनी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. 

  • विष्णू हरि डालमिया यांना 22 डिसेंबर 2018रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.  यानंतर डालमिया यांच्या इच्छेनुसार 14 जानेवारीला त्यांना निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानीच औषधोपचार सुरू होते. पण बुधवारी (16 जानेवारी) 9.38 वाजता त्यांचे निधन झाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

  • १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

  • १९५६: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

  • २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

  • २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

जन्म 

  • १७०६: लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)

  • १८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)

  • १९०५: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.

  • १९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)

  • १९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)

  • १९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)

मृत्यू 

  • १८९३: अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)

  • १८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.

  • १९३०: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: २६ जून १८७३)

  • १९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)

  • १९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.

  • २०००: गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.

  • २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.

  • २००८: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९४३)

  • २०१०: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)

  • २०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.