चालू घडामोडी - १७ जुलै २०१८

Date : 17 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हिमा दासला आनंद महिंद्रा देणार आधार :
  • वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला. IAAF वर्ल्ड अंडर २० अॅथेलॅटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत तिने ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करत ही स्पर्धा जिंकली.

  • देशाची मान उंचावणाऱ्या हिमा दासच्या मदतीसाठी केंद्र सरकार आता पुढे सरसावले आहे. क्रिडा मंत्रालयाने तिला आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबरोबरच प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत आपण हिमाला आर्थिक मदत करण्यात उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

  • आता आपल्या सगळ्यांनाच हिमा दास हिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले पहायचे आहे. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड आणि ऑलिम्पिकचे एडिल सुमारीवाला यांना या ट्विटमध्ये टॅग करत हे दोघाही तिला चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न करतील असे म्हटले आहे.

  • पण त्यापलिकडे जात शासकीय मदतीशिवाय तिला आर्थिक गरज असेल तर मला ती करायला आवडेल असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये महिंद्रा यांनी हिमाचा सुवर्णपदक घेतलेला फोटोही शेअर केला आहे. हे ट्विट २४ हजार जणांनी लाईक केले असून ५ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे.

  • हिमाची केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या TOPS योजनेत निवड झाली आहे. या योजनेमार्फत ऑलिम्पिक पात्रतेसाठी लागणाऱ्या तयारीकरता हिमाला थेट निधी मिळणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला हिमाला ५० हजाराची मदत मिळणार आहे. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव :
  • नागपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव आता बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आलं आहे. यासाठी विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधयेक 2018 एकमताने मंजूर करण्यात आलं.

  • 1990 ला विद्यापीठाची स्थापना झाली, गेली अनेक वर्षे कवयित्री बहिणाबाई यांचे नाव विद्यापीठाला द्यावे अशी मागणी होत होती. बहिणाबाईंच्या जयंतीदिनी म्हणजे 11 ऑगस्टला नामविस्तार सोहळा होणार आहे.

  • सोलापूर विद्यापीठाचं काय - सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ही घोषणा का केली माहीत नाही पण यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली, असा आरोप ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी केला.

  • मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेता बहिणाबाईंचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यासाठी जसे विधेयक आणले तसे विधेयक न आणता ही घोषणा का केली? ही घोषणा जाणूनबुजून केली, की नकळत केली याचा खुलासा सरकारने करायला हवा, अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी केली.

  • उच्च न्यायालयात एक खटला सुरू आहे, त्याचा निकाल आला की नाव दिलं जाईल, असं विनोद तावडे म्हणाले. गणपतराव देशमुख यांच्या प्रश्नावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. समाजात फूट पाडण्याचं काम आम्ही करत नाही. सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणासाठी एक उपसमिती नेमली आहे. शिवा संघटनेनेही आता सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यासाठी पाठिंबा दिला आहे

भारत-इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी :
  • लंडन : भारत आणि इंग्लंड संघांमधला तिसरा आणि अखेरचा वन डे सामना आज लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडनं लॉर्डसवरची दुसरी वन डे जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे उभय संघांमधल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत लीड्सचा सामना हा निर्णायक ठरेल. हा सामना जिंकून वन डे सामन्यांची सलग दहावी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

  • भारताच्या मधल्या फळीनं दुसऱ्या वन डेत बजावलेली निराशानजक कामगिरी कर्णधार विराट कोहलीच्या दृष्टीनं चिंतेची बाब ठरणार आहे. भुवनेश्वर आणि बुमरा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनी लॉर्डसवर बजावलेली कामगिरीही पराभवाला निमंत्रण देणारी ठरली होती.

  • तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताचा महत्त्वाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. भारताचा सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरने सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेच भुवनेश्वरच्या फिटनेस विषयी चिंता व्यक्त केली. 1 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेआधी भुवनेश्वर फिट होणे गरजेचं असल्याचे बांगरने म्हटलं.

  • मात्र आजच्या सामन्यात भुवी खेळणार की नाही याबाबत संजय बांगरने स्पष्ट काहीही सांगितलं नाही. इंग्लंड दौऱ्यात भुवनेश्वर कुमार आतापर्यंत केवळ दोन टी-20 सामन्यात खेळला आहे. कार्डिफ येथील टी-20 सामन्यात पाठिच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर नंतरचे सामने खेळू शकला नाही.

अमेरिकेत असताना व्हीजिटर व्हीसाची मुदत संपली तर :

प्रश्न - माझा यूएस व्हीजिटर व्हीसाची मुदत मी अमेरिकेत सुटीवर असतानाच संपणार आहे, त्यामुळे काही समस्या निर्माण होईल का?
उत्तर - नाही. तुमचा व्हिजीटर व्हीसा अमेरिकेत असताना संपला तर कोणतीही समस्या येणार नाही. अमेरिकेत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हीसाची मदत होईल तसेच पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठीही त्याची मदत होईल. तुम्हाला व्हीसावर नमूद केलेल्या तारखेच्या आदी अमेरिकेत पोहोचावे लागेल.

  • अमेरिकेत पोर्ट ऑफ एन्ट्रीसाठी तुम्ही पोहोचलात की तुमचे अमेरिकेतील वास्तव्याचे नियमन होमलँड सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे (सीबीपी) अधिकारी करतील. सीबीपी अधिकारी तुमच्या आय-94 अर्जावर किंवा तुमच्या अॅडमिशन स्टॅम्पवर तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा काळ नमूद करतील. त्याला अरायवल-डिपार्चर रेकॉर्ड असेही म्हणतात. हे रेकॉर्ड अत्यंत सुरक्षित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.

  • या नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहाणे तुम्हाला भविष्यात व्हीसा मिळण्यावर परिणाम करु शकते. तुम्ही अमेरिकेत आल्यावर सीबीपी अधिकाऱ्याने नमूद केलेल्या काळापेक्षा जास्त काळ अमेरिकेत वास्तव्य होणार नाही याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. 

  • तुम्ही भारतात परत आल्यानंतर अमेरिकेत पुन्हा सुटीसाठी जाण्यासाठी तुम्हाला नवा व्हीजीटर व्हीसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ustraveldocs.com/in. येथे जाऊन व्हीसा मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकता. 

वर्ल्ड इमोजी डे... मानवी भावनांना कैद करणाऱ्या 'या ५ स्माईली' :
  • मुंबई - 17 जुलै हा दिवस जगभरात 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा करण्यात येतो. आजकाल माणसाचे आयुष्य डीजिटल बनले असून प्रत्येक गोष्ट आपण चिन्हांतून व्यक्त करत आहोत. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो.

  • व्हॉट्सअॅपवर सर्रासपणे भावना व्यक्त करताना आपण इमोजीचाच वापर करतो. त्यामध्ये प्रेम, राग, आश्चर्य, हसू आणि आसूही आपण इमोजीतूनच व्यक्त करतो. मानवी भावनांना कैद करणाऱ्या या 5 इमोजी आपल्या दैनिक गरजेचा भाग बनला आहे. 

  • जगभरात पहिली इमोजी 'स्माईली' आहे. हसण्याने सुरुवात झालेल्या या इमोजींची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच आता केवळ स्माईलीपुरतीच इमोजी मर्यादीत राहिली नसून अनेक वेगवेगळ्या भावनांच्या इमोजी तयार झाल्या आहेत. व्हॉट्सअॅप चॅटींगमध्ये या इमोजींचा दैनिक वापर वाढला आहे. युवक वर्गात प्रामुख्याने शब्दांऐवजी इमोजी चॅटला प्राधान्य दिले जाते.

  • गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी चॅट करताना अनेकदा इमोजीतूनच संवाद साधला जातो. त्यामध्ये, लव्ह, लाईक, राग, हसू आणि आसू या पाच इमोजींना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळेच की काय, फेसबुकनेही केवळ लाईकपुरते मर्यादित न राहता युजर्संसाठी 5 इमोजींचा पर्याय सुरु केला.

  • त्यामध्ये लाईकसह लव्ह (प्रेम), वाव (आश्चर्य), अँग्री (राग), स्माईल (हसू) आणि क्राईंग (रडू) या पाच भावनांचा समावेश केला आहे. त्यामुळेच फेसबुकवर भावनांना व्यक्त करण्यासाठी कमेंटऐवजी या 5 इमोजींचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन :
  • मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे मंगळवारी (17 जुलै) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • अभिनेता शिशिर शर्मा यांनी आपल्या फेसबुक पेजवर रीटा भादुरी यांच्या निधनाबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी विकारामुळे त्यांचे निधन झाले आहे. गेल्या 10 दिवसांपासून रीटा यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराविरोधात कडवी झुंज देत होत्या. 

  • रीटा यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे.  सध्या 'निमकी मुखिया'मध्ये त्या आजीची भूमिका साकारत होत्या. ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली. रीटा या किडनी विकारानं ग्रस्त होत्या. त्यांना प्रत्येक दिवशी डायलिलिस करावे लागत होते.

  • मात्र कौतुकास्पद बाब म्हणजे या कठीण दिवसांतही त्यांनी आपल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये  खंड पडू दिला नाही. सेटवर मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्या आराम करायच्या. 'निमकी मुखिया'मधील स्टारकास्टही त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते. त्यांच्या उपचारांच्या वेळानुसार अन्य कलाकार आपल्या कामाचे वेळापत्रक सांभाळून घ्यायचे.

  • 'वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांना घाबरुन काम करणं का सोडावं. काम करणे आणि त्यात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करत बसणं मला पसंत नाही. यासाठी मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते,' असे काही दिवसांपूर्वी रीटा त्यांनी म्हटलं होते. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.

  • १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.

  • १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  • १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

  • १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

  • २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १९१५: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)

  • १९१८: ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.

  • १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २००७)

  • १९२३: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)

  • १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २००८)

  • १९५४: जर्मनीच्या ८व्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९०: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचे निधन. (जन्म: ५ जून १७२३)

  • १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.  (जन्म: १४ एप्रिल १९१४)

  • १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)

  • २००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.

  • २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)

  • २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.