चालू घडामोडी - १७ जून २०१८

Date : 17 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयटीआयसाठी दोन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी :
  • मुंबई : १ जून २०१८ पासून पासून सुरू झालेल्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ लाख ९६ हजार ९११ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळाली आहे. राज्यभरात आयटीआयच्या खासगी आणि शासकीय दोन्ही मिळून १ लाख ३६ हजार १९३ जागा उपलब्ध आहेत.

  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे. अर्ज सादक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार १८४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची निश्चिती करण्यात आली आहे.

  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयतर्फे आयटीआय प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत आहे. यामधील मुंबई विभागात १९,५८१ जागा असून, १६,३६७ जागा शासकीय तर ३,२१४ जागा खासगी प्रशिक्षण संस्थांच्या आहेत. सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आयटीआय प्रवेश घेण्याकडे यंदा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आणीबाणीतील बंदींना मोदी सरकारचीहीे पेन्शन :
  • नवी दिल्ली : रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. संघाच्या १ लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल. आणीबाणीत मिसा व डीआरआय कायद्याखाली अनेकांची धरपकड झाली. त्यांना पेन्शन देण्याच्या मोदी सरकारचा विचार आहे.

  • सूरजकुंड येथे संघ व भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आणीबाणी पेन्शनचा मुद्दा चर्चिला गेला. त्यांना पेन्शन दिल्यास २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपाला मोठे बळ मिळू शकते, असा विचार या बैठकीत मांडला.

  • विरोधी ऐक्यावर झाली चर्चा - विरोधी पक्षांच्या ऐक्याशी कसा सामना करायचा, यावरही बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ व भाजपा नेत्यांसाठी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

  • विरोधकांचे ऐक्य फार टिकणार नाही, कर्नाटकातील सरकारही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी या नेत्यांना सांगितले.

अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी १५० वर्षांची प्रतीक्षा :
  • अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळण्याची आशा असलेल्यांना त्यासाठी कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हावयाचे असेल आणि काम करावयाचे असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. वॉशिंग्टनमधील कॅटो संस्थेने ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या संख्येवरून काही निष्कर्ष काढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये किती ग्रीन कार्ड देण्यात आली त्यावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत.

  • एप्रिल २०१८ पर्यंत अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या भारतीयांची संख्या सहा लाख ३२ हजार २१९ इतकी आहे. त्यामध्ये प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, आई-वडील आणि मुले यांचा समावेश आहे. आता कोणाला आणि कधी ग्रीन कार्ड द्यावयाचे त्याचेही निकष आहेत. जो अत्यंत कुशल आहे, उच्चशिक्षित आहे त्याला सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागते, असामान्य प्रकारामध्ये ३४ हजार ८२४ जण असून त्यांच्यासह ४८ हजार ७५४ जोडीदार आणि मुलांचा समावेश आहे.

  • आणखी एक प्रकार म्हणजे पदवीधर, त्यांना ग्रीन कार्डसाठी १७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. कारण ते तुलनेत कमी कुशल आहेत, अशा भारतीयांची संख्या ५४ हजार ८९२ आणि त्यांच्यासोबत ६० हजार ३८१ कुटुंबीयही याच प्रकारात आहेत. त्यानंतर कामगार हा प्रकार असून सध्या त्यांना ज्या वेगाने व्हिसा दिला जातो त्याचा विचार केल्यास ग्रीन कार्ड मिळण्यासाठी या प्रकारातील भारतीयांना १५१ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • म्हणजेच त्यांना कधीच ग्रीन कार्ड मिळणार नाही, असा निष्कर्ष कॅटो संस्थेने काढला आहे. प्रत्येक प्रकारामध्ये किती जणांना ग्रीन कार्ड द्यावयाचे यावरही बंधन आहे, त्यामुळे ही यादी लांब होत जाते आणि प्रतीक्षायादीचा कालावधीही वाढत जातो. त्यामुळे लाखो भारतीयांना त्यांच्या हयातीमध्ये अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व देणारे ग्रीन कार्ड मिळणे सध्याच्या नियमांनुसार तरी शक्य नाही, ही गोष्ट यामधून स्पष्ट होत आहे.

भारत-चीन, अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध :
  • नवी दिल्ली/बीजिंग : अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे. चीननेही अमेरिकी वस्तूंवर ५० अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर प्रस्तावित केले आहेत. या घडामोडींमुळे अमेरिका आणि भारत-चीन यांच्यात व्यापार युद्धच छेडले गेले आहे.

  • अमेरिकेने गेल्या महिन्यात स्टीलवर २५ टक्के, तर अल्युमिनियमवर १० टक्के आयात कर लावला होता. या करामुळे भारताला २४१ दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेला टार्गेट करून ३० वस्तूंवरील आयात शुल्कातील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेला या निर्णयाची माहिती भारताने अधिकृतरीत्या कळविली आहे. भारत सरकारच्याा सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने आमच्या वस्तूंवर जेवढ्या रकमेचे कर लावले आहेत, तेवढ्याच रकमेचे कर आम्हीही प्रस्तावित केले आहेत.

  • भारताकडून आयात कर लावण्यात येणाऱ्या वस्तूंत मोटार सायकली, ठराविक लोखंड, पोलादी वस्तू, बोरिक अ‍ॅसिड, मसूर डाळ, चणे, ताजी सफरचंदे, अक्रोड, बदाम, शुद्ध केलेले पामतेल, ८०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटार बाइक्स, वैद्यकीय निदानासाठी वापरली जाणारी घटकद्रव्ये, आटा असलेले नट यांचा समावेश आहे.

  • जागतिक व्यापार संघटनेच्या ‘सुरक्षा उपाय करारा’च्या अधीन राहून भारताने हे कर प्रस्तावित केले आहेत. अमेरिकेच्या आयात करास भारताने याआधीच आक्षेप घेतला होता. अमेरिकेने आयात कराचा निर्णय कायम ठेवल्यास आम्हीही २१ जून २०१८ पासून आयातकराची सवलत काढून घेऊ, असे भारताने म्हटले होते.

बजाज इलेक्ट्रिकल्स मराठमोळ्या निर्लेप कंपनीची खरेदी करणार :
  • औरंगाबाद : स्वयंपाक घरातील नॉनस्टिक तव्यापासून कढईपर्यंत सगळी भांडी आणि वस्तू बनवणारी निर्लेप ही कंपनी आता बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कंपनीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षातच निर्लेप या मराठमोळ्या कंपनीची विक्री होणार आहे.

  • निर्लेपने 1970 मध्ये भारतात स्वयंपाकाची भांडी नॉनस्टिक प्रकारात आणून क्रांती केली.

  • बजाज इलेक्ट्रिकल्स निर्लेपचे 80 टक्के शेअर्स 42.50 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचं कळतं. मात्र अद्याप कोणतीही रक्कम ठरली नसल्याचं निर्लेपचे सर्वेसर्वा राम भोगले यांनी सांगितलं. व्यवहारानुसार, निर्लेप 80 टक्के शेअर्स बजाज इलेक्ट्रिकल्सला विकणार असून 20 टक्के शेअर्स स्वत:कडे ठेवणार आहे.

  • येत्या सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल. निर्लेप उद्योग समुहाचे शेअर मार्केटमधील शेअर्स सतत कोसळत आहेत. त्यामुळे तोटा वाढत असल्याने तसंच जागतिक बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राम भोगले यांनी सांगितलं.

दिनविशेष :
  • जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन

महत्वाच्या घटना

  • १९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

  • १९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

  • १९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

  • १९९१: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

  • २०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

जन्म

  • १७०४: फ्लाइंग शटलचे शोधक जॉन के यांचा जन्म.

  • १८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

  • १८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

  • १९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

  • १९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

  • १९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

मृत्यू

  • १२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

  • १६३१: शाहजहान यांच्या पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

  • १६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

  • १८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे  निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

  • १८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै१८५६)

  • १९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

  • १९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.