चालू घडामोडी - १७ ऑक्टोबर २०१८

Date : 17 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रशांत किशोर जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी :
  • पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना जेडीयूचं राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे आता जेडीयूत क्रमांक दोनचे नेते असतील.

  • 16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला. त्याआधी त्यांन बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जेडीयूला विजय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू बिहारमधून एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे यावेळीही प्रशांत किशोर यांची जादू चालली, तर नितीश कुमार यांची राजकारणातली पत वाढलेच, सोबत प्रशांत किशोर यांच्यावरही आगामी काळात आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात.

  • प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया : जेडीयूमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयानंतर प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की, "जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल." आता त्यांच्याकडे जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

CNN चा सर्वात मोठा सर्वे : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेतील सर्वात मोठं मीडिया हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीएनएनने सर्वात मोठा सर्वे केलाय. अमेरिकेच्या पुढच्या अध्यक्षपदी जनतेची कुणाला पसंती आहे, हे सीएनएनने जाणून घेतले. सर्वेनुसार, सुमारे 42 टक्के अमेरिकन जनतेने ट्रम्पच पुढील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकतील, असा अंदाज व्यक्त केलाय.

  • याआधी मार्चमध्येही असाच सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी 57 टक्के अमेरिकन जनतेने अध्यक्षपदाची पुढील निवडणूक ट्रम्पच जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात सीएनएनने पुन्हा केलेल्या सर्वेमध्येही ट्रम्पनाच पसंती असल्याची दिसून येतंय.

  • आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडन यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकन नागरिकांनी जो बिडन यांनाही मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवलीय. डेमोक्रॅटिक पार्टीत सर्वाधिक पसंतीचे उमेदवारही जो बिडन ठरलेत. त्यांना सुमारे 33 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

  • सर्वेनुसार, अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना 9 टक्के, सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांना 8 टक्के जनतेने पसंती दर्शवलीय.

  • सीएनएन या वृत्तसमूहाने 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान 1,009 सजग नागरिकांशी फोन किंवा प्रत्यक्ष संवाद साधून हा सर्वे केला आहे. एकंदरीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाची पुढील निवडणूकही रंगतदार होईल, एवढे नक्की.

विण चित्रावेलने जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात १२ पदकं :
  • ब्युनोस आयरिस : भारताच्या प्रविण चित्रावेलने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने दुसऱ्या टप्प्यात 15.68 मीटर उडी घेताना हे पदक निश्चित केले.

  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे 12 वे पदक ठरले. भारताने एकूण 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली आहे.

  • प्रविणने पहिल्या टप्प्यात 15.84 मीटर उडी मारली होती आणि त्याने एकूण 31.52 मीटरची नोंद करताना हे पदक जिंकले. क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युन ( 34.18 मी.) आणि नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा ( 31.85 मी. ) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.

जगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा :
  • नवी दिल्ली: जवळपास दोन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर यूट्यूबची सेवा सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास यूट्यूबची सेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांचा खोळंबा झाला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले. अखेर यूट्यूबनं याची दखल घेतली. यानंतर सव्वा आठच्या सुमारास यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली. 

  • सकाळी साडे सहाला यूट्यूबची जगभरातील सेवा ठप्प झाली. त्यामुळे लाखो लोकांना यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. यूट्यूब सुरू करताच वापरकर्त्यांना एरर मेसेज दिसत होता. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. अनेकांनी यूट्यूबवर लॉगईन करण्याचा, व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला. त्यामुळे ट्विटरवर यूट्यूब डाऊन (#YouTubeDOWN) ट्रेंडमध्ये होता.

  • यूट्यूब सुरू करताच दिसणाऱ्या एरर मेसेजचे स्क्रिनशॉट अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले. यानंतर तांत्रिक कारणामुळे सेवेवर परिणाम झाल्याची माहिती यूट्यूबनं दिली. सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू असल्याचं यूट्यूबनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली. 

लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यंदाचा ‘मॅन बुकर’ :
  • इंग्रजी ग्रंथविश्वात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी २० सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. आज पुरस्काराच्या विजेत्याचे नाव लंडनमध्ये जाहीर करण्यात आले.  उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे.

  • अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. अ‍ॅना बर्न्‍स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे. ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदान्शी , अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान यांना पिछाडीवर टाकत अ‍ॅना बर्न्‍स यांनी ५० हजार पौंडांचा हा पुरस्कार पटकावला.

  • अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते .

राम मंदिरासाठी ५४ व्यांदा घेतली ‘भूसमाधी’ :
  • अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मौनी महाराजांनी ५४ व्या वेळी भूसमाधी घेतली. राम मंदिरासाठी केंद्र सरकारवर संत दबाव तंत्राचा वापर करत आहे. अमेठी येथील सगरा पीठाधीश्वर मौनी महाराज यांनी मंगळवारी ५४ व्यांदा भूसमाधी घेतली. ही समाधी तीन दिवसाची आहे. स्थानिक प्रशासनाने मौनी महाराजांना भूसमाधी घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

  • मात्र मौनी महाराजांनी ऐनवेळी भूसमाधी घेण्याची जागा बदलनू चकित केले. कूडबाबा धाम येथे मौनी महाराजांनी भूसमाधी घेतली. महाराजांच्या भूसमाधीनंतर भक्तांनी पूजा सुरू केली आहे. भूसमाधी घेण्यापूर्वी महाराजांनी रामदेव बाबा आणि केंद्र सरकार टीका केली.

  • ‘रामाच्या नावावर भाजपा सरकार राजकारण करत आहे. प्रत्येक निवडणूकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जातो. मात्र काम प्रत्यक्षात राम मंदिर निर्मीतीला कधी सुरूवात होणार. देशाची व्यवस्था, संस्कृतीचा मुद्दा किंवा आणखी काही भाजपा सरकार फक्त घोषणाबाजी करतेय. काम न करता रामदेव बाबा सारख्या संतांना फक्त पुढे करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.’ भूसमाधी घेण्यापूर्वी असे मौनी महाराज म्हणाले.

  • ‘संत भाजपाच्या नव्हे तर रामाच्या मोहामध्ये आहेत. भाजपाने राम, गंगा, गाय, भारत माता, वंदेमातरम, कलम ३७०, हिंदूत्व आणि रामराजाचा दावा केला होता. त्यामुळे संत भाजपाच्या बाजूने उभे राहिले. ज्यावेळी संतांचा भाजपावरील विश्वास उठेल त्यावेळी पक्षाचा सर्वात वाईट दिवस असेल. पाच राज्यातील निवडणूकीत भाजपाला याचा फटका बसेल.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

  • १८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

  • १९३३: अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.

  • १९३४: प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.

  • १९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.

  • १९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

  • १९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल१९२२)

  • १८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

  • १९७०: भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८२: इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८१४)

  • १९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

  • १९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२७)

  • १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

  • २००८:  ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १९२६)

  • २००८: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.