चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जून २०१९

Date : 18 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटणार :
  • पालघर जिल्ह्यात आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नववी इयत्तेत प्रवेश मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे विद्यार्थी यंदाही नववीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षणमंत्र्यांकडे नववीचे वर्ग सुरू करण्यासाठी साकडे घातले. २३ शाळांना नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मिळणार असल्याने जिल्ह्यातील नववीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या सुटणार आहे.

  • या आधीच गतवर्षी नव्याने नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शाळांना मंजुरी देण्यात आली होती त्यामध्ये ३९ शाळांनी नव्याने वर्ग सुरू केले.त्यामुळे नववी प्रवेशाची समस्या त्यावेळी सोडवली गेली. मात्र त्यावेळी या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे बऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि अभ्यासाचे नुकसानही झाले होते.

  • मात्र आता ही बाब लक्षात घेत आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदींनी शाळा सुरू होण्याआधीच जिल्ह्यातील तालुक्यांतील शाळांकडून  तसा प्रस्ताव तयार केला. शिक्षणमंत्र्यांकडे यासाठीचा प्रस्ताव या शिष्टमंडळामार्फत काही दिवसांपूर्वी देण्यात आला. शिक्षण मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • विविध तालुक्यांमधील शाळांमध्ये २३ नवे सुरु नवे वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागाकडे दिला आहे. त्या अनुषंगाने या शाळांना मान्यता मिळणार असल्यामुळे आधी असलेल्या वर्गापेक्षा अतिरिक्त झालेल्या विद्यर्थ्यांंना या शाळांमध्ये सामावून घेता येणार असल्याचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी सर्वसामान्य सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी नववीच्या प्रवेशाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्यामुळे नववीच्या प्रवेशाची ही समस्या सुटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती निलेश गंधे यांनी म्हटले आहे.

फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या :
  • नवी दिल्ली : जगातील २०० बड्या कंपन्यांच्या यादीत यंदा भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. मात्र पहिल्या २०० कंपन्यांत रिलायन्स इंडस्टीज ही एकच भारतीय कंपनी आहे. या यादीत ६१ देशांतील कंपन्यांचा समावेश असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ५७५ कंपन्या अमेरिकेतील आहेत.

  • फोर्ब्सच्या यावर्षीच्या २०० जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या यादीत इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायना पहिल्या स्थानी आहे. या २०० कंपन्यांत एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इंडियन आॅइल, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एल अँड टी, स्टेट बँक एनटीपीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब तॅशनल बँक, बँक आॅफ बडोदा, कॅनरा बँक आदींचा समावेश आहे.

दोन लाख लोकसंख्येसाठी अवघी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे :
  • दोन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यात अवघी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तीन आरोग्य पथके आहेत. या सात आरोग्य केंद्रांचा भार फक्त चार डॉक्टर सांभाळत आहेत. या आरोग्य केंद्रांमधील सात डॉक्टरांच्या जागा आणि निम्म्याहून अधिक आरोग्य सेविका व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरापासून रिक्त आहेत.

  • वाडा तालुक्यात परळी, कुडूस, खानिवली आणि गोऱ्हे ही चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि गारगांव, सोनाळे आणि निंबवली ही तीन प्राथमिक आरोग्य पथके आहेत. या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी दोन डॉक्टरांच्या जागा मंजूर आहेत. मात्र चारही ठिकाणी काही महिन्यांपासून एक एकच डॉक्टर कार्यरत आहेत.

  • तर गारगाव, सोनाळे आणि निंबवली या तीन आरोग्य पथकांना डॉक्टरच नसल्याची स्थिती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी असलेला वैद्यकीय अधिकारी हा एमबीबीएस असणे आवश्यक असताना वाडा तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नाही. तसेच एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या जे कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.

  • वाडा तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भरारी पथकातील डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे.

  • तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी यांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने या रिक्त जागांचा भार सध्या पदावर असलेल्या डॉक्टरांवर पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण येत आहे.

जाणून घ्या कोण आहेत जे. पी. नड्डा :
  • भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची सोमवारी भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नड्डा यांचे भाजपाच्या विजयात मोलाचे योगदान होतं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेल्या यशातही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे.

  • १९८६ पासून नड्डा राजकारांमध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला अभाविपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नड्डा यांनी वयाच्या वयाच्या ३३ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले होते. जे. पी नड्डा यांना अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखलं जाते. शिवाय ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत.

  • जे. पी. नड्डा हे मागील मंत्रिमंडळात समाविष्ट होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना आणण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी ५० टक्के यावी अशी अपेक्षा अमित शाह यांनी नड्डा यांच्याकडून केली होती.

  • नड्डा यांनी ४९.६ टक्के टक्केवारी आणून दाखवली. जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म पाटणा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी LLB ची डिग्री घेतली. विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. ज्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं.

जगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट :
  • जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.

  • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण १३,८६५ अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या २०१८ च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी  चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्ॉनन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत आहे.

  • अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर २०१० मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवण्याचे बंधन आहे.

  • शीतयुद्धकाळातील अण्वस्त्रे काढून टाकण्यात यावीत अशीही अट त्यात आहे. स्टार्ट करार २०२१ मध्ये संपत असून त्याची मुदत वाढवण्यासाठी गांभीर्याने चर्चा करण्यात येत नाही हे घातक आहे. पुढील वर्षी अण्वस्त्र प्रसारबंदी करारास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९८० च्या मध्यावधीत अण्वस्त्रांची संख्या ७० हजार होती.

४६ आकडेपट - दुसऱ्यांदा आमनेसामने :
  • इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषकामधील दुसरी लढत मंगळवारी होणार आहे. २०१५च्या विश्वचषकात सिडनी येथे झालेल्या उभय संघांमधील एकमेव लढतीत डकवर्थ-लुइस नियमाआधारे इंग्लंडपुढे २५ षटकांत १०१ धावांचे माफक आव्हान दिले गेले, जे इंग्लंडने एका गडय़ाच्या मोबदल्यात १९व्या षटकातच पूर्ण केले.

  • सध्याच्या विश्वचषकात दोन्ही संघांची ही पाचवी लढत आहे. इंग्लंडने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, तर चारही सामने गमावल्यामुळे तळात असलेला अफगाणिस्तानचा संघ काही चमत्कार करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

  • १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

  • १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

  • १९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

  • १९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

  • १९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

  • १९८१: जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

  • १९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.

जन्म 

  • १८९९: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर१९८५)

  • १९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)

  • १९३१: प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)

  • १९४२: दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म.

  • १९४२: संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल मॅकार्टनी यांचा जन्म.

  • १९६५: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

मृत्यू 

  • १८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

  • १९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३)

  • १९०२: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८३५)

  • १९३६: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १८६८)

  • १९५८: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)

  • १९६२: पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.

  • १९७४: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)

  • १९९९: साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

  • २००३: हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.

  • २००५: भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

  • २००९: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.