चालू घडामोडी - १८ मे २०१७

Date : 18 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय विद्यार्थ्याकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाची निर्मिती :
  • २१ जून २०१७ रोजी खगोलविश्वात एका विक्रमाची नोंद होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे भारत या विक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असेल.

  • ‘नासा’ जगातला सर्वात लहान आणि वजनाने हलका उपग्रह अवकाशात सोडणार असून त्याची निर्मिती एका भारतीय विद्यार्थ्याने केली आहे.

  • ‘कलामसॅट’ असं या उपग्रहाचं नामकरण करण्यात आलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे हा उपग्रह लाँच होईल. बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने या उपग्रहाची निर्मिती केली आहे.

  • तामिळनाडूतील पल्लापट्टीमध्ये राहणाऱ्या रिफात शारुकने प्रयोग केला आहे. या उपग्रहाचं वजन अवघं 64 ग्रॅम आहे. हा जगातला सर्वात लहान आणि वजनाने हलका उपग्रह ठरणार आहे. ‘द टीकेक’ या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • 3D प्रिंटिंगद्वारे या प्रकल्पाचं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. ‘क्युब्ज इन स्पेस’ या स्पर्धेतून शारुकच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. ही स्पर्धा ‘नासा’ आणि ‘आय डूडल लर्निंग’ यांनी एकत्रितपणे आयोजित केली होती.

बोफोर्सनंतर तीन दशकांनी भारताला मिळणार नव्या तोफा : 
  • बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारानंतर तब्बल तीन दशकांनी भारतीय लष्कराला नव्या तोफा मिळाल्या आहेत. बीएई सिस्टिम या अमेरिकन कंपनीकडून 155MM/39 कॅलिबर अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा  भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. आज राजस्थानातील पोखरण तळावर या तोफाची चाचणी होणार आहे.

  • केंद्र सरकारने २०१० मध्ये अमेरिकेबरोबर एम ७७७ तोफाच्या खरेदीसाठी बोलणी सुरु केली होती. 

  • २६ जून २०१६ सरकारने १४५ तोफा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. तोफांचा हा सौदा विदेशी सैन्य विक्री (एफएमएस)द्वारे होणार आहे; पण सुटे भाग, दुरुस्ती आणि दारूगोळा यांचे परिचालन भारतीय प्रणालीद्वारे होईल, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात २९०० कोटी रुपयांच्या या खरेदी व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाली.

  • ८० च्या दशकात स्वीडन बरोबर झालेल्या बोफोर्स तोफा खरेदीच्या व्यवहारानंतर प्रथमच भारतीय लष्कराला अत्याधुनिक तोफा मिळणार आहेत. त्यावेळी बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते. 

  • तोफा खरेदी करताना सरकारने स्वदेशी निर्मितीला प्राधान्य दिले असून, 2020 पर्यंत 3503 तोफांनी सुसज्ज राहण्याचे लक्ष्य आहे.

स्वतंत्र ओबीसी विभागाची स्थापना :
  • नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित करण्यात आले असून, त्या संबंधीची अधिसूचनाही काढण्यात आली आहे.

  • इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून, त्याला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, असे नाव देण्यात आले आहे. सध्या या विभागाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.

  • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे ही नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.

  • या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे कामही हा विभाग करेल. इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.नितीन करमळकर यांची नियुक्ती :
  • प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे नवे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना कार्यभार देणार आहेत.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी जाहीर केले.

  • करमळकर हे पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुलगुरू पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या.

अणुउर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा विस्तार - पहिल्यांदाच एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी :
  • ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

  • देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने १० नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवला आहे.

  • एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.

  • जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत. तर २००५ आणि २००६ मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे. नव्या अणुभट्ट्यांची क्षमता ७०० मेगावॉट इतकी असणार आहे. 

  • ‘२०२१-२२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार आहेत. त्यामुळे उर्जा निर्मितीत मोठी वाढ होणार आहे. १० नव्या अणुभट्ट्यांमुळे देशातील उर्जा उत्पादनात ६,७०० मेगावॉट्सची भर पडणार आहे. 

मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या 'ग्लोबल गेम चेंजर्स' यादीत समावेश :
  • मुकेश अंबानी आपल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आणत आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनमान बदलत आहे.

  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या 'ग्लोबल गेम चेंजर्स' यादीत समावेश झाला आहे. 

  • रिलायन्सने वर्षभरापुर्वी सादर केलेल्या 'जिओ'मुळे भारतात कोट्यावधी लोकांना इंटरनेटचा वापर करता येणे शक्य झाले. कोट्यावधी लोकांना इंटरनेटवर आणण्यासाठी अंबानी यांनी प्रयत्न करत आहेत.

  • अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा 'ग्लोबल गेम चेंजर्स'च्या यादीत समावेश झाला आहे. तेल उत्खनन क्षेत्रातील मोठी असामी असलेल्या मुकेश अंबानींनीं टेलिकॉम क्षेत्रात दणक्यात प्रवेश केला आहे. सहा महिन्यात जिओने १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे.

  • फोर्ब्जच्या यादीत सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, 'डायसन' कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे आणि अमेरिकी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांचा देखील समावेश आहे.

भारतात आयफोनच्या निर्मितीला सुरवात :
  • अॅपलने उत्पादन आणि दुरुस्ती प्रकल्प, स्मार्टफोन्समधील सुट्या भागांवर १५ वर्षांच्या कालावधीसाठी विविध शुल्कातून सूट देण्याची मागणी केली होती. याअंतर्गत आयात व उत्पादन शुल्कात विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे.   

  • विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असे सूत्रांनी सांगितले.

  • चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे. कंपनीने भारतात प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारकडे करसवलतींची मागणी केली आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • --

जन्म, वाढदिवस

  • छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र : १८ मे १६८२

  • एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान : १८ मे १९३३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता : १८ मे १९८६

  • बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत : १८ मे १८४६

ठळक घटना

  • कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना : १८ मे १९७२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.