चालू घडामोडी - १७ नोव्हेंबर २०१८

Updated On : Nov 17, 2018 | Category : Current Affairsकिलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या :
 • व्हर्साय : एक किलोग्रॅम वजन मोजण्याची आजवरची पद्धत रद्द करून किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या करण्यास जगभरातील शास्त्रज्ञांनी शुक्रवारी फ्रान्समधील व्हर्साय येथे पार पडलेल्या वजने आणि मापेविषयक परिषदेत मंजुरी दिली. अतिसूक्ष्म किंवा खूप जास्त वजने मोजताना या नव्या व्याख्येचा फायदा होणार आहे. मात्र त्याने जगभरच्या बाजारांत आणि दैनंदिन व्यवहारांत वापरल्या जाणाऱ्या एक किलोच्या वजनावर काही परिणाम होणार नाही.

 • आजवर आपण एक किलोचे जे वजन वापरत आलो आहोत ते १८८९ साली फ्रान्समध्ये निश्चित करण्यात आले होते. पॅरिसजवळील एका तिजोरीत हा एक किलोचा मूळ प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंच्या मिश्रणातून बनवलेला दंडगोल जतन करून ठेवला आहे. त्याला ग्रँड के असे म्हणतात. त्याच्या सहा प्रतिकृतीही तेथेच आहेत. त्याबरहुकूम सर्व देशांनी आपापली एक किलोची वजने तयार केली आहेत. काही वर्षांनी सर्व देशांना आपापली एक किलोची वजने त्या मूळ एक किलोच्या वजनाशी जुळवून तपासण्यासाठी पाठवावी लागतात.

 • शास्त्रज्ञांच्या मते देशोदेशींच्या वजनांत थोडाफार फरक पडू शकतो. तसेच फ्रान्समधील मूळ किलोच्या दंडगोलातही अनेक वर्षांत अल्पसा बदल होऊ शकतो.

 • धूळ, माती आदी साठून त्याचे वजन वाढू शकते किंवा विघटनामुळे कमी होऊ शकते. हा बदल एक अब्ज भागांत केवळ ५० भागांइतका म्हणजे पापणीच्या केसापेक्षा कमी वजनाचा असेल. आजवर त्याने फारसा फरक पडला नाही. मात्र येथून पुढे हे चालणार नाही. औषधनिर्माण, नॅनो तंत्रज्ञान, सूक्ष्म अभियांत्रिकी अशा क्षेत्रांत अतिसूक्ष्म वजनांचे महत्त्व वाढत आहे. तेथे अल्पसा बदलही चालणार नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ही नवी पद्धत स्वीकारली आहे.

बापरे बाप! १० हजार पदांसाठी तब्बल ९५ लाख ५१ हजार अर्ज :
 • नवी दिल्ली - बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून दरवर्षी लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी संपादन करून नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. सरकारी नोकरीमिळवण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. भारतीयरेल्वेमध्येसध्या सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येत आहे. 

 • 10 हजार जागा रिक्त आहेत मात्र त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही चकीत करणारी आहे. 10 हजार जागांसाठी तब्बल 95 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे इतक्या लोकांची परिक्षा नेमकी कशी घ्यायची असा प्रश्न आता रेल्वेरिक्रूटमेंट बोर्डाला पडला आहे.

 • रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 8,619 आणि सब-इंस्पेक्टर पदासाठी 1120 जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत 95 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर परिक्षेचे नियोजन करणे मोठे आव्हानात्मक काम होणार आहे. यावर मात करण्यासाठी केंद्रीय संगणकीय सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पदाप्रमाणे सिस्टिममध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. याच आधारावर आता परिक्षा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

 • देशभरात आरपीएफच्या जवानांचाही डेटाबेस तयार केला जात आहे. पायलट प्रोजेक्टनुसार आजवर उत्तर आणि पूर्व रेल्वेच्या 9 हजार आरपीएसएफचा डेटाबेस तयार झाला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही मॉनिटरच्या आऊटसोर्सिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉन्स्टेबल पदासाठी महिलांच्या 4216 तर पुरुषांच्या 4403 जागांसाठी एकूण 76.60  लाख अर्ज आले आहेत. तर सब-इंस्पेक्टर पदासाठी महिलांच्या 301 आणि पुरुषांच्या 819 जागांसाठी एकूण 18.91 लाख अर्ज आले आहेत. 

उपांत्य फेरीपूर्वी भारतीय महिलांची आज आॅसीविरुद्ध वर्चस्वाची लढाई :
 • प्रॉव्हिडेन्स (गयाना) : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठण्यात फारशी अडचण आलेली नाही. तथापि शनिवारी भारतीयांना स्पर्धेत सर्वांत कठीण सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. उभय संघांसाठी हा सामना औपचारिक आहे खरा, पण यातून वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

 • जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेले भारत आणि आॅस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक साखळी सामना शिल्लक राखून उपांत्य फेरी गाठली. आॅस्ट्रेलियाला पराभूत केल्यास उपांत्य सामन्यात मनोबल उंचावेल, याची भारताला जाणीव आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून आपला इरादा स्पष्ट केला होता. अनुभवी मिताली राजने दोन अर्धशतके ठोकून आपला दर्जा दाखवून दिला. संघाला गरज असताना मितालीने योगदान दिले हे विशेष.

 • हरमनप्रीतच्या आठ षटकारांना कायम स्मरणात ठेवले जाईल. मितालीने पाक आणि त्यानंतर आयर्लंडविरुद्ध १७ वे टी-२० अर्धशतक ठोकले. आॅस्ट्रेलिया देखील शानदार फॉर्ममध्ये असून पहिल्या सामन्यात पाकवर ५२ धावांनी, आयर्लंडवर नऊ गडी राखून तसेच न्यूझीलंडवर ३३ धावांनी विजय साजरा केला. मेग लानिंग हिच्या नेतृत्वाखालील संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यष्टिरक्षक एलिसा हिली शानदार फॉर्ममध्ये असून गेल्या आठ डावांत सहा अर्धशतके ठोकली आहेत. 

कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात :
 • वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्याने अभूतपूर्व रौद्ररुप धारण केले असून एक अख्खे शहर जळून खाक झाले आहे. या आगीने आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील जवळपास 12 हजार घरे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. अद्याप 631 लोक बेपत्ता आहेत.

 • कॅलिफोर्नियामध्ये आगीपासून लोकांना वाचविण्यासाठी 10 हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र, वेगवान वाऱ्यांमुळे आग वेगाने इतर भागात पसरत आहे. कॅलिफोर्नियातील पॅराडाईज हे शहर पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. हे शहर पुन्हा वसविण्यासाठी काही वर्षे लागणार असल्याचे तेथील अधिकारी सांगतात. 

 • बेपत्ता लोकांच्या शोधासाठी लष्कर आणि श्वानपथकांची मदत घेण्यात येत आहे. या शोधमोहिमेला काही आठवडे लागू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी या भागाचा दौरा करणार आहेत. 

 • 8 नोव्हेंबरला ही आग लागली होती. यानंतर हजारो फोन मदत मिळविण्यासाठी करण्यात आले होते. त्यांची चौकशी करून बेपत्ता लोकांची यादी बनविण्यात आली आहे. 

 • राज्याच्या अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नसले तरीही स्थानिक लोकांनी पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रीक कंपनीविरोधात याचिका दाखल केली आहे. यानंतर कंपनीचे समभाग 31 टक्क्यांन घसरले. 

आंध्रपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयवर बंदी :
 • कोलकाता : सीबीआय विरुद्ध सीबीआय ही लढाई आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी झाली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या देशातली स्वतंत्र तपास यंत्रणा 'सीबीआय'ला काल आंध्रप्रदेश सरकारने जोरदार धक्का दिला. आंध्रमध्ये सीबीआयसाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येदेखील सीबीआयच्या धडक कारवायांवर बंदी घालण्यात आली आहे.

 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्राला मोठा धक्का दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने दिल्ली विशेष पोलीस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगाल सरकारनेदेखील सीबीआयवर बंदी घातल्याने पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमनेसामने आले आहेत.

 • या बंदीमुळे आता आंध्र प्रदेश किंवा पश्चिम बंगाल राज्यांमध्ये सीबीआयला तपास करायचा असेल तर, त्यांना तेथील राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

 • पंतप्रधान मोदींचे केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत राज्यांमध्ये विविध कारवाया करत आहे. त्यामुळे राज्यातील लोकांचा राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत आहे. असे म्हणत विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

नेहरुंमुळे चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना नरेंद्र मोदींचे उत्तर :
 • रायपूर : दोन दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेला मोदींनी आता उत्तर दिले आहे. थरुर यांना उत्तर देताना मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीला लक्ष्य केले. शिवाय काँग्रेसने 70 वर्षांमध्ये केलेल्या कामांचा हिशेब मागितला. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आयोजित एका सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

 • काय म्हणाले मोदी - मोदी म्हणाले की, "मी जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा या लोकांनी (काँग्रेसने) आश्चर्य व्यक्त केले होते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न या लोकांनी उपस्थित केला होता. आता तेच लोक असे म्हणत आहेत की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंमुळे एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला."

 • काँग्रेसचे लोक माझ्याकडून साडेचार वर्षांचा हिशेब मागत आहेत परंतु त्यांच्या मागील चार पिढ्या सत्तेत होत्या. ते लोक त्यांच्या 70 वर्षांचा हिशेब कधी देणार? असा सवालही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

 • काय म्हणाले होते थरुर - देशातल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणे सोपे जाईल, नेहरुंनी अशा प्रकारे देशात संस्थात्मक रचना केली की, प्रत्येकाला त्याची स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले. त्यामुळेच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आहे. इथल्या लोकशाहीला पंडित नेहरुंनी आकार दिला असल्यामुळे इथली लोकशाही टिकवणे सोपे झाले आहे. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथल्या स्वातंत्र्याचे नायक तिथले हुकूमशहा झाले. परंतु नेहरुंनी तसे केले नाही.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षात सातवा वेतनवाढ मिळणार :
 • मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोगानुसार वाढ मिळण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या महिना अखेरपर्यंत सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे 17 लाख कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

 • केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.

 • अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, या समितीच्या अहवालाचं काम जवळपास पूर्ण झालं असून, महिनाअखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर पुढील काम करायला एक महिना पुरेसा आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी केली आहे.

दिनविशेष :
 • जागतिक पूर्व परिपक्वता दिन / आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

महत्वाच्या घटना 

 • १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

 • १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

 • १९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

 • १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

 • १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

 • १९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

 • १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

 • १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

 • १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.

जन्म 

 • १७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)

 • १७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)

 • १९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)

 • १९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१)

 • १९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)

 • १९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

 • १९२५: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८५)

 • १९३२: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)

 • १९३८: लेखक, नाटककार, निर्माते रत्‍नाकर मतकरी यांचा जन्म.

 • १९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.

 • १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

 • १९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८५३)

 • १९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)

 • १९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)

 • २००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)

 • २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९२६)

 • २०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)

 • २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.

 • २०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.

टिप्पणी करा (Comment Below)