चालू घडामोडी - १७ सप्टेंबर २०१८

Date : 17 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ख्रिस्तियानो रोनाल्डोने ३२० मिनिटांनी नोंदवला पहिला गोल :
  • मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर  संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. इटालियन लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोने या लढतीपूर्वी गोल करण्यासाठी २७ प्रयत्न केले, परंतु त्याला यश मिळाले नव्हते. गतविजेत्या युव्हेंटसने रोनाल्डोच्या या कामगिरीच्या जोरावर २-१ असा विजय मिळवला. 

  • दुसऱ्या सत्रातील पाच मिनिटांनी पाऊलो डिबालाच्या पासवर रोनाल्डोने सीरि ए लीगमधील पहिला गोल केला. या गोलनंतर बऱ्याच कालावधीनंतर रोनाल्डोचा आनंद साजरी करण्याची स्टाईल पाहायला मिळाली. पहिल्या गोलसाठी पोर्तुगालच्या कर्णधाराला ४ सामने, ३२० मिनिट, २७ प्रयत्न प्रतीक्षा करावी लागली. रोनाल्डोच्या गोल करण्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. पण त्याने १५ मिनिटांच्या आत दुसरा गोल करून त्याची गोल्सची भूक संपली नसल्याचा इशारा दिला. 

  • पाचवेळा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोला हॅटट्रिक करता आली नाही. सॅसौलोचा गोलरक्षक अँड्री कोंसिग्लीने त्याचा प्रयत्न अडवला. भरपाई वेळेत सॅसौलोच्या खोउमा बॅबकरने गोल केला. दरम्यान, युव्हेंटसच्या डॉगलस कोस्टाला प्रतिस्पर्धीवर थुंकल्यामुळे रेड कार्ड दाखवण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 68वा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस वाराणसीच्या शाळेतील मुलांसोबत साजरा करणार आहेत. वाराणसीच्या नरउर गावात जाऊन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. याशिवाय आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही मोदी करणार आहे.

  • वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीत त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नरउरच्या प्राथमिक शाळेत स्मार्ट वर्ग सुरू होणार असून त्याची पाहणी मोदी करणार आहेत. चार वर्षाच्या कार्यकाळातील मोदींची आपल्या मतदारसंघातील 14वा दौरा आहे.

  • मोदी जवळपास 19 तास काशीमध्ये असणार आहेत. जुन्या काशीसाठी इंटिग्रेटेड पावर डेव्हलपमेंट स्कीम आणि बीएचयूमध्ये अटल इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सभा या ठिकाणी घेणार आहेत. तसेच काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजाही करणार आहेत.

फोन करा अन् एफआयआर नोंदवा :
  • नवी दिल्ली : सामान्य माणूस पोलिस ठाण्यात न जाताही गुन्ह्यांची तक्रार करू शकतो अशी देशातली पहिल्याच प्रकारची डायल-एफआयआर योजना उत्तर प्रदेश पोलीस लवकरच अमलात आणणार आहेत. त्याशिवाय पोलिसांना २२ हजार नवे आयपॅड देऊन त्यावर सुमारे १ लाख गुन्हेगारांची छायाचित्रांसहित सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

  • यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी १०० नवीन कमांडोना प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यामध्ये महिला कमांडोंचीही एक तुकडी आहे. जोपर्यंत एखाद्या गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदविली जात नाही तोवर त्याचा तपास सुरू होत नाही. उत्तर प्रदेशमध्ये १०० या दूरध्वनी क्रमांकावर दररोज २० हजार तक्रारी केल्या जातात.

  • आॅनलाईन अर्जाची सुविधा हरवले आणि सापडले याबद्दलची तक्रार, मिरवणूकीसाठी परवानगी मिळवणे, कॅरॅक्टर सर्टिफिकेट अशा गोष्टींसाठी आता नागरिकांना पोलिस ठाण्यात यायची गरज नाही तर या साऱ्या सुविधा आॅनलाइन अर्ज भरून नागरिकांना मिळू शकतात. गुन्ह्यांची उकल जलद होण्याकरिता उत्तर प्रदेशमधील तपास अधिकाºयांना २२ हजार नवे आयपॅड गुन्हेगारांच्या माहितीसह देण्यात येईल. अशी सुविधा सर्वप्रथम पंजाबने दिली आहे.

ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न भंगले :
  • मुंबई : रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पूजा धांडाने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

  • आशियाई स्पर्धेतील अपयश मागे टाकून साक्षीने मेदवेद स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तिने उपांत्य फेरीत अजरबैजानच्या एलमिरा गैमबारोवाचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, जेतेपदाच्या लढतीत तिला अपयश आले. हंगरीच्या मारियाना सॅस्टीनने 6-2 अशा फरकाने साक्षीला पराभूत केले. 

  • 57 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने 10-0 अशा फरकाने अमेरिकेच्या केल्सी कॅम्बेलचा पराभव करून भारताच्या खात्यात एक पदक जमा केले.  

नगरमध्ये क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
  • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या खांद्यावरून मारा करण्याच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) शनिवारी नगर येथील के. के. रेंज या चाचणी क्षेत्रात यशस्वी चाचणी घेतल्याचे समजते. या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केल्याचा दावा लष्कराच्या सूत्रांनी केला.

  • संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशस्वी चाचणीबाबत वैज्ञानिक आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी झाली असली तरी त्याच्या विकासाचे अनेक टप्पे अजून  बाकी आहेत. हे क्षेपणास्र कमी वजनाचे आहे. त्याचा मारा खांद्यावरून करता येतो.

  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईलचा वापर पायदळ आणि पॅराशूट बटालियनला करता येईल. यावेळच्या चाचणीत या क्षेपणास्त्राने अधिक अचूकतेने लक्ष्यभेद केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि व्हीईएम टेक्नॉलॉजीज या कंपनीने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र म्हणजे नाग क्षेपणास्त्राचाच एक प्रकार आहे.

  • नाग क्षेपणास्त्रांचा मारा वाहनावरून करावा लागतो आणि हेलिना क्षेपणास्त्र हवेतून सोडले जाते. संरक्षण मंत्रालयाने या वर्षी ३०० नाग क्षेपणास्त्रे आणि २५ प्रक्षेपकांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. त्यांची किंमत ७० दशलक्ष डॉलर्स आहे. २०१५ मध्ये हा क्षेपणास्त्र कार्यक्रम मंजूर केला होता. त्याची रचना या वर्षांच्या अखेरीस निश्चित करण्यात आली. लष्कराला पायदळ आणि इतर विभागांसाठी ४० चाळीस हजार क्षेपणास्त्रांची गरज असून अमेरिकेची जॅव्हलिन क्षेपणास्त्रे भारताने नाकारली आहेत. इस्रायलकडून स्पाइक क्षेपणास्त्र खरेदीचा निर्णय अजून प्रलंबित आहे.

दिनविशेष :
  • मराठवाडा मुक्तिदिन

महत्वाच्या घटना

  • १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.

  • १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

  • १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

  • २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

जन्म

  • १८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

  • १८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

  • १८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

  • १९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

  • १९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

  • १९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

  • १९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)

  • १९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)

  • १९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४)

  • १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)

  • २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.