चालू घडामोडी - १८ एप्रिल २०१८

Date : 18 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लवकरच फेरबदल, भाजपच्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे :
  • जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असून यावेळी भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

  • भाजपच्या सर्व मंत्र्यांनी जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेश अध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.

  • जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजप युतीचं सरकार आहे. मेहबुबा मुफ्ती या तेथील मुख्यमंत्री आहेत. मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत. तसंच त्या जम्मू-काश्मीर पीपल डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षही आहेत.

  • विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने तिथे 25 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसला तिथं फक्त 12 जागांवर विजय मिळवता आला होता.

  • येथील त्रिशंकू अवस्थेनंतर पीडीपीने भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपच्या 9 मंत्र्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, आता फेरबदलाआधी नऊही भाजप मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
  •  मुंबई चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आता एक खिडकी योजना लागू केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भात निर्णय झाला. तसेच, इतरही महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

  • कायम विना अनुदानित शाळा यातून ‘कायम’ शब्द वगळून 2009 पासून 2015 पर्यंतच्या शाळांना काहीच मिळालं नव्हतं. 2 सप्टेंबर 2015 ला निर्णय घेऊन 20 टक्के अनुदान सुरु केलं. 1 आणि 2 जुलैच्या घोषित शाळांपैकी 6,790 शिक्षक आणि 2,180 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाची प्रक्रिया राहिली होती.

  • 65 कोटी दरवर्षी अशी या उर्वरित 8,970 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

  • चित्रपट, जाहिरात, मालिका, लघुपट इत्यादींसाठी सरकारी जागेवर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या आता वेबपोर्टलवर कार्यालयीन 15 दिवसात मिळाव्यात, यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेतला गेला. परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर सात दिवसात जर संबंधित विभागाने परवानगी दिली नाही, तर 15 दिवसानंतर परवानगी मिळाली नसली तरी चित्रीकरणासाठी परवानगी प्राप्त झाली असे ग्राह्य धरण्यात येईल.

यंदाच्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.३% वेगानं वाढणार- वर्ल्ड बँक :
  • नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा 7.3 टक्के इतका राहिल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या परिणामांमधून बाहेर पडली असल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगानं वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. 

  • जागतिक बँकेकडून वर्षातून दोनदा 'साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट' प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग 6.7 टक्क्यांवरुन 7.3 टक्क्यांवरुन जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. याशिवाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदेखील चांगली राहिल, असा अंदाज आहे.

  • जागतिक स्तरावर आर्थिक स्तरावर मुसंडी मारायची असल्यास, भारतानं गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जागतिक बँकेचा अहवाल सांगतो. 

  • नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र या परिणामांमधून अर्थव्यवस्था सावरत असल्याचं जागतिक बँकेनं अहवालात नमूद केलं आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा फटका भारतातील गरिबांना बसल्याचा उल्लेखदेखील अहवालात करण्यात आला आहे. 

पेट्रोलचे दर ९० रुपयांवर जाणार :
  • नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. त्यामुळे सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं पेट्रोल लवकरच 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतं. डिझेलच्या दरातही वाढ होणार असल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच वस्तू महाग होऊ शकतात. 

  • अमेरिकेनं सीरियावर हवाई हल्ला चढवल्यानं मध्य पूर्व आशियातील वातावरण तापलं झालं आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. या घटनांचे परिणाम इंधनाच्या दरांवर होऊ शकतात.

  • सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 71.85 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल इतका आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती पाहता, लवकरच हे दर 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतात. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. जगातील सर्वात मोठी वित्त आणि संशोधन कंपनी असलेल्या जेपी मॉर्गननं याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2014 नंतर प्रथमच इतकी मोठी उसळी घेतली आहे. 

  • 'सीरियामधील स्थिती अतिशय भीषण होती. त्यातच आता अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे ती आणखी बिघडू शकते. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर होऊ शकतो,' असं जेपी मॉर्गन कंपनीनं म्हटलं आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा थेट फटका भारताला बसू शकतो. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 82 रुपये प्रति लिटर इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 80 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्यास पेट्रोल 90 रुपयांवर जाऊ शकतं. 

रिझर्व्ह बँकेतील शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी गेली :
  • मुंबई: ज्यांची आदिवासी म्हणून राखीव पदांवर भरती केली गेली व जातीचा दावा सोडून दिल्यानंतर ज्यांना सर्वसाधारण प्रवर्गाचे कर्मचारी म्हणून नोकरीत कायम ठेवले अशा शेकडो कर्मचा-यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने येत्या दोन महिन्यांत नोकरीतून काढून टाकावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

  • एवढेच नव्हे तर अशा सर्व कर्मचा-यांना यापुढे कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करणे तात्काळ बंद केले जावे व आजवर त्यांना पगारापोटी दिलेली सर्व रक्कम त्यांच्याकडून दोन महिन्यांत वसूल करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. ‘आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन’ व सर्वसाधारण आणि आदिवासी प्रवर्गातील काही कर्मचारी यांनी केलेल्या रिट याचिका मंजूर करून न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या नागपूर येथील खंडपीठाने हा निकाल दिला.

  • या कर्मचाºयांनी आदिवासींसाठींच्या राखीव पदांवर भरती झाल्याने कायद्यानुसार जातीच्या दाखल्याची पडताळणी करून घेणे बंधनकारक होते. परंतु नोकरीस लागल्यानंतर त्यांनी आदिवासी असल्याचा दावा सोडून दिल्याने त्यांच्या जातीच्या दाखल्यांची कधीही पडताळणी केली गेली नाही.

  • जातीचा दाखला पडताळणीनंतर अमान्य केला जाणे आणि दाखल्याची पडताळणीच करून न घेणे या दोन्हींचा परिणाम एकच आहे. परिणामी मुळची नेमणूकच अवैध ठरत असल्याने अशा कर्मचाºयांना आदिवासी न मानता सर्वसाधारण प्रवर्गाच्या पदांवरही नोकरीत कायम ठेवले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

नोटाटंचाई की छुपी नोटाबंदी? दोन हजारांच्या नोटा अनेक राज्यांतून गायब :
  • नवी दिल्ली : नोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,००० रुपयांच्या नोटांसह अन्य नोटाही गायब झाल्या आहेत.

  • कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजधानी दिल्लीच्या काही भागांत तीव्र नोटाटंचाई निर्माण झाली आहे. लोक समाजमाध्यमांतून याबाबत आवाज उठवित आहेत. सणामुळे नोटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे रिझर्व्ह बँकेने एका वृत्तवाहिनीला सांगितले.

  • केंद्रीय वित्त राज्यमंत्री एस.पी. शुक्ला यांनी सांगितले की, आज घडीला १,२५,००० कोटी रुपयांच्या नोटा आमच्याकडे आहेत. समस्या अशी आहे की, काही राज्यांत नोटा कमी आहेत, तर काहीमध्ये जास्त आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोटा पाठविण्यासाठी सरकारने राज्यनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनेही एक समिती बनविली आहे. तीन दिवसांत समस्या दूर होईल.

  • राज्यात खडखडाट अन् रांगा राज्यात मंगळवारी काही ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट होता तर काही ठिकाणी एटीएमबाहेर रांगा लागल्या होत्या. ठाण्यात अनेक ठिकाणी नोटांची चणचण जाणवली. पैसे काढण्यासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या. जळगाव, नाशिकमध्ये चलन टंचाई जाणवली. मराठवाड्यातही दोन दिवसांपासून टंचाई आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

  • १७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

  • १७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

  • १९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.

  • १९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.

  • १९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

  • २००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.

जन्म

  • १७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)

  • १८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड)

  • १९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)

  • १९५८: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)

  • १९६२: हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.

  • १९९१: डॉ. वृषाली करी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.

  • १८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा. (जन्म: २४ जून १८६९)

  • १९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८४९)

  • १९५५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन.

  • १९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ – डभई, गुजराथ)

  • १९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

  • १९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.

  • १९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)

  • २००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.

  • २००२: नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.