चालू घडामोडी - १८ ऑगस्ट २०१८

Date : 18 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोची विमानतळावर दाखल :
  • तिरुवनंतपुरम - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. तेथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेरळमधील कोचीमध्ये दाखल झाले आहेत. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यावर केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. 

  • तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.

  • दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपल्या सद्भावना केरळवासियांसोबत असल्याचे म्हटले आहे. केवळ शब्दांनी सांत्वन करणे पुरेसे नाही. केरळच्या बंधुभगिनींसाठी आम्ही प्रार्थना करतोय. महापुराशी लढणाऱ्या केरळवासियांना ताकद मिळो, अशा शब्दांत ममता यांनी दुख: व्यक्त केले आहे. 

  • तर जेएनयु विद्यार्थी संघटनेने आज सकाळी गृहमंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जाणूनबुजुन केरळच्या पुरग्रस्तांना मदत करण्यास वेळ लावत असल्याचा आरोप केला आहे. 

इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे आज शपथ घेणार आहेत. शुक्रवारी संसदेमध्ये त्यांना देशाचा 22 वा पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. 

  • पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान यांच्या पीटीआयला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी काल इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यांच्याविरोधात माजी पंतप्रधान व सध्या तुरुंगात असलेले नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ उभे राहिले होते. मात्र, इम्रान यांना 176 मते पडली. यामुळे विरोधकांनी अध्यक्षांचा हा निर्णय मंजून नसल्याचा घोषणा दिल्या. 

  • पाकिस्तान पिपल्स पार्टी हा संसदेमध्ये तिसरा मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांनी शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन देण्यास नकार दिला. तसेच मतदानावर बहिष्कार टाकला. 

  • इम्रान खान यांनी प्रचारावेळी शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता. तसेच निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास आणण्याचे सांगितले होते. तसेच देशाबाहेर गेलेल्या संपत्तीला परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. 

IRCTC वरून तिकीट काढताना पेमेंटचा नवा पर्याय :
  • नवी दिल्ली - प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा आयआरसीटीसी आणि फोनपे यांच्या भागिदारीने सुरू होत आहे. रेल्वे प्रवाशांना 'रेल कनेक्ट अँड्रॉईड अॅप'वरुन ही सेवा उपलब्ध होत असून याद्वारे लवकरात लवकर तिकिटाचे डिजिटल बुकिंग करता येईल. विशेष म्हणजे सहजपणे रेल्वेच्या प्रवाशांना हे तिकीट बुकिंग करता येईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

  • फोन पे कंपनीने गुरुवारी आयआरटीसीसोबत यासंदर्भात करार केला आहे. डिजिटल पेमेंटचा वापर कर्त्यांसाठी ही सुविधा वरदान असल्याचे Phone Pay ने म्हटले आहे. या भागिदारीमुळे Phone Pay युजर्स युपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्डऐवजी फोन पे वॉलेटद्वारे तिकिटाचेबुकिंग करु शकणार आहेत.

  • तर, फोन पे द्वारे थेट युजर्सच्या बँक अकाऊंटवरुनही या सुविधेसाठी पैसे जमा केले जाऊ शकतात. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकींगसाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे. तर डिजिटल इंडियामध्ये भारतीय रेल्वेचा हिरिरीने सहभाग होत आहे, या दोन बाबी या भागिदारीमुळे शक्य झाल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी आयआरसीटीसीने ई-वॉलेट सेवा सुरु केली आहे. ज्याद्वारे रेल कनेक्ट अॅपच्या सहाय्याने तत्काळ तिकीटाचे बुकिंग करता येऊ शकते. 

मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर :
  • १९९१च्या आर्थिक उदारीकरणानंतर मनमोहन सिंग सरकारच्या काळतील आर्थीक वर्ष २००६-०७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने १०.०८ टक्क्यांचा विकास दर गाठला होता. तर, स्वातंत्र्यानंतर १९९८-८९ मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात सर्वाधिक १०.२० टक्के विकास दर गाठला होता, ही ताजी माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वेबसाईटवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • राष्ट्रीय सांख्यिकी आयोद्वारे स्थापलेल्या वास्तविक क्षेत्र सांख्यिकी समितीद्वारे जीडीपीच्या आधारे जुनी आकडेवारी तयार करण्यात आली आहे. या अहवालात विकासदराबाबतची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. या अहवालात विकास दराची तुलना २०११-१२ या काळातील किंमतींच्या आधारे करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

  • जुन्या (२००४-०५) मालिकेनुसार सन २००६-०७ दरम्यान जीडीपीमध्ये निश्चित किंमतीचा विस्तार ९.५७ टक्के होता. या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यानंतर नव्या मालिकेनुसार (२०११-१२) हा विकास दर १०.०८ टक्के नोंदवण्यात आला होता.

  • तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी सुरु केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या कार्यक्रमानंतर देशात हा सर्वाधिक विकास दर नोंदवला गेला आहे. त्यानुसार मागच्या मालिकेतील आकडेवारी अखेर बाहेर आली आहे. यावरुन काँग्रेसने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, युपीए सरकारच्या धोरणांनी (१० वर्षात ८.१ टक्के विकास दर) अर्थव्यवस्थेत मोदी सरकारच्या धोरणांपेक्षा (विकास दर ७.३ टक्के) चांगली कामगिरी नोंदवली आहे.

जपानच्या पंतप्रधानांनी वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली; मोदींना पाठवला शोकसंदेश :
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. ‘वाजपेयी जपानचे चांगले मित्र होते’, अशा शब्दांत त्यांनी वाजपेयींबद्दल गौरवौद्गार काढले. जपानप्रमाणेच इस्रायल, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मॉरिशस आदी देशांमधूनही वाजपेयींना श्रद्धांजली वाहणारे संदेश आले आहेत.

  • अबे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या बातमीने मला आतीव दुःख झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका संदेशाद्वारे अबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संदेशाची एक प्रत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे.

  • या संदेशात अबे यांनी वाजपेयींच्या २००१ मधील जपानच्या भेटीबाबत उल्लेख केला आहे. ते म्हणतात, भारताच्या या नेत्याचे जपान आणि भारतादरम्यान मैत्री निर्माण करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. ते जपानचे चांगले मित्र होते. त्यामुळे जपान-भारताच्या आजच्या मैत्रीचा ते कोनशिला ठरले आहेत. अशा आमच्या मित्राच्या आत्माला शांती लाभो अशी मी माझ्या अंतःकरणातून प्रार्थना करतो, असे अबे यांनी संदेशात म्हटले आहे.

  • दीर्घ काळापासून आजारी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३व्या वर्षी गुरुवारी (दि. १६) अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या ‘राष्ट्रीय स्मृती स्थळ’ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी आणि नागरिकांनी हजेरी लावली होती.

४५ देश, ३६ खेळ, ५७२ खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक :
  • इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात आयोजित अठराव्या एशियाडसाठी भारताचं 572 खेळाडूंचं पथक सज्ज झालंय. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. त्यानंतर आता एशियाडमध्येही भारतीय पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे.

  • एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडामेळा. ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येतं. आशिया खंडातल्या तब्बल 45 देशांचा एशियाडमध्ये सहभाग असतो. ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे.

  • इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबान्ग शहरांमध्ये यंदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जकार्तासह पालेमबान्ग शहरातही एशियाडच्या काही क्रीडाप्रकारांचं आयोजन करण्यात येईल. इंडोनेशियातल्या अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील. त्यासाठी 45 देशांमधले हजारो खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध झाले आहेत.

  • आपला भारत आणि एशियाडचं भावनिक नातं आहे. भारतानं आजवर दोनवेळा एशियाडचं यशस्वी आयोजन केलं आहे. 1951 साली म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारतात पहिल्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत एशियाडचा हा मेळा संपन्न झाला होता. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.

  • १९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.

  • १९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.

  • १९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.

  • १९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.

  • १९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई..

  • २००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.

जन्म

  • १७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)

  • १७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.

  • १८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)

  • १९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)

  • १९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)

  • १९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.

  • १९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.

  • १९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८८६: मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७९५)

  • १९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१)

  • १९४०: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८७५)

  • १९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)

  • १९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)

  • १९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)

  • २००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)

  • २००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.

  • २०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.