चालू घडामोडी - १८ जुलै २०१८

Date : 18 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', १०० किलो सोनं जप्त :
  • मदुराई - तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यासोबत 163 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीतून मिळालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठा संपत्ती असल्याचे बोलले जाते. एका बांधकाम व्यावसायिक कंपनीवर ही धाड टाकण्यात आली आहे.

  • मुदराईतील एसपीके कंपनीच्या वेगवेगळ्या 22 ठिकाणी प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. अरुप्पुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील कंपनीच्या कार्यालयात सोमवारी ही धाड टाकण्यात आली. या कंपनीकडून सरकारच्या महामार्गांचे कंत्राट घेण्यात येते.

  • आत्तापर्यंत या धाडीत अंदाजे 100 किलो सोनं आणि 163 कोटी रुपयांची रोकड (अंदाजे) जप्त करण्यात आली असून धाडीची कारवाई अद्यापही सुरुच असल्याचे प्राप्तीकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • देशभरातील ही आजपर्यंतची सर्वाच मोठी जप्ती असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुरक्षित एका मोठ्या गाडीत ठेवल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, यापूर्वी नोटबंदीनंतर 2016 मध्ये प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत 110 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. 

राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी :
  • नवी दिल्ली : राज्यसभा उपसभापतीपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

  • राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप 69 जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे.

  • आपले काही मित्र पक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करून 115 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करेल हे अजून निश्चित नाही.

  • उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही विजयाची खात्री नसल्याने भाजप आपला उमेदवार देत नाही. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपही सर्वसहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करत आहे.

  • एनडीएकडून अकाली दलच्या नरेश गुजराल यांचंही नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास शिवसेनाही विरोधकांसोबत येऊ शकते, अशी अपेक्षा विरोधकांना आहे.

ट्रम्प यांच्यावर टीका, पुतीन यांच्या खोटेपणाला संधी दिली :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याला ट्रम्प यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी हेलसिंकी येथील बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ट्रम्प त्या विषयावर गप्पच बसले.

  • रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन मॅकेन म्हणाले की, पुतीन यांच्याबरोबरची ट्रम्प यांची बैठक ही घोडचूक होती. पुतीन यांच्या सुरात सूर मिसळून ते बोलत असल्याचे दिसत होते. खरेतर खोट्यानाट्या गोष्टी जगासमोर मांडण्यासाठी ही चांगली संधी मिळाली होती.

  • हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजचे माजी सभापती न्यूट गिंग्रिच म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांबद्दल ट्रम्प यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेली ही सर्वात गंभीर चूक आहे. 

'गदर... एक देशप्रेमकथा'; अमेरिकेतील शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय स्वातंत्र्याचा धडा :
  • नवी दिल्ली: अमेरिकेतील शाळांच्या पुस्तकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील घटनांचा समावेश केला जाणार आहे. अमेरिकेच्या अॅस्टोरिया शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. गदर पक्षाशी संबंधित इतिहास अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवण्यात येईल, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गदर पक्षाच्या स्थापनेला 105 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ओरेगनमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

  • भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी गदर पक्षानं केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. कॅनडा आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली होती. सरदार सोहन सिंह भाकना यांनी या पक्षाची स्थापना केली होती.

  • या पक्षाचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतं. 21 एप्रिल 1913 रोजी अमेरिकेत गदर पक्षानं 'गदर' नावाचं साप्ताहिक सुरु केलं होतं. याची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या साप्ताहिकात देशभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या कविता प्रसिद्ध व्हायच्या. 

  • लाला हरदयाल यांच्या विचारांनी गदर पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या विस्तारासाठी ते अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतील भारतीयांना पक्षाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं.

  • इंग्रजांविरोधात बंड करण्यासाठी गदर पक्षानं 21 फेब्रुवारी 1915 हा दिवस निश्चित केला होता. मात्र किरपाल सिंह यांनी गद्दारी करुन याबद्दलची माहिती ब्रिटिशांना दिली. याची कल्पना क्रांतीकारकांना मिळताच त्यांनी बंडाची तारीख 19 फेब्रुवारी केली. मात्र याचीही माहिती इंग्रजांपर्यंत पोहोचल्यानं क्रांतीकारकांची धरपकड करण्यात आली. 

'अमेझिंग अॅमेझॉन'... आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत Jeff Bezos यांची गोष्ट :
  • नवी दिल्लीः भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा तब्बल आठ पट मोठं साम्राज्य उभं करणारे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे फक्त जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत, तर ते आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

  • त्यांची संपत्ती १५१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अर्थातच, त्यामागे दूरदृष्टी आणि अथक परिश्रम आहेत. नोकरी आणि शहर सोडून हे एवढं मोठं विश्व साकारण्याची त्यांनी केलेली किमया निश्चितच प्रेरणादायी आहे. 

  • १६ जुलै १९९५ ला स्थापन झालेली अॅमेझॉन २३ वर्षांत अॅपल खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. सोमवारी अॅमझॉनच्या एका शेअरची किंमत १,८२२.४९ डॉलर इतकी होती. कंपनीचं बाजारमूल्य ८८४.३२ अब्ज डॉलर्सवर गेलंय. येत्या काळात ते आणखी वाढू शकतं. 

  • १२ जानेवारी १९६४ मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जेफ यांच्या आईचं नाव जॅकी गेज जॉर्जसन, तर वडिलांचं नाव टेड जॉर्जसन. जेफचे वडील शिकागोमध्ये वास्तव्याला होते. तिथं त्यांचं दुचाकीचं दुकान होतं.

  • जेफच्या जन्मावेळी त्याची आई फक्त सतरा वर्षांची होती. जेफच्या आई-वडिलांचा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. जेफच्या आईनं घटस्फोटानंतर क्युबामध्ये राहणाऱ्या मिगुअल बेजोस यांच्याशी लग्न केलं. आई आणि बाबा लहानपणीच विभक्त झाल्यानं जेफ यांच्याकडे जन्मदात्या पित्याच्या फारशा आठवणी नाहीत.

झुंडशाही रोखा, सुप्रीम कोर्टाचा निर्वाणीचा आदेश :
  • नवी दिल्ली : ठरावीक विचारसरणीने समाजाचे होणारे ध्रुवीकरण आणि उभ्या राहणाऱ्या झुंडशाही हिंसाचाराच्या भस्मासुराने प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी करण्याआधीच सरकारने या उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बीमोड करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. लोकशाही व्यवस्था, बहुढंगी संस्कृती व सहिष्णू बंधुभावाचा वारसा टिकवायचा असेल, तर झुंडशाही फोफावण्याआधीच तिला नख लावण्याखेरीज अन्य पर्याय नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.

  • कायद्याची जरब हा सुजाण समाजाचा पाया असल्याने, जमावांकडून होणारी हिंसा हा स्वतंत्र गुन्हा ठरविणारा कायदा संसदेने करावा आणि त्यात कडक शिक्षेची तरतूद करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

  • गोहत्या व गोमांस भक्षणाच्या संशयावरून गोरक्षकांकडून विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाणीच्या व प्रसंगी हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या काही याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या.

  • अलीकडे मुले पळविण्याच्या अफवांनी महाराष्ट्रासह काही राज्यांत काहींच्या हत्या झाल्या. समाज माध्यमांतील अफवांवरून झुंडशाहीकडून संशयितांच्या हत्यांचे पेव फुटले. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या दोन्ही प्रकारच्या झुंडशाहीचा समग्रपणे परामर्श घेणारे ४५ पानी निकालपत्र दिले.

दिनविशेष :
  • नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

  • १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.

  • १९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

  • १९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.

  • १९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.

  • १९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

  • १९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

जन्म 

  • १९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)

  • १९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०१२)

  • १९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.

  • १९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)

  • १९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२०)

  • १९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.

  • १९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.

  • २००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

  • २००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)

  • २०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.