चालू घडामोडी - १८ मार्च २०१८

Date : 18 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आधार क्रमांक ऑनलाइन शेअर करताना खबरदारी घ्या, यूआयडीएआयचे आवाहन :
  • कुठल्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची ऑनलाइन माहिती देताना आवश्यक ती खबदारी घ्या असे आवाहन यूआयडीएआयने शनिवारी केले. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर आले आहेत त्यावर यूआयडीएआयने याचा आधार कार्डाच्या सुरक्षेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

  • विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक अनेकदा आधारसह अन्य व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर देत असतात त्यावेळी नागरिकांनी अशी माहिती देताना काळजी घेतली पाहिजे असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे.

  • आधार कार्डाची सुरक्षा प्रणाली अत्यंत मजबूत असून आमच्या डाटा बेसमधून कोणतीही माहिती लीक झालेली नाही असे यूआयडीएआयने म्हटले आहे. जसे एखादे अन्य ओळखपत्र असते तसेच आधार कार्ड आहे. ते काही गोपनीय कागदपत्र नाही. एखाद्याच्या आधार कार्डाबद्दल तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तिची जागा घेऊ शकत नाही. बायोमेट्रीक प्रणालीनेच तुमची ओळख पटवली जाईल असे यूआयडीएआयने सांगितले.

  • कोणी तुमच्या परवानगीशिवाय तुमची व्यक्तिगत माहिती आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बँक खाते, फोटो प्रसिद्ध केले तर तुम्ही त्याविरोधात खटला दाखल करु शकता असे यूआयडीएआयने म्हटले आहे. काही वेबसाइटसवर आधार कार्डाची व्यक्तिगत माहिती उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत म्हणून यूआयडीएआयने हे स्पष्टीकरण दिले.

राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह, शोभायात्रांचंही आयोजन :
  • मुंबई : राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगावासह डोंबिवली, ठाण्यात अगदी सकाळपासूनच शोभायात्रांना सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक कपडे परिधान करुन नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

  • डोंबिवली, ठाण्यात भव्य रांगोळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय बाजारपेठांमध्येही गुढीच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर दरवर्षीप्रमाणे सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत गर्दी वाढल्यानं व्यापारी वर्गातही उत्साह आहे.

  • गुढी उभारण्यासोबतच दाराला तोरण लावून नववर्षाचं स्वागत केलं जातं. त्यामुळं पारंपरिक झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.  फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. शिवाय तोरणं, श्रीखंड यांची खरेदीही जोरात आहे.

  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायलाही मिळणार आहे.

काँग्रेसच्या महाअधिवेशनातली १० रंजक क्षणचित्रे :
  • नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाअधिवेशन दिल्लीत पार पडतं आहे. तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. 2019 च्या दृष्टीनं राहुल गांधी पक्षाला नेमकी काय दिशा देणार, मरगळलेल्या पक्षात नवी उर्जा भरु शकणार का? या दृष्टीनं हे अधिवेशन महत्वाचं आहे.

  • ईव्हीएमला विरोध करणारा राजकीय ठराव, राहुल गांधींचं शुभारंभाचं भाषण, सोनियांच्या कानपिचक्या. अशा सगळ्यांनी आजचा दिवस गाजला. पाहुयात काँग्रेसच्या महाअधिवेशनातली 10 खास क्षणचित्रे-(source :abpmajha)

‘आइनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षा अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये’ :
  • इम्फाळ/ मणिपूर : आइनस्टाईन यांचा ‘e=mc2’ या सापेक्षवादाच्या सिद्धांतापेक्षा, अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये आहेत, असं खुद्द स्टीफन हॉकिंग म्हणाले असल्याचा अजब दावा केंद्रीय विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संबोधित करताना हर्षवर्धन यांनी हा दावा केला.

  • विशेष म्हणजे, हर्षवर्धन यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र  मोदी, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला आणि मुख्यमंत्री एन. वीरेन सिंहदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियातून टीकेबरोबरच उपहासाचा सूर उमटतो आहे.

  • हषवर्धन म्हणाले की, “जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं नुकतच निधन झालं. त्यांनी स्वत: ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की, आइनस्टाईनच्या e=mc2 च्या सिद्धांतापेक्षा वेदांमध्ये चांगले सिद्धांत चांगले आहेत.”

  • या दाव्याची पुष्टी करण्यासाठी यासंदर्भातील स्त्रोतांचा खुलासा करताना हर्षवर्धन म्हणाले की, “तुम्ही यासंदर्भातील स्त्रोतांची पडताळणी करा. त्यांनी ऑन रेकॉर्ड हे वक्तव्य केलं आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी सर्वांनी थोडं काम केलं पाहिजे.”

  • दरम्यान, ट्विटरवरुनही हर्षवर्धन यांनी आपला दाव्याचं समर्थन केलं आहे. “ISC 2018 हिंदुत्वातील प्रत्येक परंपरा या वैज्ञानिक आणि वस्तूनिष्ठ आहेत. प्रत्येक अधुनिक भारतीय उपलब्धी ही आपल्या प्राचीन वैज्ञानिक उपलब्धींना पुढे घेऊन जातात. इतकेच काय, पण स्टीफन हॉकिंग यांनीही आपल्या वेदांमध्ये आइनस्टाईनच्या e=mc2 च्या सिद्धांतापेक्षा उत्तम सिद्धांत असल्याचे म्हटलं होतं.

द थिअरी ऑफ एव्हरीथिंग :
  • सृष्टीच्या निर्मितीमागचे गूढ उकलण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे असाध्य व्याधीने चाकांच्या खुर्चीला खिळलेले शरीर काही दिवसांपूर्वी कालवश झाले. ‘माझ्या मृत्यूनंतर मी सुपरमॅनप्रमाणे सूक्ष्म गुरुत्वलहरींमध्ये विहरत राहीन’, असे डॉ. हॉकिंग यांनी ‘नासा’च्या अंतराळवीरांना सांगितले होते. कृष्णविवरे आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर आयुष्यभर संशोधन करणारे डॉ. हॉकिंग हे केवळ एकांत-वासी नव्हते. पन्नासहून अधिक वर्षे सारे नियंत्रण गमावून बसलेल्या विकल शरीरासोबत जगताना त्यांच्या वृत्ती प्रफुल्लित होत्या आणि विज्ञानापलीकडल्या जगाविषयीचे कुतूहलही ताजे होते!

  • डॉ. हॉकिंग यांनी मांडलेल्या सिद्धांतांमधले गूढ उलगडणे सामान्यांच्या आवाक्यापलीकडचे असले, तरी आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयांवर डॉ. हॉकिंग यांनी व्यक्त केलेली मते विलक्षण रोचक आहेत.

  • ‘न सुटणारे क्लिष्ट प्रश्न मी आयुष्यभर सोडवत आलो. ही पृथ्वी कशी अस्तित्वात आली यासारखे प्रश्नही मी समाधानकारकपणे हाताळले; पण एक कोडे मात्र मला अजून उलगडलेले नाही’ - असे एक विधान त्यांनी सत्तराव्या वाढदिवशी केले होते. त्यावर डॉ. हॉकिंग यांना प्रश्नकर्त्यांनी उत्सुकतेने विचारले, ‘कोणते कोडे?’... तर ते हसून म्हणाले, ‘स्त्री!’

  • अलीकडच्या काळात विविध प्रसारमाध्यमांना डॉ. हॉकिंग यांनी दिलेल्या मुलाखतींदरम्यान त्यांनी मांडलेल्या विचारांचे हे साभार संकलन.

  • देव या संकल्पनेवर माझा विश्वास आहे का, असे सातत्याने मला विचारले जाते. देवाची ‘संकल्पना’ ही माणसाची गरज असते, हे मला जाणवते. पण आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही गरज संपली आहे, असे मी मानतो. आपण राहतो त्या पृथ्वीचे, वावरतो त्या विश्वाचे रहस्य काय, हे समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम आणि सतत उन्नत होत जाणारे या शास्त्राचे ज्ञान पुरेसे उपयुक्त आहे. त्यासाठी या जगाचे नियंत्रण करणारी कुणी अदृश्य शक्ती आहे, असे मानण्याची, मानत राहण्याची गरज नाही.

भारताची नजर जेतेपदावर, बांगलादेशला अंतिम सामन्यात धूळ चारण्यास सज्ज :
  • कोलंबो : सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आणि आक्रमक मूडमध्ये असलेला बांगलादेश यांच्यात निदहास टी-२० तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज रविवारी रंगणार आहे. रोमहर्षक मानल्या जाणाऱ्या या लढतीत भारताची नजर असेल ती जेतेपदावर.

  • भारताने या स्पर्धेत दुय्यम दर्जाचा संघ उतरविला. त्यातच श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला. त्यानंतर भारताने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली तर बांगलादेशने यजमान संघावर नाट्यमय विजय नोंदवित अंतिम फेरीत धडक दिली. अखेरच्या क्षणी सामन्याला वादाचे गालबोटदेखील लागले होते.

  • भारतीय संघ आॅस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यांच्याविरुद्ध जिकरीने खेळतो. बांगलादेशविरुद्ध भारताची तशी स्पर्धा दिसत नाही. तथापि मेलबोर्न येथे २०१५च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यानंतर हा समज बदलला. त्या सामन्यात पंचांचे काही निर्णय आमच्या विरोधात गेले नसते तर भारताला धूळ चारणे शक्य होते, असे बांगलादेशला अद्याप वाटते. त्या सामन्यापासून बांगलादेश संघ भारताला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी समजू लागला आहे.

  • त्या सामन्यात रोहित शर्माच्या कमरेच्यावर टाकलेला चेंडू ‘नोबॉल’ मानून पंचाने त्याला नाबाद ठरविले होते. बांगलादेश संघ आणि त्यांचे चाहते, तो प्रसंग कधीही विसरू शकणार नाहीत. हा आपला अपमान होता, असा त्यांचा समज आहे. त्याचवर्षी भारताने बांगलादेशात वन-डे मालिका गमाविली. यजमान संघाने ‘बदला’ घेतल्याच्या भावनेतून बांगला देशात भारतीय खेळाडूंचे फोटो सर्वत्र झळकविण्यात आले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

  • १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,

  • १९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

  • १९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

  • २००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)

  • १८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)

  • १८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)

  • १८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)

  • १८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)

  • १९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

  • १९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१)

  • १९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी२००१)

  • १९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२)

  • १९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

  • १९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००५)

  • १९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)

  • १९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)

  • २००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.

  • २००३:  ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.