चालू घडामोडी - १७ मार्च २०१८

Date : 17 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मराठी भाषा धोरण विनाविलंब जाहीर करा :
  • मुंबई : गेली अनेक वर्षे मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीशी संबंधित असलेले कार्यकर्ते आणि राज्याचे बहुचर्चित मराठी भाषा धोरण ठरविण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग असलेले मसुदा समितीचे सदस्य यांनी राज्याचे शिक्षणमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले.

  • मराठी भाषा धोरण सहा वर्षे धूळखात पडले आहे. या धोरणाबाबतच्या लोकभावना जाणून ते आता अधिक वेळ न लावता जाहीर करणे आवश्यक आहे, असे समितीतील सदस्य शांताराम दातार यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र शांताराम दातार, डॉ. प्रकाश परब आणि श्याम जोशी यांनी मिळून लिहिले आहे.

  • प्रलंबित मराठी भाषा धोरण येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी किंवा किमान महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जाहीर करावे आणि हे राज्य मराठीचे आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे, असे या पत्रात म्हटले आहे.

दहा वर्षांत भारत तिसरी सक्षम अर्थव्यवस्था - मुकेश अंबानी :
  • लंडन : वय ३५ हून कमी असलेल्या ६३ टक्के युवकांच्या जोरावर भारत येत्या १0 वर्षांत जगातील तिसरी सक्षम अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

  • आर्सेलर मित्तल समूहातर्फे उद्योग पुरस्कारांचे अलीकडेच येथे वाटप झाले. त्यामध्ये मुकेश अंबानी यांचा ‘ड्रायव्हर्स आॅफ चेंज’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी अंबानी म्हणाले की, भारतात २जी येण्यासाठी २५ वर्षे लागली. पण जिओने तीन वर्षांत ४ जी नेटवर्क उभे केले. याच आधारे २०१९ मध्ये भारत ४जी श्रेणीत जगात अव्वल होईल.

  • आजही मोबाइलधारकांना केवळ बोलण्यासाठी महिना २०० ते ३०० रुपये खर्च करावे लागतात. त्यांचा विचार करून ४जी एलटीई स्मार्ट फोन ही स्वस्त दरातील संकल्पना आम्ही तयार केली. आज जिओ देशातील १९ लाख शाळा व ५८ हजार विद्यापीठांना संलग्न आहे. डिजिटलच्या आधारे होणारा भारताचा विकास हा अभूतपूर्व असेल.

रोमांचक विजयासह बांगलादेश फायनलमध्ये :
  • कोलंबो : अत्यंत चुरशीच्या झालेल्या निर्णायक सामन्यात बांगलादेशने जबरदस्त झुंज देत यजमान श्रीलंकेचा २ गड्यांनी पराभव करुन तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशपुढे बलाढ्य भारताचे तगडे आव्हान असेल. अत्यंत नाट्यमय झालेल्या या लढतीत लंकेने दिलेले १६० धावांचे आव्हान बांगलादेशने ८ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि एक चेंडू राखून पार केले.

  • आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने दमदार खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या महमुद्दुल्लाह याने निर्णायक सामन्यात फॉर्ममध्ये येताना १८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४३ धावांची विजयी तडाखा दिला.

  • २ बाद ३३ अशी अडखळती सुरुवात झाल्यानंतर सलामीवीर तमिम इक्बालने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत मुशफिकुर रहिमसह (२८) तिसºया गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली. तमिमने ४२ चेंडूत ४ चौकार व २ षटकारासह ५० धावांची खेळी केली. तमिम बाद झाल्यानंतर महमुद्दुल्लाने अखेरपर्यंत टिकून राहत संघाला अंतिम फेरीत नेले.

  • तत्पूर्वी, कुसल परेरा (६१) आणि कर्णधार थिसारा परेरा (५८) यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने २० षटकात ७ बाद १५९ अशी समाधानकारक मजल मारली.

  • बांगलादेशने भेदक मारा करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. बांगलादेशने अचूक मारा करत श्रीलंकेची ९व्या षटकात ५ बाद ४१ धावा अशी बिकट अवस्था केली होती. यावेळी लंका शंभरीच्या आत गारद होणार, अशी शक्यता निर्माण झाली होती.

प्रशासकीय त्रुटींमुळे बँकांमध्ये घोटाळे- अरुंधती भट्टाचार्य :
  • मुंबई : सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचे मुख्य कारण प्रशासकीय त्रुटी हेच आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी केले. बँकांनी खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

  • मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज व इंडियन मर्चंट चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीतर्फे प्रवीणचंद्र गांधी स्मृती व्याख्यानात ‘भारताच्या आर्थिक विकासासाठी बँकिंग’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात घोटाळ्यांबाबत त्या म्हणाल्या, जेथे पैसा आला तेथे घोटाळा होतोच. हे घोटाळे केवळ भारतातच होतात, असे नाही.

  • पण मोठ्या बँका क्वचितच घोटाळ्यांचे लक्ष्य ठरतात. घोटाळे टाळण्यासाठी बँकिंग प्रक्रियेची सातत्याने तपासणी करायला हवी. स्विफ्टच्या माध्यमातून हमीपत्राच्या आधारे घोटाळा झाला. याचे कारण स्विफ्ट आणि सीबीएस प्रणाली स्वतंत्र ठेवली गेली. या दोन्ही प्रणाली एकमेकांना पूरक ठेवल्यास घोटाळ्यांवर अंकुश येईल.

  • सरकारी बँकांचे खासगीकरण होणारच. पण त्याआधी बँकांनी प्रशासन सुधारण्याची गरज आहे. खातेदार बिनधास्तपणे त्यांचा पैसा बँकेत ठेवतात. त्यांचा बँकेवर पूर्ण विश्वास असतो. मात्र केवळ प्रशासकीय त्रुटींमुळे घोटाळे होणे योग्य नाही. त्यातून बँकांवरील खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. तो जाऊ न देण्याचे मोठे आव्हान सध्या केवळ सरकारीच नाही, तर खासगी व सहकारी बँकांसमोरही आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सर्वांत मोठ्या दोन तोफा भारतातच :
  • बहामनी साम्राज्यात म्हणजे इ. स. १३२७ ते १४२४ या काळात ती तयार करण्यात आली, असं सांगण्यात येतं. ती बारा गाझी तोफ नावानं ओळखली जाते. रशियातील झारची तोफ आतापर्यंत जगातील सर्वांत मोठी तोफ म्हणून ओळखली जात असे. पण पुरातत्त्व खात्याच्या म्हणण्यानुसार बारा गाझी तोफ त्याहून मोठी आहे.

  • आपल्याला अनेकदा जगातील अनेक आश्चर्यांची माहिती असते. पण आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या असंख्य महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतात. याचं कारण म्हणजे त्या बाबींना हवी तशी प्रसिद्धीच मिळालेली नसते. उदाहरणेच द्यायची तर आशियातील सर्वात मोठी तोफ जशी भारतात आहे, तसंच जगातील सर्वात मोठी तोफही भारतात आहे.

  • या दाने्ही तोफा ज्या राज्यांत आहेत, तिथं आपण कदाचित गेलेलो असू. पण त्या पाहिल्या नसतील. आशियातील सर्वात मोठी तोफ आहे राजस्थानात. जयपूरच्या जयगड किल्ल्यावर ती आहे. गंमत म्हणजे ती तयार करण्यासाठी तिथे आधी कारखाना बांधण्यात आला. ती त्या कारखान्यात तयार केली गेली. आतापर्यंत तिचा केवळ एकदाच वापर झाला आहे. तोही प्रयोगासाठी. या तोफेतून उडवलेला तोफगोळा ३५ किलोमीटर अंतरावर जाऊ न पडला. त्या आवाजानं आसपासच्या गावांत घबराट पसरली.

  • इतकंच नव्हे, तर जिथं तो तोफगोळा पडला, तिथं इतका खोल खड्डा पडला की, तिथं चक्क पाणीच लागलं. हिचा वापर करण्यासाठी एका वेळी १०० किलो गन पावडर लागेल, असं सांगण्यात येतं. केत्यानंतर एकाही युद्धात तिचा वापर करण्यात आला नाही. ही तोफ १७२० साली बनवण्यात आली होती. जयगड किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या या तोफेला जयबाण हे नाव देण्यात आलं आहे. या तोफेचं वजन सुमारे ५० टन आहे.

  • जयबाण ही जगातील दहाव्या क्रमांकाची मोठी तोफ आहे. जगातील सर्वात मोठी तोफ आहे आपल्या शेजारी असलेल्या कर्नाटकातील गुलबर्ग्याच्या किल्ल्यावर. तिचा आता वापर करणं अशक्य आहे. ती आजही चांगल्या अवस्थेत असली तरी तिचा आता वापर करता येणं अशक्य आहे.

२६ मोठे सिंचन प्रकल्प २०१९पर्यंत पूर्ण करणार :
  • मुंबई : राज्यातील मोठे २६ सिंचन प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रकल्पांचा समावेश पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.

  • ते म्हणाले, राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसार पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत २६ प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित केले जातील.

  • राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी कठोर नियम केले आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू लागणार असल्यामुळे वाळूधोरण आणणार आहे़

टी-20 मुंबई लीगच्या आयोजकांची समितीच बेकायदेशीर, हायकोर्टात याचिका :
  • मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची समिती बरखास्त करून त्यावर तात्काळ व्यवस्थापक नेमावा, अशी मागणी बीसीसीआयने मुंबई हायकोर्टात केली. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची अंतिम मुदत ही सप्टेंबर 2016 होती. मात्र 18 महिने उलटूनही एमसीए या ना त्या कारणाने पळवाटा शोधून काढत असल्याचा आरोपही बीसीसीआयने केला.

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरु असलेली टी-20 मुंबई लीग स्पर्धा तात्काळ रद्द करावी, मुळात लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता न केल्यामुळे ही समितीच बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा प्रकारे नवी व्यावसायिक स्पर्धा खेळवण्याचा एमसीएला अधिकारच नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

  • शिवाय हायकोर्टाने एक समिती नेमून याची चौकशी करावी आणि आयोजकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उभारलेला निधी तात्काळ हायकोर्टात जमा करावा, अशी मागणी करणारी याचिका नदीम मेमन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

  • याचिकाकर्ते हे एमसीएशी संलग्न असलेल्या मुस्लीम स्पोर्ट्स क्लबशी संबंधित आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.

  • हायकोर्टाने यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनसह सर्व प्रतिवादींना उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी देत या प्रकरणाची सुनावणी 3 एप्रिलपर्यंत तहकूब केली. त्यामुळे टी-20 मुंबई लीगवरील टांगती तलवार तुर्तास तरी टळली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

  • १९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

  • १९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

जन्म

  • १८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

  • १९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

  • १९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

  • १९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

  • १९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

  • १९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.

मृत्यू

  • १२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

  • १७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)

  • १८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)

  • १९१०: समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)

  • १९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)

  • १९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

  • १९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

  • २०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.