चालू घडामोडी - १७ मार्च २०१९

Date : 17 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२०२० मध्ये फिफा अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा भारतात :
  • भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताला २०२० मध्ये होणाऱ्या फिफाच्या अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. शुक्रवारी फिफाकडून ही घोषणा करण्यात आली.

  • मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी भारताने पुरुषांच्या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. भारतात महिलांची अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने फुटबॉलच्या जागतिक नकाशावर भारतीय महिला फुटबॉल संघाला छाप उमटवण्याची संधी आहे.

  • स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने गत अंडर-१७ वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. २०१८ साली उरुग्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करुन जेतेपद मिळवले होते. त्यावेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे  तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.

मनोज वाजपेयी, थिमक्का यांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान :
  • लोकगीत गायिका तीजनबाई, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक, वैज्ञानिक ए. नम्बी नारायणन, अभिनेते मनोज वाजपेयी, ज्येष्ठ पर्यावरणवादी एस. थिम्मक्का यांच्यासह विविध क्षेत्रांतील ५४ मान्यवरांना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. तीजनबाई आणि नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • रा. स्व. संघाचे नेते दर्शनलाल जैन, एमडीएच संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी महाशय धरमपाल गुलाटी, वैद्यकीय व्यावसायिक अशोक लक्ष्मणराव कुकडे, नम्बी नारायण, बचेंद्री पाल आणि माजी महालेखापाल व्ही. के. शुंगलू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, हर्षवर्धन, राज्यवर्धनसिंह राठोड, विजय गोयल, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि ज्येष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

  • अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासह वकील एच. एस. फूलका, शास्त्रज्ञ सुदाम लक्ष्मण काटे, अणुभौतिकी शास्त्रज्ञ रोहिणी मधुसूदन गोडबोले, क्रिकेटपटू गौतम गंभीर, तबलावादक स्वपन चौधरी, पांचजन्यचे माजी संपादक देवेंद्र स्वरूप (मरणोत्तर), जवळपास ६५ वर्षे हजारो वृक्ष लावणाऱ्या आणि त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या वृक्षमाता एस. थिक्कम्मा आदींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मतदानाच्या ४८ तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस बंदी :
  • मतदानाच्या ४८ तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.

  • आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेबाबत कोणताही नियम नव्हता. गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. काँग्रेसने तेव्हा तक्रारही केली होती, मात्र त्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत आचारसंहिता नियम करण्यात आला नव्हता.

  • त्यामुळे आयोग कोणतीही कारवाई करू शकला नाही. मतदानापूर्वी ७२ तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास राजकीय पक्षांना मज्जाव करावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या पथकाने अलीकडेच केली होती.

गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा :
  • गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळली आहे ते सत्ता चालवू शकत नाहीत त्यामुळे हे सरकार बरखास्त करून आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी असं काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटलं आहे. गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनीही मागणी केली आहे.

  • गोव्यात भाजपा सरकार सत्ता चालवण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आम्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष आहोत ही बाब लक्षात घेऊन आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशा संदर्भातले एक पत्र काँग्रेसने राज्यपालांकडे सोपवलं आहे. आम्ही गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलो आहोत आणि हा गोव्यातल्या जनतेचा कौल आहे ज्यावर आपण विचार कराल अशीही विनंती काँग्रेसने केली आहे.

  • दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील वर्षांपासूनच त्यांची प्रकृती वारंवार बिघडली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी राज्याचं बजेटही सादर केलं होतं. मात्र आता काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा करत तसं पत्रच राज्यपालांकडे सोपवलं आहे आणि जनमताचा विचार करावा अशीही मागणी केली आहे.  गोव्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावलेकर यांनीही मागणी केली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठ तास बैठक, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील उमदेवारांच्या नावावर चर्चेसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास आठ तास ही बैठक चालली. पंतप्रधान मोदी स्वतः रात्री 2 वाजता बैठकीतून बाहेर पडले.

  • बैठकीनंतर भाजपची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील जवळपास 180 उमेदवारांचा या पहिल्या यादीत समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या यादील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या उमेदवारांची नावं असण्याची शक्यता आहे.

  • नागपुरातून नितीन गडकरी यांच्या उमेदरवारीची घोषणा आज होऊन शकते. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे देखील निवडणूक लढवण्याची आहे. तसेच या निवडणुकीत सध्या भाजपचे खासदार असलेल्या अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

  • सातत्याने भाजपविरोधी बोलणारे शत्रुघ्न सिन्हा यांच्या जागी रविशंकर प्रसाद यांना पटनातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश पश्चिममधून किरण रिजीजू मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

  • १९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

  • १९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

जन्म 

  • १९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

  • १९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

  • १९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३).

मृत्यू 

  • १२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

  • १८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे१८५०).

  • १९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८९१)

  • १९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

  • १९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.