चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जून २०१९

Date : 17 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा आज बंद :
  • पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी पुकारलेल्या २४ तासांच्या ‘बंद’मध्ये राज्य रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटना आणि खासगी डॉक्टरांची संघटनाही सहभागी होणार असल्याने राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

  • राज्यात एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी सेवा बंद राहणार आहेत. या संपाचा परिणाम खासगी वैद्यकीय सेवेवरही होण्याची शक्यता असल्याने  रुग्णांना तातडीने उपचार मिळणे कठीण होणार आहे.

  • पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी ‘आयएमए’शी संलग्न डॉक्टर शुक्रवारपासून काळ्या फिती लावून काम करत आहेत. सोमवारी देशभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. हा बंद सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.

  • या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटनेने रविवारी जाहीर केले. राज्यभरातील खासगी रुग्णालयांमध्ये एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी या सेवांमधील सर्व डॉक्टर बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सेवा बंद राहतील.

  • रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. हिंसेचा मार्ग अवलंबणे योग्य नाही. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारनेही ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असे राज्य रेडिओलॉजी अ‍ॅण्ड इमेजिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओनकर यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात १५-२० नव्या घोषणा :
  • राज्य सरकारचा अर्थसंकल्प मंगळवारी १८ जून रोजी मांडला जात असून विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध समाजगटांना आपलेसे करण्यासाठी १५ ते २० नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • लोकसभा निवडणुका असल्याने फेब्रुवारीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आला नव्हता. तरीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या लेखानुदानाचे रूपांतर छोटय़ा अर्थसंकल्पातच करत अनेक घोषणा केल्या होत्या. रविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात येईल, असे सूतोवाच केले. पण तपशील सांगण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत अधिक माहिती घेतली असता, धनगर समाजाबरोबरच राज्यातील छोटे-मोठे विविध समाजघटक डोळ्यांसमोर ठेवून १५ – २० नवीन घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

  • लोकसभा निवडणुकीत विविध समाजघटकांनी काही मुद्दे सत्ताधाऱ्यांसमोर मांडले. त्या अनुभवाच्या आधारे आता विधानसभा निवडणुकांत लोकप्रिय ठरतील अशा नव्या घोषणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

  • देशात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्याच्या महसूल वाढीसाठी नवीन कर आकारणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खूप मोठय़ा योजना नव्याने हाती घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे विविध समाजघटकांना थेट लाभ होईल अशा योजना जाहीर करण्याचे धोरण राज्य सरकार स्वीकारण्याची शक्यता आहे.

‘माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ घोषित करा’ :
  • दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत करण्यात यावा अशी मागणी माजी राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते आनंद भास्कर रापोलू यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश निशांक यांच्याकडे केली आहे. कलाम हे एक आदर्श वैज्ञानिक होते त्यांच्या प्रेरणेने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता जागृत व्हावी यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे रापोलू यांनी म्हटले आहे.

  • रापोलू यांनी यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे. यामध्ये ते लिहीतात की, अमेरिकेने यापूर्वीच १५ ऑक्टोबर हा डॉ. कलामांचा जन्मदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत केला आहे. त्यानुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्येही हा दिवस ‘जागतीक विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण २१ जून हा ‘जागतीक योग दिवस’ आणि ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून घोषीत केला आहे. त्याचप्रमाणे आता १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत करावा, अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती असल्याचे रापोलू यांनी म्हटले आहे.

  • यापूर्वी भाजपाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा विविध प्रकारे गौरव केला आहे. त्यांना राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यासाठी भाजपाने महत्वाची भुमिका बजावली होती. त्याचबरोबर राजधानी दिल्लीतील एका महत्वाच्या मार्गाला मोदी सरकारने डॉ. कलाम यांचे नाव दिले आहे. त्यानंतर आता त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून घोषीत करावा, असे माजी खासदार आणि भाजपा नेते आनंद भास्कर रापोलू यांनी म्हटले आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळातील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील. या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी विधेयकासह किमान दहा विधेयके मांडण्यात येणार आहेत.

  • संसदेत १७ व्या लोकसभेचे कामकाज सोमवारी सुरू होणार असून, हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार १७ आणि १८ जून या दोन दिवसांमध्ये नव्या खासदारांना सदस्यत्वाची शपथ देतील. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. २० जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सुरू होईल. हे अधिवेशन २६ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

  • ५४५ सदस्यांच्या लोकसभेत भाजपप्रणीत ‘एनडीए’चे ३५३ खासदार असून त्यात भाजपचे ३०३ खासदार आहेत. प्रमुख विरोधक काँग्रेसचे संख्याबळ जेमतेम ५२ इतके आहे. लोकसभेत केंद्र सरकारकडे बहुमत असले तरी राज्यसभेत विरोधी पक्षांची सदस्य संख्या अधिक आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सत्ताधाऱ्यांकडे १०२ सदस्य आहेत. त्यामुळे तिहेरी तलाकबंदी विधेयक नव्याने सादर होणार असले तरी राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपचे कसब पणाला लागणार आहे.

  • १६व्या लोकसभेत अखेरची दोन वर्षे अधिवेशन काळात फारसे कामकाज झाले नाही. अनेक विधेयके दोन्ही सदनात मंजुरीविना पडून राहिली. नव्या सभागृहात महत्त्वाची विधेयके संमत करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांना दिला.

'एक देश, एक निवडणूक'वर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक बोलावली :
  • नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. संसद भवनात 19 जून रोजी ही बैठक पार पडेल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी ही माहिती दिली.

  • या बैठकीत पंतप्रधान मोदी एक देश, एक निवडणूक, महात्मा गांधी यांची 150 व्या जयंतीशी संबंधित सर्व कार्यक्रमांबाबत चर्चा करणार आहेत. तसंच पंतप्रधानांनी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचीही बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींना संसदेत टीम स्पिरीट निर्माण करायचं आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

  • सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत प्रल्हाद जोशी म्हणाले की, "विरोधी पक्षांसह मित्रपक्षांकडूनही सूचना मिळाल्या आहेत. यंदा संसदेत अनेक नवे चेहरे आले आहेत, त्यांच्याकडून आलेल्या विचारांचा समावेश व्हायला हवा."

  • 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याशिवाय यावर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याबाबतच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी तसंच जिल्ह्याशी संबंधित मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे, असं असंही प्रल्हाद जोशी म्हणाले.

दिनविशेष :
  • जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन

महत्वाच्या घटना 

  • १६३१: ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

  • १८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

  • १९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

  • १९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

  • १९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

  • १९९१: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

  • २०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

जन्म 

  • १२३९: इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १३०७)

  • १७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

  • १८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

  • १८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

  • १९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

  • १९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

  • १९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.

  • १९८१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे  निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

  • १२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

  • १६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

  • १८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे  निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

  • १८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै१८५६)

  • १९२८: ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

  • १९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

  • १९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

  • १९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

  • २००४: सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.