चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ मे २०१९

Date : 17 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाब्बास प्रियांका! साताऱ्याची लेक 'मकालू'वर पाय रोवणारी पहिली भारतीय महिला :
  • सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने मकालू शिखर सर करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मकालू शिखर सर करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटर्सपेक्षा अधिक असून, ते जगातलं पाचव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे.

  • अष्टहजारी उंची गाठणं इतकं सोपं नाही. मात्र या महाराष्ट्र कन्येने १५ मे २०१९ रोजी मकालू शिखर सर करत हा विक्रम घडवला. प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरं सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलं आहे. प्रियांकाने चढाई केलेलं हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचं तिसरं शिखर ठरलं आहे.

  • प्रियांकाने याआधी अनेक हिमालयीन मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. तिने अनेक उंच शिखरं पादाक्रांत केली आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं होतं. 2018 साली जगातील चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से शिखर सर केलं.

नथुराम गोडसेबद्दलच्या विधानावरुन वाद, साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा :

 

  • भोपाळ : नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने माफी मागितली आहे. "ते माझं वैयक्तिक मत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते," असं साध्वी प्रज्ञा म्हणाली.

  • भाजपने साध्वीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना स्पष्टीकरण मागितलं होतं आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्यास सांगितलं होतं. साध्वीच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपवरही निशाणा साधला होता.

  • प्रज्ञा सिंह काय म्हणाली - आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना साध्वी प्रज्ञा म्हणाली की, "मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादशी संबंधित मला प्रश्न विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो.

  • गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जी पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत."

अध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार :
  • मुंबई : मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची चिन्हं दिसत असतानाचा यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारच्या या अध्यादेशाला खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढताना सरकारने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचादेखील विचार करण्याची मागणी खुल्या वर्गातील पालकांनी केली आहे.

  • खुल्या वर्गातील पालकांच्या मागणीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता मेरिट नुसार प्रवेश द्यावे आणि अध्यादेश काढताना राज्य सरकराने आमच्या वर अन्याय होणार नाही याचा सुद्धा विचार करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालकांनी केली आहे.

  • दरम्यान आज दुपारी 12 वाजता राज्य कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीतच मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल पीजी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. अध्यादेशानंतर मराठा विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता तिथंच त्यांचे प्रवेश कायम राहतील.

  • यावर्षी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील हाच निर्णय कायम ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरेध करत मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने अखेर अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.

आखाती देशांसाठीचे ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ भारतात :
  • दुबई: आखाती देशांमध्ये भारतीय चालकांना असलेली मागणी लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिराती आणि भारत संयुक्तपणे भारतात ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रामुळे आखाती देशात गेल्यावर चालकाला डाव्या बाजूने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा वेळ वाचणार आहे.

  • भारतात गाडय़ांचे स्टीअिरग उजव्या बाजूला असते, तर आखाती देशांतील गाडय़ांचे स्टिअिरग डाव्या बाजूला. त्यामुळे भारतातून आखाती देशांमध्ये चालक म्हणून जाणाऱ्यांना तेथे गेल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागते. यात त्यांना नोकरीवर घेणाऱ्या कंपनीचा आणि चालक म्हणून गेलेल्यांचा वेळ आणि तिथे नव्याने चालक परवाना काढण्याचा पैसाही वाया जातो. तसे होऊ नये म्हणून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

  • भारतात ही चालक प्रशिक्षण केंद्रे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत इमिरेट्स ड्रायव्हिंग इन्स्टिटय़ूट (ईडीआय) आणि युथ चेंबर ऑफ कॉमर्स, युएई (वायसीसी) हे संयुक्तपणे राबवणार आहेत. सुरुवातीला ही केंद्रे उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश येथे उघडण्यात येतील.

  • या केंद्रांद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते आखाती देशांत गेल्यावर कोणतीही चाचणी न घेता तेथील अधिक दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तसेच त्यांचा वेळ आणि पैसा अधिक खर्च न होता त्यांना परवाना मिळेल.

नरेंद्र मोदी यांचे पश्चिम बंगालला प्राधान्य :
  • नवी दिल्ली : लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात ३० पेक्षा जास्त जाहीर सभा, दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात नऊ सभा, महाराष्ट्रापेक्षा सहा जागा कमी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र १७ सभा. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालला अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.

  • उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप यांची आघाडी झाल्याने २०१४च्या तुलनेत कमी जागा मिळतील, असे भाजपचे गणित आहे. ही नुकसानभरपाई कुठून भरून काढता येईल याची चाचपणी भाजपने केली होती. पश्चिम बंगाल आणि ओदिशा या दोन पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगली संधी असल्याचे लक्षात घेऊन भाजपने या दोन प्रांतवर लक्ष केंद्रित केले होते.

  • मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशला प्राधान्य दिले आहे. उत्तर प्रदेशात मोदी यांच्या आतापर्यंत ३१ सभा झाल्या. उद्या प्रचाराची सांगता होत आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात मोदी यांच्या नऊ सभा झाल्या. या तुलनेत ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोदी यांनी आजच्या दोन सभांसह १७ सभा झाल्या. याचाच अर्थ उत्तर प्रदेशनंतर मोदी यांनी सर्वाधिक जास्त वेळ पश्चिम बंगालला दिला आहे.

  • मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागली या राज्यांमध्ये ६५ जागा आहेत. या राज्यांमध्ये मोदी यांच्या २० सभा झाल्या. ४० जागा असलेल्या बिहारमध्ये मोदी यांच्या १० सभा झाल्या. २५ जागा असलेल्या ईशान्येतमोदी यांनी आठ सभांमध्ये भाषणे केली.

दिनविशेष :
  • जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन

महत्वाच्या घटना 

  • १७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.

  • १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

  • १९४०: दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

  • १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

  • १९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

  • १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

  • १९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

  • २००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

जन्म 

  • १७४९: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

  • १८६५: मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

  • १८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

  • १९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

  • १९६६: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

मृत्यू 

  • १८८६: डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

  • १९७२: शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

  • १९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

  • २०१२: अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

  • २०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी१९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.