चालू घडामोडी - १८ फेब्रुवारी २०१९

Date : 18 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कुलभूषण जाधव प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून सुनवाणी :
  • दि हेग : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. कुलभूषण जाधव कथित हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. आज भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडतील.

  • पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आतंरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

  • आजपासून दि हेगमध्ये या प्रकरणावर सुनवणी होणार आहे. 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीदरम्यान ही सुनावणी होणार आहे. भारताकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीश साळवे आतंरराष्ट्रीय न्यायालयात भारताकडू बाजू मांडतील. 19 फेब्रुवारीला खावर कुरेशी पाकिस्तानकडून बाजू मांडतील.

  • त्यानंतर भारत 20 फेब्रुवारीला आपलं उत्तर देईल. त्यानंतर 21 फेब्रुवारील अखेरची सुनावणी पार पडेल. त्यानंतर एक-दोन महिन्यांनंतर या प्रकरणावर निकाल येणं अपेक्षित आहे.

सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण :
  • सीआरपीएफने केलेल्या जम्मू-श्रीनगर सेक्टरमध्ये हवाई मार्गाच्या (एअर ट्रान्सिट) मागणीकडे केंद्रीय गृह खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, या बातम्यांचा गृह खात्याने इन्कार केला आहे. अशा प्रकारे सीआरपीएफला परवानगी नाकारण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

  • गृह खात्याच्या सुत्रांनी ‘द ट्रिब्युन’ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून गृह खात्याकडून सर्व केंद्रीय सशस्त्र अर्धसैनिक दलांच्या प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी अधिकाधिका हवाई प्रवास उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्मीर सेक्टरमध्ये जवानांसाठीची ही सेवा आधीपासूनच सुरु आहे. मात्र, काही काळासाठी ती बंद ठेवण्यात आली होती. सुरुवातीला जम्मू-श्रीनगर-जम्मू सेक्टरमध्ये ही हवाई प्रवासाची सेवा दिली जात होती. मात्र, डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय दलांच्या विनंतीनुसार, ही सेवा दिल्ली-जम्मू-श्रीनगर-जम्मू-दिल्ली पर्यंत आठवड्यातून सात फ्लाईट इतकी वाढवण्यात आली.

  • त्याचबरोबर ज्यावेळी गरज पडेल तेव्हा हवाई दलाकडूनही यासाठी सहकार्य केले जाते. अशा प्रकारे हवाई दलाने जानेवारी २०१९ मध्ये सीआरपीएफला मदतही केली आहे. लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल कारणांसाठी रस्ता मार्गाने जवानांचे जत्थे रवाना केले जातात. भविष्यातही ते केले जातील, लष्करालाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे गृह खात्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

  • काश्मीर खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांत सुरु असलेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने सीआरपीएफचे शेकडो जवान येथे अडकून पडले होते. त्यातच जवानांचा एक जत्था ४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर बाहेर पडला होता. काश्मीर खोऱ्यातून प्रवास करणे हे मोठे जोखमीचे काम असल्याने आम्ही कायम आमच्या सुरक्षेबाबत अलर्ट असतो. 

आंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित :
  • भारताने आंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात अमेरिका, जर्मनी आणि रशियासहित अनेक देशांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या तीन दिवसीय संमेलनाची रविवारी सांगता झाली. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

  • भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले की, ५५ व्या म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताचे उप सुरक्षा सल्लागार पंकज सरन यांनी सहभाग घेतला होता. या संमेलनात विविध देशांतील ६०० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादासहित सुरक्षासंबंधी विविध मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. या संमेलनात जागतिक नेते आणि संपूर्ण जगभरातील सुरक्षातज्ज्ञांनी भाग घेतला होता.

  • यावेळी सरन यांची इतर अनेक देशांच्या प्रतिनिधींसोबत द्विपक्षीय बैठक पार पडली. या देशांनी पुलवामात सीआरपीएफच्या जत्थ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला. तसेच या शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

  • अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिका, जर्मनी, रशिया, नाटो, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, मंगोलिया, अर्मेनिया आणि ओमानच्या प्रतिनिधींसोबत भारताची द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी भारताच्या जमिनीवर सुरु असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांबाबत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली. याला या बैठकीत व्यापक समर्थन मिळाले.

सरकारी नोकऱ्या मिळणे अवघड, सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढा - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील :
  • सांगली : संगणकीकरणामुळे दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. सरकारी नोकरी लागतेच कशाला? असा सवाल करत तरुणांनी स्वतः रोजगार निर्माण केला पाहिजे असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते आज सांगलीमध्ये  महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते.

  • सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत मोफत नोकरी, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्याचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

  • याप्रसंगी बोलताना महसूल मंत्री  पाटील यांनी तरुण-तरुणींनी सरकारी नोकरी ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे.  वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण आहे, असंही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर तरुणांनी येतात खाजगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे. खाजगी क्षेत्रातील कायद्यामुळे आता नोकरदाराला कामावरून काढणे सोपे राहिले नाही. त्यामुळे खाजगी नोकरी केली पाहिजे आणि यातून मिळणाऱ्या पैशांतून बचत करून गुंतवणूक केल्यास सरकारी नोकरीपेक्षा फायदाचे ठरेल, असंही ते म्हणाले.

  • आज गुंतवणूकीसाठी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी लागते कशाला? असा सवाल मंत्री पाटील यांनी उपस्थित केला.

२०१९ च्या विश्वचषकानंतर ख्रिस गेल होणार ODI मधून निवृत्त :
  • वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्ती जाहीर आहे. वेस्ट इंडिजची इंग्लंड विरोधातील एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारीच ख्रिस गेलने ही घोषणा केली. वेस्ट इंडिज क्रिकेटनेही ट्विटरवरून ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे.

  • ३९ वर्षांच्या ख्रिस गेलने आत्तापर्यंत २८४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ३७.१२ च्या अॅव्हरेजने त्याने ९ हजारांच्या वर धावा केल्या आहेत. २३ शतकं आणि ४९ अर्धशतकं गेलच्या नावावर जमा आहेत. २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरोधात ख्रिस गेलने २१५ धावा केल्या होत्या.

  • विश्वचषकातली ही त्याची पहिली द्विशतकी खेळी होती. कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक झळकवाणारा ख्रिस गेल हा जागतिक क्रिकेटमधला एक उत्कृष्ट खेळाडू आहे. १०३ कसोटी सामने आणि ५६ टी २० सामनेही गेल खेळला आहे.

शाळा-महाविद्यालयांत वर्षांतून एकदाच क्रीडादिवस का :
  • अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षांतून एकच दिवस वार्षिक क्रीडा दिन साजरा केला जातो; पण भारताला क्रीडा क्षेत्रातही सक्षम राष्ट्र बनवायचे असेल तर फक्त एक दिवस क्रीडा दिन साजरा करून चालणार नाही. क्रीडा आणि खेळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात केले.

  • गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी जवळपास ८८ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना २०१७-१८ वर्षांसाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन राज्यपाल तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मल्लखांब या खेळाचा जगभर प्रसार करणारे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, कबड्डीपटू सायली केरीपाळे, टेनिसपटू ऋतुजा भोसले, धावपटू मोनिका आथरे, कुस्तीपटू उत्कर्ष काळे, बॅडमिंटनपटू नेहा पंडित यांच्यासह अनेक अव्वल खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • राज्यपाल म्हणाले की, ‘‘भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन महिन्यांपूर्वी माझी भेट घेऊन राज्यात ‘तंदुरुस्त भारत’ आणि ‘सांघिक युवा’ हे दोन उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. प्रत्येक मुलाने, विद्यार्थ्यांने तसेच प्रत्येक युवकाने दररोज किमान एक तास तरी खेळण्याचा सराव करावा, असेही सचिन यांनी सुचवले. एका भारतरत्न पुरस्कारविजेत्या खेळाडूने दिलेल्या सल्लय़ाशी मी पूर्णपणे सहमत असून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात दररोज एक तास घालवण्यास मी प्रोत्साहित करण्यासाठी पालक आणि शिक्षकांना आवाहन करीत आहे.’’

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

  • १९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

  • २००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १८२७)

  • १८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर१८९२)

  • १८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

  • १८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३)

  • १८९८: फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)

  • १९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०००)

मृत्यू 

  • १४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६)

  • १९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४)

  • १९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)

  • १९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.