चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९

Date : 18 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित :
  • लंडन: ब्रेक्झिट ठराव संसदेत मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव थेरेसा यांनी जिंकला. मजूर पक्षानं थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूनं 306 सदस्यांनी मतदान केलं. तर विरोधात 325 जणांनी मत नोंदवलं. त्यामुळे मे यांच्या सरकारवरचं संकट टळलं आहे. मात्र ब्रेक्झिटचं नेमकं काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

  • युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी संसदेत प्रस्ताव आणला होता. त्यावर कनिष्ठ सभागृहात मतदान झालं. यात ब्रेक्झिट ठरावाविरोधात 432 सदस्यांनी कौल दिला. तर ब्रेक्झिटच्या बाजूनं 202 सदस्यांनी मतदान केलं. विशेष म्हणजे थेरेसा मे यांच्याच पक्षाचे 118 सदस्य विरोधात गेल्यानं पंतप्रधानांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. यानंतर विरोधात असलेल्या मजूर पक्षानं मे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा मतदान झालं. यामध्ये मे यांना 325 सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर 306 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे 19 मतांनी मे यांचं सरकार वाचलं. 

  • ब्रिटन 1973 पासून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. 2016 मध्ये ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबद्दल जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 52 टक्के ब्रिटिशांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. युरोपियन युनियनमधून बाहेर पाडण्यासाठी ब्रिटनला 29 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र याबद्दलचा प्रस्ताव मे यांना अद्याप संसदेत मंजूर करुन घेता आलेला नाही. मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांच्यासह मे यांच्यासह मे यांच्या हुजूर पक्षातील अनेक खासदारांनी ब्रेक्झिट ठरावाविरोधात भूमिका घेतली आहे. 

शाओमी लॉन्च करणार पहिला 5जी फोन :
  • नवी दिल्ली : चीनी स्मार्ट फोनमेकर शाओमी (MI) फेब्रवारी महिन्यात एक धमाकेदार मोबाईल आणण्याच्या तयारीत आहे. हा भारतातला पहिला 5G फोन असण्याची शक्यता आहे. शाओमीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला याबद्दल माहिती पाठवली आहे. ज्याचं नाव एमआय मिक्स 3 असणार आहे. या मोबाइलमधील सर्वच फिचर खास असणार आहेत. ज्यात 10 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंतच स्टोरेज असू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

  • मोबइल वर्ल्ड काँग्रेस MWC2019 ची सुरुवात पुढील महिन्यात होणार आहे. स्मार्टफोन मेकर्स सोनी, सॅमसंग आणि अन्य कंपन्यानी यासाठी MWC ला माहिती पाठवायला सुरु केली आहे. यातच शाओमी कंपनीने नवीन फास्ट फिचर असलेला एमआय मिक्स 3 मोबाइल लॉन्च करणार असल्याचं सांगितलं आहे. शाओमीने इवेंटची तारीख 24 फेब्रवारी ठेवली आहे. याच इव्हेंटमध्ये या फास्ट फिचर मोबइलचं लाँचिग होऊ शकतं.

एमआय मिक्स 3 मोबाइलमध्ये हे फिचर्स असतील ?

  • -क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन 845 / X50 प्रोसेसर
  •  5G नेटवर्क
  • -6.39' इंच फुल HD डिसप्ले
  • -10 जीबी रॅम
  • 256 जीबी स्टोरेज
  • 12 मेगापिक्सल असणारे दोन कॅमेरे
  • फ्रंट कॅमेरेही दोन असणार, ज्यात 24 आणि 2 मेगापिक्सल सेंसर असणार आहे.
  • 4000mah ची पॉवरफूल बॅटरी
  • -या मोबाईलमध्ये अँडरॉईड 9.0 पाय असणार आहे.
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार 99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक :
  • मुंबई : नागपूर इथे होणाऱ्या 99 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची निवड झाली आहे. याबाबत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित  99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे संपन्न होणार आहे.

  • प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. नागपूरकरांच्या आग्रहास्तव एलकुंचवार यांनी आयोजकांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारले आहे. यानिमित्ताने अध्यक्ष आणि उद्घाटक विदर्भाचेच असल्याचा योग जुळून आला आहे आणि नाट्य संमेलन देखील नागपूर येथेच होणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

  • 22 फेब्रुवारीपासून हे चार दिवसीय संमेलन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. 33 वर्षांनंतर नागपूरला नाट्यसंमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.  एलकुंचवार यांनी या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करावे, अशी सर्व रंगकर्मींची इच्छा होती.

  • एलकुंचवार यांना आम्ही तशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आहे. केवळ विदर्भ-महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नाट्यकर्मींच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. दिल्लीपासून ते कोलकात्यापर्यंत एलकुंचवार यांचा चाहता वर्ग आहे. त्यांनी उद्घाटक होण्याचे मान्य केल्याने त्यांच्या देशातील समस्त चाहत्यांना आनंद झाला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेने दिली आहे.

नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय :
  • मेलबर्न : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला तिसरा आणि अखेरचा वन डे सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

  • मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेतही विजय मिळवून, तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. भारतीय संघानं अॅडलेडची दुसरी वन डे जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता

  • विराट कोहलीच्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी भारतानं तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. आता टीम इंडियानं वन डे सामन्यांची मालिका जिंकली, तर भारतीय क्रिकेटमधलं ते मोठं यश ठरेल.

  • मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडिया पाचवा गोलंदाज म्हणून विजय शंकर किंवा यजुवेंद्र चहल यांच्यापैकी कुणाची अंतिम संघात निवड करते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सिडनी आणि अॅडलेडच्या वन डे सामन्यांमध्ये भारतीय संघाला पाचव्या गोलंदाजाची उणीव जाणवली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली.

  • कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या डावावर नियंत्रण राखलं आणि विकेट्सही काढून दिल्या. पण हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत खलिल अहमद आणि मोहम्मद सिराज यांना मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आलेला नाही. त्यामुळं विजय शंकर आणि यजुवेंद्र चहलची नावं संघनिवडीच्या शर्यतीत आहेत.

जीडीपीवाढीसाठी चलनवाढही आवश्यक- आरबीआय :
  • देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये वाढ होत असताना अर्थव्यवस्थेत चलनवाढीचीही गरज असल्याचे असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा बंद केल्या होत्या. तेव्हापासून अर्थव्यवस्थेत रोखीचा तुटवडा भासत आहे.

  • अधिकाऱ्याने म्हटले की, जीडीपी वाढीचा दर वाढल्यानंतर आता चलनवाढीचीही आवश्यकता आहे. नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० रुपयांची नवी नोट चलनात आणली होती. त्याचबरोबर २००० रुपयांची नोटही नव्याने चलनात दाखल झाली होती. दरम्यान, अर्थव्यवस्थेतील बनावट नोटांचे प्रमाण चांगलेच घटले आहे. सध्या ज्या बनावट नोटा बाजारात आहेत त्या अत्यल्प प्रमाणात आहेत.

  • अधिकाऱ्याने सांगितले की, आरबीआय चलन सुरक्षेचे कठोर उपाय योजणार आहे. यासाठी पात्रता पूर्व निविदेबाबत सूचनाही काढण्यात आली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्याच्या (एनबीएफसी) बाबत दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरबीआयकडून एनबीएफसीसाठी बँकिंग लोकपाल तसेच डिजिटल लोकपाल नियुक्त करण्यात येणार आहे.

  • आरबीआय आर्थिक समावेशकतेसाठी राष्ट्रीय रणनीतीवर काम करीत आहे. आरबीआयने सुक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रमांसाठी एक तज्ज्ञांची समिती नेमली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय बँकेचे कर्ज मिळू शकण्यास हातभार लागणार आहे.

खो-खोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी सुवर्णपदके :
  • पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले. खो-खो क्रीडा प्रकारात १७ वर्षांखालील मुले व मुली अशा दोन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद मिळवले. त्याशिवाय टेनिस, बॉक्सिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.

  • खो-खो क्रीडा प्रकारात मक्तेदारी गाजवणाऱ्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे १७ वर्षांखालील (कुमार) मुले व मुली या दोन्ही विभागांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतवले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर १९-८ असा एकतर्फी विजय नोंदवला.

  • मुलींच्या गटात महाराष्ट्राने पूर्वार्धात ७-५ अशी आघाडी घेतली होती, तर दिल्लीने पूर्ण वेळेत १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अलाहिदा डावावर गेला. या डावात महाराष्ट्राच्या जान्हवी पेठेने शेवटची दोन मिनिटे नाबाद संरक्षण करत संघाला निसटता विजय मिळवून दिला. महाराष्ट्राकडून किरण शिंदे (३.२० मि.), अश्विनी मोरे (२ मि., २.५० मि.), जान्हवी पेठे (१.४० मि., अलाहिदा डावात नाबाद २ मि. व एक गडी) यांनी सुरेख खेळ केला.

  • मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशविरुद्ध १९-८ असे सहज हरवले. महाराष्ट्राकडून ऋषिकेश शिंदे (नाबाद २.४० मि., १.४० मि. व ४ गडी), रोहन कोरे (२.३० मि. व २ गडी), कर्णधार चंदू चावरे (२.१० मि. व ३ गडी) यांनी कौतुकास्पद खेळ केला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

  • १९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

  • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.

  • १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

जन्म 

  • १७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)

  • १८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

  • १८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

  • १९३३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

  • १९६६: रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

  • १९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

  • १९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

  • १९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

  • १९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे१९०५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.