चालू घडामोडी - १७ मे २०१८

Date : 17 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान :
  • येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी: बंगळुरुसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.

  • आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.  जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.

  • येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

  • यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय :
  • डोंघाय सिटी (द. कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत बुधवारी चीनवर ३-१ ने मात करीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

  • भारताकडून वंदना कटारियाने चौथ्या आणि ११ व्या मिनिटाला गोल केला. वंदनाच्या दोन गोलशिवाय गुरजित कौर हिने ५९ व्या मिनिटाला गोल नोंदविला. आठव्या स्थानावर असलेल्या चीनकडून एकमेव गोल वेन डान हिने १५ व्या मिनिटाला केला. दोन विजयांसह विश्व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला भारतीय संघ पुढील सामना मलेशियाविरुद्ध खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने जपानवर ४-१ असा विजय नोंदविला होता.

  • या स्पर्धेद्वारे मारिन शोर्ड यांनी महिला संघाच्या मुख्य कोचपदाची सूत्रे स्वीकारली. ते गेली सात महिने पुरुष संघाचे कोच होते. गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारतीय पुरुष संघ पदकापासून वंचित राहताच, त्यांची उचलबांगडी करण्यात येऊन महिला संघाची जबाबदारी सोपविण्यात आली.

अभिजित सावंतची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड :
  • लासुर्णे : कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे.

  • सन २०१४ ते २०१८ पर्यंत बेंगलोर, गोंदिया, छत्तीसगढ, पॉण्डेचरी, मॉरिशस, दुबई इ. स्तरावर योगा स्पर्धेत सहभागी होत तालुका, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करीत अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत. सावंत सध्या अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सैनिक शाळेत नुकताच इ. ९वीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.

  • चालू शैक्षणिक वर्षांत १० वीमध्ये शिक्षण घेत योगाचा सराव सुरु ठेवणार असल्याचे सावंतने सांगितले. बालपणापासून आवड असलेल्या योगासनामुळे आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

  • या निवडीबद्दल साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिजित सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, माजी उपसरपंच अंबादास कवळे, पैलवान नितीन माने व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

  • विविध ठिकाणच्या योगा स्पर्धेसाठी विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे, सचिव चिमणभाऊ डांगे, व्यवस्थापक सुनील शिनगारे, प्राचार्य सुभाष पाटील, मुख्याध्यापक महेश जाधव, क्रीडा मार्गदर्शक परेश पाटील, योगा शिक्षक सुशांत घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं - काँग्रेस : 
  • कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.

  • 'जेडीएस आणि काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा केला होता. आम्ही विधीमंडळ सदस्यांच्या नावांची यादीही सुपूर्द केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतही आम्ही राज्यपालांना सोपवली होती. त्यामुळे ते संविधान आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहेत', असं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

  • राज्यपालांच्या निर्णयामुळे कोर्टाचा अवमान झाल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. राज्यपालांवर सरकारचा दबाव असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. मोदींची 'मन की बात' आता 'धन की बात' झाल्याची टीकाही काँग्रेसने केली.

  • 'आम्ही राज्यपालांना पत्र देऊनही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. संविधानाचं उल्लंघन होऊन न देण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होऊ न देणं राज्यपालांच्या हाती आहे' असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले.

शिक्षकांचा अभ्यासक्रमही बदलणार, बीएडच्या अभ्यासक्रमासाठी सामाईक परीक्षा :
  • मुंबई : दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता बीएडच्या अभ्यासक्रमातही २०१८-१९च्या शैक्षणिक वर्षापासून बदल होत आहे. चार आणि तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासाक्रमांसाठी यंदाच्या जून महिन्यात प्रवेश परीक्षा होणार आहे. याशिवाय, यासाठी वेगळी सामाईक प्रवेश परीक्षा राज्याच्या सीईटी सेलमार्फत घेतली जाईल. या संदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच जारी केला. आतापर्यंत बारावीनंतर प्लेन डिग्री व दोन वर्षांचा अभ्यासक्रम होता. आता या प्रवेशाचा स्तर बदलल्यामुळे एक वर्ष वाचणार आहे.

  • महाराष्ट्रात निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये चार व तीन वर्षांचे बीएडचे अभ्यासक्रम राबविले जातात. कोणते अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करायचे हा निर्णय शासन घेते. केंद्र व राज्य सरकारने बीएड अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने, बीएड महाविद्यालयांतील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा सीईटी घेण्यात येणार असल्याची माहिती आयटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. याची सर्व तयारी सीईटी सेलकडून झाल्याचेही त्यांनी सांगितले.

  • त्यासाठी जूनमध्ये होणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येतील. या संदर्भातील सामाईक प्रवेश परीक्षा ७ जुलै रोजी आॅनलाइन घेण्यात येईल.

  • या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश हे केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे एक खिडकी पद्धतीने शासन निर्णयात नमूद आहे. विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण आणि सामाईक प्रवेश प्रक्रियेत मिळालेले गुण यांच्या आधारावर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

सौर, पवनऊर्जा क्षेत्रात मिळणार ३ लाख नोकऱ्या :
  • नवी दिल्ली : भारताने २0२२ पर्यंत सौर व पवनऊर्जा क्षेत्रात १७५ गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यातून ३ लाख कामगारांना रोजगार मिळेल. संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटने’ने (आयएलओ) जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

  • जागतिक रोजगारांबाबत जारी केलेल्या वार्षिक अहवालात आयएलओने म्हटले आहे की, पर्यावरणीय बदलाविरुद्ध लढण्यासाठी सौर आणि पवनऊर्जा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातून रोजगारही निर्माण होईल. पारंपरिक प्रकल्प बंद केल्यामुळे जेवढे रोजगार गमावले जातील, त्यापेक्षा अधिक रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतील. २0३0 पर्यंत जगात २४ दशलक्ष नवी पदे निर्माण केली जातील. मात्र, हे घडून येण्यासाठी हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारी योग्य धोरणे आखली जाणे आवश्यक आहे.

  • ‘वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलूक २0१८ : ग्रिनिंग विथ जॉब’ या अहवालात आयएलओने म्हटले आहे की, भारताने २0२२पर्यंत नवकरणीय स्रोतांद्वारे १७५ गिगावॅट ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • वाढती गरज सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रातील कंपन्या, विकासक आणि उत्पादक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताला हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ३ लाख कामगार लागतील. उद्दिष्टपूर्तीसाठी भूस्थापित सौरप्रकल्प, छतावरील सौरप्रकल्प आणि पवनऊर्जा प्रकल्प यातील कामगारांची संख्या भारताला सातत्याने वाढवावी लागणार आहे.

एसबीआयची २ हजार पदे, १० लाख अर्ज :
  • मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या परीविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी आॅफिसर) पदाच्या २ हजार जागांसाठी तब्बल ९.७५ लाख अर्ज आले आहेत. याचाच अर्थ, एका जागेसाठी सुमारे ५00 अर्ज आले आहेत. बँकेकडून लिपिक पदाच्या ८,३00 जागाही भरण्यात येत असून, त्यासाठी १६.६ लाख अर्ज आले आहेत.

  • एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, परीविक्षाधीन अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त पदवी (ग्रॅज्युएशन) ही आहे. उमेदवाराला लेखी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल.

  • त्यानंतर, त्याला मुलाखत आणि समूह चर्चा यांचा सामना करावा लागेल. लिपिक पदासाठी आलेल्या अर्जापैकी ७0 टक्के उमेदवार इंजिनीअर अथवा व्यवसाय व्यवस्थापन शास्त्रातले (बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत.

दिनविशेष :
  • जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

  • १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

  • १९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

  • १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

  • १९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म 

  • १८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

  • १९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

  • १९४५: लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.

  • १९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८६: डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

  • १९७२: शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

  • १९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

  • २०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.