चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१८

Date : 18 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा आज मुंबई दौरा :
  • मुंबई - मुंबईतील यहुदी समाजाची भेट घेण्यासह बॉलिवूडला जवळून पाहण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून गुरुवारी (18 जानेवारी) मुंबई दौ-यावर आहेत. गुजरात दौरा बुधवारी (17 जानेवारी) पूर्ण केल्यानंतर, संध्याकाळी ते मुंबईला पोहोचले. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आले.

  • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक ठिकाण असलेल्या नरिमन हाऊस येथील छाबड सेंटरलाही नेतान्याहू भेट देणार आहेत. हॉटेल ताजमध्ये यहुदी समाजाच्या काही प्रतिष्ठित लोकांना भेटून, त्यांच्यासोबत ते 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छाबड सेंटरला भेट देतील. तिथे ते मोशे होल्ट्जबर्गला भेटणार आहेत. यावेळी छाबड सेंटरमध्ये उभारलेल्या संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

  • दरम्यान, मुंबईतील बॉलिवूड नगर पत्नीसह पाहण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे शालोम बॉलिवूड या कार्यक्रमात सामील होणार आहेत.

  • यहुदी समाजासोबतच देशातील प्रमुख उद्योगपतींनाही नेतान्याहून भेटणार आहेत. त्याप्रमाणे ते विविध ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे. नेतान्याहू यांच्या भोजनाची व्यवस्था खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. 

७० वस्तू-सेवांवरील जीएसटी होणार कमी :
  • नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढत असतानाच, आणखी ७० वस्तू व सेवांवरील ‘जीएसटी’चा दर कमी केला जाण्याचे संकेत मिळाले आहेत. यात ४० सेवा आणि कृषीशी संबंधित काही वस्तूंचा समावेश असेल. करनिर्धारण समितीने करकपातीची शिफारस केली असून, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणाºया जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

  • केंद्रीय अर्थसंकल्प १५ दिवसांवर आलेला असताना, हा करकपातीचा निर्णय झाला, तर तो लक्षणीय ठरेल. या आधी बºयाच अडचणी समोर आल्यानंतर व टीका झाल्यानंतर, जीएसटी परिषदेने १७८ वस्तूंवरील कराचे दर कमी केले होते. त्याचा परिणाम जीएसटीची वसुली घटण्यात झाला.

  • गुरुवारच्या बैठकीत ई-वे विधेयकाचा मसुदा मांडला जाण्याचीही शक्यता आहे. या विधेयकाला भाजपाची सत्ता असलेली राज्ये पाठिंबा देणार आहेत व ते संमत करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे.

  • रिटर्नची पद्धतही बदलणार - जीएसटी विवरणपत्र भरण्याची पद्धतही बदलण्याचा विचार सुरू आहे. सध्या ३ टप्प्यांत विवरणपत्र भरले जाते. ते एकाच टप्प्याचे करण्याचे घाटत आहे. वेगवेगळी राज्ये आणि शहरांतून सेवा देणाºयांना या बदलाचा फायदा होईल.

  • फायलिंगची संख्याही १२ वर मर्यादित करण्याचा विचार केला जात आहे. याशिवाय नैसर्गिक वायू आणि जेट इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार जीएसटी परिषद करीत आहे. पेट्रोल, डिझेल आणि वीज यांना जीएसटीच्या कक्षेत आणले जाण्याची शक्यता मात्र कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मध्यावधी झाल्यास रजनीकांत यांच्या पक्षाला ३३ जागा :
  • चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला, तरी तामिळनाडूत लगेच निवडणूक झाल्यास, त्यांना केवळ १६ टक्के मिळतील, असे सर्व्हेतून समोर आले आहे.

  • ‘इंडिया टुडे-कार्वी’च्या सर्वेक्षणानुसार द्रमुकचे पारडे असेल. रजनीकांत यांच्या पक्षाला फक्त ३३ जागा मिळतील. मे २०११ पासून विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक आणि मित्र पक्षांसाठी मध्यावधी निवडणूक फायदेशीर ठरेल. रजनीकांत यांच्या पक्षापेक्षा द्रमुकला (डीएमके) दुपटीने म्हणजे ३४ टक्के मते मिळतील.

  • मुख्यमंत्री म्हणून द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना ५० टक्के लोकांनी पसंती दिली असून, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रजनीकांत १७ टक्के लोकांच्या पाठिंब्यासह दुसºया क्रमांकावर आहेत.

  • उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री म्हणून ११ टक्के लोकांनी पाठिंबा दिला असून, विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी फक्त ५ टक्के लोकांचाच पाठिंबा मिळाला आहे.

अनाथांनाही मिळणार आता सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण :
  • मुंबई : राज्यातील अनाथ मुलांना शासकीय नोक-यांमध्ये खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

  • एमपीएससी परीक्षेत पास होऊनही खुल्या प्रवर्गात दाखविली गेल्याने, अनुत्तीर्ण ठरविण्यात आलेल्या अमृता करवंदे या तरुणीने ‘अनाथांची जात कोणती?’ असा आर्त सवाल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी केला होता.

  • बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र असलेली मुलेच आरक्षणासाठी पात्र असतील. शासन निर्णय लागू झाल्याच्या दिनांकापासून पुढे होणा-या सरळसेवा भरतीसाठी आजचा निर्णय लागू राहील.

  • मात्र, जी भरती प्रक्रिया या आधी सुरू झाली आहे, त्यास हे आरक्षण लागू होणार नाही, असे महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. अनाथ ही एक स्वतंत्र जात मानून त्या प्रवर्गास २ टक्के आरक्षण हे मागासवर्गीयांमधून द्यावेत, असा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाने पूर्वी दिलेला होता.

  • तथापि, कोणत्याही प्रवर्गाची जात ठरविणे आणि त्या आधारे आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. तरीही अनाथांना आरक्षण द्यायचे, अशी आग्रही भूमिका घेत, मुख्यमंत्र्यांनी अनाथांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

बिनधास्त वापरा 10 रूपयांचं नाणं, आरबीआयचं स्पष्टीकरण :
  • नवी दिल्ली: तुमच्याकडे असलेलं 10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. 10 रूपयांच्या नाण्याचे सर्व 14 डिझाइन वैध आहेत असं भारतीय रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे. दहा रूपयांच्या नाण्याबाबत सुरू असलेल्या अफवांनंतर आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

  • सामान्य माणूस आणि व्यापारी वर्गामध्ये 10 रूपयांच्या नाण्याबाबत विविध शंका आहेत. दहा रूपयांची नाणी वैध नाहीत अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण  दहा रूपयांची सर्व नाणी वैध असून कोणीही ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.  बाजारात 10 रूपयांची 14 प्रकारची नाणी उपलब्ध आहेत.

  • वेळोवेळी ही नाणी आरबीआयकडून जारी करण्यात आली आहेत. या नाण्यांद्वारे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं दर्शन होतं. यामुळेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची 10 रूपयांची नाणी पाहायला मिळतात. पण या नाण्यांबाबत कोणाच्याही मनात काही शंका नसावी, हे पूर्णपणे वैध आहे असं आरबीआयने म्हटलं आहे. 

  • तसंच आरबीआयने देशातील सर्व बॅंकांना 10 रूपयांच्या नाण्याबाबत निर्देश दिले आहेत.  जनतेला 10 रूपयांच्या नाण्याबाबत विश्वास द्यावा आणि कोणत्याही भीतीविना 10 रूपयांच्या नाण्याचा व्यवहार करण्यास सांगावं असे निर्देश सर्व बॅंकांना दिले आहेत.  याशिवाय बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये या नाण्यांची देवाण-घेवाण सुरू ठेवावी असं सांगितलं आहे. 

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १७७८: कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारे  पहिले युरोपियन ठरले.

  • १९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

  • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.

  • १९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

  • १९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

  • १९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.

  • १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

  • २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.

जन्म

  • १७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)

  • १८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)

  • १८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

  • १८८९: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)

  • १८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

  • १८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

  • १९३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

  • १९३३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

  • १९५२: चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)

  • १९६६: रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

  • १९७२: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.

  • १९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर१८६५)

  • १९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)

  • १९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

  • १९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

  • १९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)

  • १९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)

  • २००३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.