चालू घडामोडी - १८ जून २०१८

Date : 18 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अरविंद केजरीवाल नक्षलवादी - सुब्रमण्यम स्वामी :
  • दिल्ली : भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नक्षलवादी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी केजरीवाल यांना थेट लक्ष केले आहे. केजरीवाल यांना इतर राज्यांचे मुख्यमंत्री पाठिंबा का देत आहेत, असा सवाल देखील स्वामींनी केला आहे.

  • स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणात काहीच कळत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळाल्यानंतर आता त्यांनांच दुर्लक्ष केले. केजरीवाल हे ४२० असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.

  • गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या राज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे पी. विजयन आणि कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी हे शनिवारी केजरीवाल यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असता त्यांना भेट नाकारण्यात आली.

  • त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता यांची भेट घेतली. तसेच केजरीवाल यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक :
  • हैदराबाद : दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती (३४) व पत्नी चंद्रा (३१) अशी त्यांची नावे आहेत. अमेरिकेमध्ये शोज करण्याच्या बहाण्याने अभिनेत्रींना अमेरिकेत बोलावून त्यांना ते सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याचे उघड झाले आहे.

  • शिकागोच्या कोर्टात ४२ पानी तक्रार दाखल झाल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात हे जोडपे हा उद्योग करीत असल्याचे उघड झाले. किशन उर्फ श्रीराज पूर्वी दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीत प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यामुळे त्याच्या इथे ओळखी होत्या.

  • या जोडप्याने ११ मे २०१७ ते २२ जानेवारी २०१८ या काळात अनेक मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. ते मुलींना व अभिनेत्रींना अमेरिकेत घेऊन जात व तेथे त्यांना हॉटेलात वा आपल्या घरी 'कैद' करून ठेवत. अमेरिकेतील तेलुगू वा इतर भारतीय भाषिक सोहळ्यांत त्यांना देहविक्रीसाठी घेऊन जात होते, अशी तक्रार होती.

  • पोलिसांनी या वर्षी १६ फेब्रुवारी या जोडप्याच्या घरी छापा घातला, तिथे एक बॅग सापडली. त्यात गर्भनिरोधके व एक वही होती. वहीत अनेक अभिनेत्रींच्या नावे व त्यांच्या उपलब्ध तारखांची नोंद होती. शिकागो कोर्टाने दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे. 

एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आॅनलाइन :
  • मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार विद्यापीठाने एमफिल व पीएचडीसंदर्भात सुधारित नियमावली जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी एमफिल व पीएचडी संदर्भात नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेल्या ‘कुलगुरू निर्देशिकेला’ मान्यता दिली. ही नियमावली १५ जून २०१८पासून लागू करण्यात आली आहे. आता या नियमावलीनुसार एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षांपासून ते एमफिल व पीएचडी पदवी जाहीर करण्याबाबतची सर्व प्रक्रिया आॅनलाइन होणार आहे.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमाच्या आधारे ही सुधारित ‘कुलगुरू निर्देशिका’ बनविण्यात आलेली आहे. एमफिल व पीएचडीची प्रवेश परीक्षा आॅनलाइन घेतली जाणार आहे. याचे अर्ज व शुल्कदेखील आॅनलाइन स्वीकारले जाणार आहेत. ही परीक्षा वर्षातून एकदा असून जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना विद्यापीठातर्फे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राचा कालावधी तीन वर्षांचा असेल.

  • आॅनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल. त्यात एकूण १०० प्रश्नांसाठी १०० गुण असतील. यासाठी दोन पेपर होणार असून पहिल्या पेपरमध्ये संशोधन पद्धतीसह व अन्य विषयांचा समावेश असेल. दुसरा पेपर पदव्युत्तर पदवीच्या विषयावर आधारित असेल. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती संबंधित संशोधन केंद्रावर घेतल्या जातील.

  • तेथील उपलब्ध जागांनुसार संशोधनासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे म्हणाले, यूजीसीच्या नियमानुसार सदर ‘कुलगुरू निर्देशिका’ तयार केलेली आहे. येथून पुढे यानुसारच एमफिल व पीएचडीचे प्रवेश होतील. सदर परीक्षा प्रथमच आॅनलाइन घेतली जाणार असून लवकरच प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

अमेरिका, चीन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेत योग दिनाची तयारी :
  • नवी दिल्ली- २१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून अमेरिका, चीन, इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका यासह आणखी काही देशांत योगविषयक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. त्यातून योगविद्येची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.

  • 177 देशांनी दिला होता पाठिंबा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची मूळ कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यांनी केलेल्या विनंतीचा स्वीकार करुन संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी २१ जूनला हा दिवस साजरा करण्याचा निर्णय २०१४ साली घेतला. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये आलेल्या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता.

  • अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे गव्हनर्स आयलंड इथे शनिवारी आयोजिलेल्या योग शिबीरात शेकडो लोक सहभागी झाले होते. याप्रसंगी भारताचे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील कॉन्सुलेट जनरल संदीप चक्रवर्ती उपस्थित होते.

भांडण नको म्हणून देशाचे नावच बदलले :
  • प्रेस्पेस (ग्रीस) : पूर्वीच्या युगोस्लाव्हियातून वेगळे झालेल्या मॅसेडोनिया या देशाचे नाव बदलून ते ‘उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक’ असे करण्याबाबत रविवारी ग्रीस आणि मॅसेडोनिया यांच्यात करार झाला. दोन्ही देशांच्या संसदेची संमती मिळाल्यावर आणि मॅसेडोनियाच्या जनतेने सार्वमतात अनुकूल कौल दिल्यावरच हा नावबदल प्रत्यक्षात अंमलात येईल.

  • ग्रीसचे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस त्सिपरास आणि मॅसेडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या अणि ही ऐतिहासिक जबाबदारी दोन्ही देश नक्की पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.

  • कशामुळे पेटला होता वाद - हा वाद १९९१ पासून सुरू आहे. ग्रीसमध्येही मॅसेडोनिया नावाचा एक प्रांत आहे. युगोस्लाव्हियातून फुटून निघालेल्या सेजारी देशाने तेच नाव घेतल्याने भविष्यात तो त्याच नावाच्या आपल्या प्रांतावर आणि ग्रीक संस्कृतीवर हक्क सांगेल, असा ग्रीकवासियांचा आक्षेप आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वरीलप्रमाणे नावबदल करून मॅसेडोनियाचा ‘‘नाटो’ व युरोपीय संघातील प्रवेश् सुकर करण्याचा त्सिपरास यांचा प्रयत्न आहे.

आइनस्टाइन वंशद्वेष्टा असल्याचे रोजनिशीतून स्पष्ट :
  • जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांची रोजनिशी सापडली असून त्यात तो वंशद्वेष्टा होता असे दिसून आले आहे. आइनस्टाइन हा चिनी वंशाच्या लोकांना बौद्धिकदृष्टय़ा कमी दर्जाचे समजत होता. आइनस्टाइनने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, जपान, पॅलेस्टाइन व स्पेनचा दौरा केला होता त्यावेळी त्याने रोजनिशीत केलेल्या उल्लेखानुसार चीनला कळपासारखा देश असे संबोधले आहे.

  • चिनी नागरिक भावनाशून्य यंत्रासारखे वागणारे आहेत असेही आइनस्टाइनने त्यावेळी म्हटले होते. नंतरच्या काळात आइनस्टाइनने वंशवाद हा श्वेतवर्णीय लोकांचा रोग आहे असे सांगून अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीत भाग घेतला होता. आइनस्टाइनच्या रोजनिशीचे जर्मन भाषेतून इंग्रजीत प्रथमच भाषांतर करण्यात आले आहे.

  • यावर आधारित पुस्तक दी ट्रॅव्हल डायरीज ऑफ अल्बर्ट आइनस्टाइन नावाने प्रसिद्ध झाले त्यात म्हटले आहे की, अतिपूर्वेकडून मध्यपूर्वेकडे काही देशांचा प्रवास करताना आइनस्टाइनने त्याच्या रोजनिशीत जे लिहिले आहे त्यावरून तो वंशविद्वेषी होता असेच दिसून येते. चिनी लोक जेवताना किंवा अन्न खाताना नीट बेंचवर बसत नाहीत तर युरोपीय लोकांसारखे जंगलात शौचास गेल्यानंतर बसावे तसे उकिडवे बसतात. त्या लोकांची मुले दिशाहीन, मंद दिसतात.

  • आइनस्टाइन आता श्रीलंकेत असलेल्या सिलोनला गेला होता तेथे खूप घाण व दरुगधी असल्याचे त्याने त्यावेळी नोंदीत लिहिले आहे. गरजा कमी ठेवा व कमी काम करा हे त्यांचे साधे आर्थिक चक्र असल्याची टीका तो तेथील लोकांवर करतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

  • १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

  • १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

  • १९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

  • १९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

  • १९८१: जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

  • १९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.

जन्म 

  • १८९९: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर१९८५)

  • १९४२: दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म.

  • १९४२: संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल मॅकार्टनी यांचा जन्म.

  • १९६५: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

मृत्यू 

  • १९३६: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १८६८)

  • १९५८: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)

  • १९६२: पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.

  • १९७४: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)

  • १९९९: साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

  • २००५: भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

  • २००९: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.