चालू घडामोडी - १८ मार्च २०१९

Date : 18 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पी. सी. घोष देशाचे पहिले लोकपाल :
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा सोमवारी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते. घोष यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश म्हणून काम केले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • लोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो. सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.

  • मात्र, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकपाल समितीच्या बैठकीत सहभाग घेण्यास नकार देताना सरकारवर मनमानी कारभाराचा आरोप केला होता. त्यानंतर मोठ्या विरोधानंतर मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच लोकपालची नियुक्ती केली आहे.

  • देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. न्या. घोष आपल्या निर्णयांमध्ये मानवाधिकारांचे संरक्षणाबाबत वारंवार भाष्य करत असत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे विशेषतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.

‘एशियाड’मध्ये बुद्धिबळाचे पुनरागमन :
  • हँगझोऊ येथे २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकाराचा पुन्हा समावेश करण्याच्या निर्णयाचे भारतातील पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदसह मातब्बर बुद्धिबळपटूंनी स्वागत केले आहे.

  • बुद्धिबळाबाबत ही अत्यंत सकारात्मक घटना आहे. आता देशासाठी पदकाची मला अपेक्षा आहे, असे पाच वेळा विश्वविजेत्या आनंदने सांगितले. २००६च्या दोहा आणि २०१०च्या गुआंगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धामध्ये भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

  • २०१०च्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असलेल्या ग्रँडमास्टर बी. अधिबानने याबाबत म्हटले की, ‘‘बुद्धिबळ हा क्रीडा प्रकार आणि त्यातील खेळाडूंसाठी हे चांगले आहे. ज्यामुळे त्यांना अनेक फायदे मिळू शकतील.’’

  • अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष डी. व्ही. सुंदर म्हणाले की, ‘‘बुद्धिबळाचा २००६ आणि २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश हेाता. आता त्याचा पुन्हा या स्पर्धेत समावेश केल्याने भारताच्या पदकांच्या आशा उंचावल्या आहेत.’’

  • बँकॉक येथे ३ मार्चला झालेल्या बैठकीनंतर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल-फहाद अल-सबाह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याचप्रमाणे जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्काडाय ड्व्होर्कोव्हिच यांना याबाबत माहिती दिली आहे.

  • ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश झाल्यामुळे आता खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पात्र होता येणार आहे,’’ असे ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांनी सांगितले.

भारतात कुपोषणाचे प्रमाण २ टक्क्य़ांनी घटल्याचा निष्कर्ष :
  • देशात २०१७-१८ मध्ये कुपोषणाचे प्रमाण २ टक्क्य़ांनी घटले असल्याचा दावा करण्यात आला असून कुपोषणाचे प्रमाण वार्षिक ३४.७ टक्के आहे. यात विशेष करून वयपरत्वे मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • राष्ट्रीय आरोग्य पाहणी सर्वेक्षणात असे दिसून आले,की भारतात मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमण २०१७-१८ मध्ये ३४.७ टक्के नोंदले गेले असून ते २०१५-१६ मध्ये ३८.४ टक्के होते. वाढ खुंटणे हा प्रकार कुपोषणामुळे होत असतो. बराच काळ पोषक आहार न मिळणे किंवा रोगजंतूंचा संसर्ग असणे यामुळे मुलांची उंची वाढत नाही. युनिसेफ व आरोग्य मंत्रालय यांनी केलेल्या पाहणीनुसार २०१५-१६ व २०१७-१८ या काळात वाढ खुंटण्याचे प्रमाण ४ टक्क्य़ांनी कमी झाले आहे. म्हणजे ही घट वार्षिक दोन टक्के आहे.

  • हा पाहणी अहवाल १.१२ लाख घरांची माहिती घेऊन तयार केला आहे. पोषण अभियानामुळे कुपोषण दोन टक्क्य़ांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोषण अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०१८ मध्ये राबवलेली योजना असून त्यात मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण २०१५-१६ मधील ३८.४ टक्क्य़ांवरून ते २०२२ पर्यंत २५ टक्क्य़ांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.

  • महिलांमधील अ‍ॅनिमिया (रक्ताची कमतरता) २०१७-१८ मध्ये ४० टक्के नोंदला गेला, २०१५-१६ मध्ये ५०-६० टक्के होता. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार भारतात कुपोषणाची समस्या गंभीर असून जगातील वाढ खुंटलेल्या लोकांमध्ये एक तृतीयांश भारतीय आहेत. वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक ४६.६ दशलक्ष आहे. त्यानंतर नायजेरिया (१३.९ दशलक्ष), पाकिस्तान (१०.७ दशलक्ष) यांचा समावेश आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन :
  • देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय  आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.

  • गोव्यातील न्यायालय आज बंद - मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोवा उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • संरक्षणमंत्रीपदावरील कारकिर्द - संरक्षणमंत्री असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले. त्याचे श्रेय त्यांनी संघाच्या शिकवणीला दिले होते. सध्या गाजत असलेली राफेल विमान खरेदी त्यांच्या काळातच झाली होती. संरक्षणमंत्री असतानाही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याने पर्रिकर खासगीत नाराजी बोलून दाखवीत असत.

'जागो ग्राहक जागो', ग्राहक म्हणून तुमचा अधिकार काय :

  • आज (15 मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे.

  • ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच, वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.

  • ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते.

  • ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jagograhakjago.gov.in ही खास नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

  • अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्व्हिसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे 'जागो ग्राहक जागो'.

'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय :
  • पणजी : भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. तीन वर्ष पर्रिकरांनी भारताचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. या तीन वर्षाच्या कार्यकाळात पर्रिकरांनी भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याचा चेहरामोहरा बदलला आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक, राफेल खरेदी ते 40 वर्षांपासून रखडलेली 'वन रॅन्क वन पेन्शन योजना' लागू करणे, हे सगळे निर्णय पर्रिकरांनी घेतले आहेत.

  • सर्जिकल स्ट्राईक : उरी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवादी तळ उध्वस्त केले, संपूर्ण रात्रभर पर्रिकर सेनेच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते.

  • मणिपुरातली कारवाई : भारतीय सैन्याने मणिपूरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले.

  • राफेल खरेदी : राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीला पर्रिकरांनीच हिरवा कंदील दाखवला. 2016 मध्ये राफेल खरेदीपत्रावर पर्रिकरांनीच स्वाक्षऱ्या केल्या.

  • 'वन रॅन्क वन पेन्शन' योजना : 40 वर्षांपासून रखडलेली 'वन रॅन्क वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीत पर्रिकरांचा सिंहाचा वाटा आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

  • १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,

  • १९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

  • १९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

  • २००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)

  • १८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)

  • १८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)

  • १८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)

  • १८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)

  • १९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

  • १९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)

  • १९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२).

मृत्यू 

  • १९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)

  • १९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)

  • २००३:  ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.