चालू घडामोडी - १८ डिसेंबर २०१८

Date : 18 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा :
  • मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा आयोगाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • यंदा (राज्यसेवा २०१८) विविध गटातील ३३९ पदे असून त्यातील १६९ पदे ही ‘अ’ गटातील आहेत. पूर्वपरीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्यात आली असून १७ फेब्रुवारीला पूर्वपरीक्षा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र हे ऑनलाईन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • आगोगाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना मराठा समाजातील मुलांना सामाजित व शैक्षणिकदृष्ट्या मागास(एसईबीसी)ची नोंद करताना त्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले जाते. मात्र हे प्रमाणपत्र उमेदवारांना त्यांच्या मुळ गावीच काढणे बंधनकारक असल्याने त्यांची पर्तूता करून एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी येत असल्याने काही उमेदवारांनी खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. तेथेही हिन्दु मराठा असा अर्जात उल्लेख करताच  एसईबीसीच्या प्रमाणपत्राची मागणी  होत असून त्यापुढे अर्जच भरता येत नसल्याने उमेदवार हवालदील  झाले आहेत.

  • आयोगाने दखल घेत मराठा समाजातील मुलांना त्यांची वर्गवारी स्वत:च्या स्तरावर बदलण्याची सुविधा दिली आहे. ऑनलाईन अर्जप्रणालीवरीस उमेदवाराच्या खात्यामधील अराखीव असे नमुद केलेला दावा एसईबीसी प्रवर्गामध्ेय उमेदवारांना स्वत:च्या स्तरावर  बदला येईल. 

  • बदल करताना उमेदवाराला सद्यस्थितीत जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक, जिल्हा, दिनांक इत्यादी तपशील नमुद न करता वर्गवारी तात्पुरत्या स्वरूपात बदलता येईल. त्यासाठी उमेदवाराने राज्यातील अधिवासाबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अधिवासाचा दावा ‘होय’ असेल तरच वयोमर्यादेतील आणि परीक्षा शुल्कातील सवललतींचा फायदा घेता येईल . त्यामुळे जातप्रमाणत्र नसलेल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातून अर्ज भरता येईल.

मालदीवला भारताकडून १.४ अब्ज डॉलरची मदत :
  • नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला १.४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारत आणि मालदीवने हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्याचा संकल्प जाहीर केला. व्हिसा सुलभीकरणासह दोन्ही देशांमध्ये एकूण चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

  • तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर सोली रविवारी भारतात दाखल झाले. महिन्याभरापूर्वी मालदीवच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडली. द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असे पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • आम्हाला मालदीवबरोबर चांगले व्यापारी संबंध हवे आहेत. भारतीय कंपन्यांना मालदीवमध्ये चांगली संधी आहे. परस्परांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांसाठी आम्ही आमच्या देशाचा वापर करू देणार नाही, असेही मोदींनी सांगितले. मालदीवमधल्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताकडून १.४ अब्ज डॉलरचे आर्थिक साहाय्य मोदींनी जाहीर केले.

  • मालदीवच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी चिनी कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगात मालदीवला सर्वात जास्त विश्वास भारतावर आहे. मालदीवच्या आधीच्या अध्यक्षांनी चीनला झुकते माप देऊन भारतविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. चीनच्या महत्त्वाकांक्षा पाहता रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी मालदीव महत्त्वाचा देश आहे.

मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यांना आधार जोडणी अनिवार्य नाही :
  • मोबाइल फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य असणार नाही. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने किमान तीन कायद्यांमध्ये तशा अर्थाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच ग्राहकांना ही सेवा घेताना दुसरं ओळखपत्र सादर करण्याची मुभाही देण्यात आली आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालात आधारच्या घटनात्मक वैधतेला मान्यता दिली होती. मात्र खासगी कंपन्या त्यांच्या सेवा देण्यासाठी किंवा ग्राहकांना त्या सेवा घेण्यासाठी आधार क्रमांकाची किंवा आधारच्या माहितीची सक्ती करु शकत नाहीत असे म्हटले होते.

  • या निकालाला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्तावाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आधार कायद्यातील अनुच्छेद 57 रद्द करण्यात येईल. तसंच टेलिग्राफ कायदा आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टमध्ये (पीएमएलए) दुरुस्त्या करण्यात येतील.

अशोक गेहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :
  • जयपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करत काँग्रेसने राजस्थानमध्ये बहुमत मिळवले. काँग्रेसने राजस्थानमध्ये आज सत्ता स्थापन केली असून अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपूरच्या अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

  • राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर तरुण आमदार सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला.

  • या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन उपस्थित होते.

मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी :
  • रायपूर : सत्तेवर येताच आज सायंकाळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी घोषित केली. त्यानंतर काहीच तासांत छत्तीसगडमध्येदेखील कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे. छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या कर्जमाफीची घोषणा केली आहे.

  • भुपेश बघेल यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही वेळात त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली. या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला 2500 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधी धान्याला प्रति क्विंटल 1700 रुपये इतका भाव मिळत होता. तसेच झीरम हल्यामध्ये शहीद झालेल्यांना न्याय देण्यासाठी एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) तयार केली जाईल, अशी घोषणादेखील बघेल यांनी केली आहे.

  • कमलनाथ याबाबत म्हणाले की, "आमच्या पक्षाने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता करत आहोत. राज्यभर तब्बल 61 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला आम्ही चांगला हमीभाव देणार आहोत.

पदच्युत केलेले विक्रमसिंघे पुन्हा पंतप्रधान, भारताकडून स्वागत :
  • कोलंबो : संसदेत बहुमत असूनही राष्ट्राध्यक्षांनी व्यक्तिगत हेव्यादाव्यांमुळे मनमानी पद्धतीने पदच्युत केलेल्या रनिल विक्रमसिंघे यांनी रविवारी पुन्हा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. यामुळे या देशात गेले ५१ दिवस निर्माण झालेले घटनात्मक संकट संपुष्टात आले असून, शासनाचा गाडा पुन्हा रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.

  • युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते असलेल्या ६९ वर्षांच्या विक्रमसिंघे यांना राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळातील अन्य ३० मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी होईल, असे समजते. त्यात श्रीलंका फ्रीडम पार्टीचे सहा मंत्री असतील.

  • गेल्या आॅक्टोबरमध्ये राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी अचानक विक्रमसिंघे यांना पदच्युत करून त्यांच्याजागी आपल्या मर्जीतील महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान नेमले होते; परंतु राजपक्षे यांना संसदेत बहुमत जिंकणे अशक्य झाल्यावर राष्ट्राध्यक्षांनी संसद विसर्जित करून जानेवारीत नव्याने निवडणुका जाहीर केल्या होत्या. राष्ट्राध्यक्षांच्या या मनमानीला विक्रमसिंघे व त्यांच्या मित्रपक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

  • न्यायालयाने संसद विसर्जित करण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द केला व राजपक्षे यांनाही पंतप्रधान म्हणून काम करण्यास मनाई केली. त्यामुळे विक्रमसिंघे यांना पुन्हा सत्तेवर बसविण्याखेरीज राष्ट्राध्यक्षांपुढे अन्य पर्याय राहिला नाही. राजपक्षे यांनीही शनिवारी स्वत:हून पंतप्रधानपद सोडले व विक्रमसिंघे यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले.

  • १९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.

  • १९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

  • २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

  • २०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.

जन्म 

  • १६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १६६८)

  • १८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)

  • १८७८: सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १९५३)

  • १८८७: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९७१)

  • १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)

  • १९४६: ड्रीमवर्क्सचे सहसंस्थापक स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांचा जन्म.

  • १९७१: पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.

  • १९७१: स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ यांचा जन्म.

मृत्यू

१९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी  यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८)

१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)

१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.

२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.

२०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.