चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ मे २०१९

Date : 18 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई :
  • काठमांडू : आयुष्यात एकदा का होईना, माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचे जगभरातील गिर्यारोहकाचे स्वप्न असते. हिमालयीन पर्वतरांगेतील वातावरण किंवा हिमस्खलन, आकस्मिक घटना वा तब्येतीने साथ न दिल्याने अनेकांना वारंवार प्रयत्न करूनही यात यश मिळत नाही.

  • जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला.

  • ‘द हिमालयन टाइम्स’च्या वृत्तानुसार मागच्या वर्षी शेरपाने २२ व्या वेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला होता. त्याने बुधवारी अन्य साथीदार शेरपांसोबत ८,८५० मीटर उंचीवर शिखर सर केले. तब्बल तेवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे ‘सर’ करणाऱ्या या नेपाळी गिर्यारोहकाचे नाव कामी रिता शेरपा आहे.

  • ‘माय रिपब्लिका’ या नेपाळी वृत्तपत्रानुसार कामी रिता १९९४ पासून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करतो. १९९५ मध्ये त्याचा साथीदार मोहिमेच्या वाटेवरच आजारी पडल्याने त्याला एव्हरेस्टवर चढाई करता आली नव्हती.

  • २०१७ मध्ये कामी रिता शेरपा एकवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारी तिसरी व्यक्ती ठरली होती. त्यावेळी त्याने अपा शेरपा आणि फूरबा ताशी शेरपा यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये सर्वाधिक वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. 

उद्या जाहीर होणार एक्झिट पोल :
  • Exit Poll: लोकसभा निवडणुकीचं सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून आता फक्त शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणं बाकी आहे. १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय पक्षांना आणि देशभरातील लोकांना निकालाची प्रतिक्षा असणार आहे. त्यासाठी २३ मे पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र त्याआधी नेमका निकाल काय असू शकतो हे दर्शवणारे एक्झिट पोल जाहीर होतील. उद्या म्हणजेच १९ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जाहीर केला जाईल.

  • २३ मे रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर केंद्रात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २३ मे रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. एक्झिट पोलच्या माध्यमातून नेमका निकाल नाही, मात्र काय निकाल असू शकतो याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

  • एक्झिट पोल म्हणजे काय - सध्या देशभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीचं सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर केंद्रात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २३ मे रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

  • निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.

केंद्रात पुन्हा आमचेच बहुमतातील सरकार :
  • नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात पाच वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या वार्तालापात मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, पण भाजपप्रणीत एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा केंद्रात स्थापन होईल, असा दावा केला.

  • केंद्रात पाच वर्षे पूर्ण बहुमत असलेले सरकार चालवले जाते, तेच सरकार पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येते असे दीर्घकाळ पाहायला मिळालेले नाही. सत्तेवर आलेल्या काही सरकारांना पुन्हा सत्ता मिळाली नाही. काही सरकारे वर्ष-दीड वर्षे टिकली. काही सरकारांना पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी जरूर मिळाली, पण घराण्याच्या आशीर्वादाने ती सत्तेत राहिली, असे सांगत मोदींनी गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली.
  • २०१९ची लोकसभा निवडणूक ‘शानदार’ झाली. पूर्ण बहुमतातील सरकारला लोकांनी पाठिंबा दिला. मतदारांना धन्यवाद देण्यासाठी मी प्रचारात उतरलो होतो. यंदाचा प्रचार म्हणजे माझ्यासाठी ‘धन्यवाद मोहीम’ होती, असे मोदी म्हणाले. भाजपच्या संकल्पपत्रात विकासकामांचा उल्लेख केलेला आहे. त्यातील प्रत्येक काम देशातील अखेरच्या लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. निकालानंतर सत्ता स्थापन होताच विकास कामे पुन्हा सलग सुरू होतील, असेही मोदी यांनी सांगितले.

  • पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने देशाबाहेर घ्यावे लागले होते पण, यावेळी देशात आयपीएलचे सामने खेळले गेले, रमझान, परीक्षा झाली आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचारही झाला. सर्व गोष्टी शांततेत पार पडल्या. हे केंद्रात सशक्त सरकार असल्यामुळेच साध्य होऊ शकले, असेही मत मोदींनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील शाईचे दुष्परिणाम :
  • लोकसभा निवडणुकीचे निकाल आठ दिवसांवर आलेले असताना २९ एप्रिल रोजी मतदाराच्या बोटावर लावण्यात आलेली शाई व ही शाई लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातावरील डागाचे दुष्परिणाम आजही भोगावे लागत आहेत. सानपाडा येथील विवेकानंद विद्यालयातील मतदान केंद्रात शाई लावण्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील स्नेहा मराठे यांच्या त्वचेवर वैद्यकीय उपचार करण्याची वेळ आली आहे. हा वैद्यकीय खर्च निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • देशातील लोकसभा निवडणुकीचे  चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ठाणे लोकसभा मतदार संघातील २५७३ मतदान केंद्रापैकी नवी मुंबईत एकूण साडेचारशे  मतदान केंद्रावर हे मतदान पार पडले. त्यातील सानपाडा येथील विवेकानंद विद्यालयात पीओटूचे अर्थात मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील स्नेहा मराठे यांनी तीन-चार मतदारांच्या बोटाला शाई लावल्यानंतर त्यांच्या हाताला खाज सुटायला लागली.

  • हीच स्थिती शाई लागलेल्या मतदारांची होती, पण त्यांची शाई केवळ बोटाला लागली असल्याने त्याचे दुष्परिणाम जास्त जाणवत नव्हते. मतदारांच्या बोटाला शाई लावताना काही प्रमाणातील शाई मराठे यांच्या हाताला लागल्यानंतर खाज सुटण्याचे प्रमाण जास्त जाणवू लागले होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मराठे यांचा एक हात लालेलाल झाला होता. एक दोन दिवसांनंतरही ही खाज सुटण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने अखेर मराठे यांना वैद्यकीय उपचार करण्याची वेळ आली.

  • त्यात त्यांचा बराच खर्च झाला. आज उद्या हे प्रमाण कमी होईल याची वाट पाहणाऱ्या मराठे यांना या शाईचे दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. त्यामुळे ही शाई निकृष्ट दर्जाची होती असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. शाईमुळे त्वचेचे नुकसान झाले. यासाठी आलेला वैद्यकीय खर्च निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल, ICC कडून बंपर इनामाची घोषणा :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. ३० मे पासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज या स्पर्धेसाठीच्या बंपर इनामाची घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या संघाला यंदा तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलर्सचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे किंमत २८ कोटींच्या रुपयात) याचसोबत उप-विजेत्या संघाला २० लाख डॉलर्सचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.

  • विजेतेपदासाठी घोषणा करण्यात आलेली बक्षिसाची रक्कम ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मानली जात आहे. याचसोबत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला ८ लाख अमेरिकन डॉलरचं इनाम घोषित करण्यात आलं आहे.

  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ आयसीसीने जाहीर केलेलं इनाम पटकावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.

  • १९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

  • १९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

  • १९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

  • १९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

  • १९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.

  • १९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

  • २००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

जन्म 

  • १६८२:  छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)

  • १८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)

  • १९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे१९९८)

  • १९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.

  • १९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

  • १९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)

  • १९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

  • २००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे  संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

  • २०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

  • २०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.