चालू घडामोडी - १८ ऑक्टोबर २०१८

Date : 18 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या कमांडचे नेतृत्व महिलेच्या हाती :
  • लेफ्टनंट जनरल लॉरा जे रिचर्डसन या अमेरिकन सैन्याची सर्वांत मोठ्या कमांडची धुरा सांभाळणार आहेत. एका महिला अधिकाऱ्याला इतकी मोठी जबाबदारी देण्याची अमेरिकेच्या सैन्यदलाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. लॉरा या यूएस आर्मी फोर्सेज कमांडचे (फोर्सकॉम) नेतृत्व करतील. या कमांडमध्ये ७७६००० सैनिक आणि ९६००० सैनिकेतर कर्मचारी आहेत.

  • सैन्य अधिकारी म्हणून लॉरा यांनी आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १९८६ मध्ये त्या अमेरिकेच्या सैन्यदलात सहभागी झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये फर्स्ट कॅवलरी डिव्हिजनचे डेप्यूटी कमांडिग जनरल पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

  • कॅवलरी डिव्हिजन ‘अमेरिका फर्स्ट टीम’ या नावानेही ओळखली जाते. वर्ष २०१७ मध्ये लॉरा जनरल रॉबर्ट बी अब्राम्स यांच्या कमांडमध्ये दुसऱ्या स्थानावर होत्या. त्यावेळी त्या उत्तर कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅग येथील फॉरस्कॉममध्येही डेप्यूटी जनरलपदी होत्या.

अखेर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा :
  • तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अकबर नायजेरियात असताना भारतात मी टूचं वादळ घोंघावलं. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता प्रकरणापासून सुरू झालेलं हे वादळ हा हा  म्हणता सगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलं.

  • एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले. प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला.

  • मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला. याच दरम्यान, मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबरना राजीनामा देणे भाग पडले आहे.

  • माझ्यावरील आरोपांविरोधात मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून मला देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचा आभारी आहे, असे अकबर यांनी म्हटले आहे.

नोटाबंदी 'शत प्रतिशत' पास, जागतिक अहवालात थोपटली मोदींची पाठ :
  • नवी दिल्ली - मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले. त्यामुळे हा निर्णय पूर्णत: चुकीचा ठरल्याचे सांगण्यात येत होते. विशेष म्हणजे काही सर्वेक्षण अहवालातूनही तसे समोर आले होते. मात्र, नोटाबंदी निर्णय चुकीचा ठरला का ? याचे उत्तर केपजेमिनीचा जागतिक अहवाल पाहिल्यानंतर नाही, असेच म्हणावे लागेल.

  • कारण, मोदी सरकारच्या या निर्णयानंतर जागतिक ऑनलाईन व्यवहारांत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा एक टक्क्यांनी जागतिक बाजारातील इलेक्ट्रॉनिक्स व्यवहार वाढल्याचे या जागतिक अहवालात म्हटले आहे. 

  • मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा जागतिक बाजारपेठेत चांगला परिणाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे भारतातील ई-पेमेंट प्रकिया गतीमान झाली आहे. तसेच जागतिक बाजारातही इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट प्रक्रिये मोठी वाढ झाल्याचे या जागतिक अहवालात म्हटले आहे. केपजेमिनी वर्ल्ड पेमेंट रिपोर्टनुसार, आगामी काळात भारत ईलेक्ट्रॉनिक्स पेमेंटप्रणालीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला लवकरच पाठीमागे टाकेल.  

  • भारत सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये घेतलेल्या निर्णयाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, असे आम्हाला अपेक्षित नव्हते. कारण, कॅशलेस व्यवहारात 33.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डेबिट कार्डद्वारे झालेल्या व्यवहारात तब्बल 76.2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात मह्टले आहे. तर क्रेडिट कार्ड व्यवहारातही 2015 च्या तुलनेत मोठी वाढ पाहायला मिळाली. सन 2015 मधील क्रेडिट कार्डच्या 27.8 टक्क्यांवरुन ही वाढ 38.1 टक्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आशिया, CEMEA आणि लॅटीन अमेरिकेतील बाजारात मोबाईल पेमेंट व्यवहारात 16.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

रिलायन्सची रेकॉर्डब्रेक कमाई, दुसऱ्या तिमाहीत कमावला बंपर नफा :
  • नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्सने 9 हजार 516 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. कंपनीने आतापर्यंतच्या इतिहासात मिळवलेला हा सर्वाधिक नफा आहे. कंपनीने गतवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात कमावलेल्या नफ्यापेक्षा यावर्षीच्या नफ्याचे प्रमाण 17.4 टक्क्यांनी अधिक आहे. 

  • मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने एक पत्रक प्रसिद्ध करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 8 हजार 109 कोटी एवढा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपन्नीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन ते 1 लाख 56 हजार 291 कोटींवर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत कंपनीने 9 हजार 459 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. 

  •  आरआयएलचे चेअरमन आणि मॅनेजिंक डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्सने या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स बिझनेसने चांगले प्रदर्शन केले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी हॅथवे केबल आणि डेन नेटवर्कसोबत रणनीतिक भागीदारीची घोषणा केली आहे. 

...तर तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार :
  • मुंबई: खासगी कंपन्यांना आधार क्रमांक देण्याची गरज नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालायानं काही दिवसांपूर्वी दिला. यामुळे मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना आधार कार्ड क्रमांक दिला होता.

  • मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कंपन्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. केवळ आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या तब्बल 50 कोटी ग्राहकांची सेवा खंडित केली जाऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  • खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिला. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या ग्राहकांचं करायचं काय, असा प्रश्न कंपन्यांसमोर आहे. केवळ आधार कार्ड देऊन घेतलेल्या मोबाईल क्रमांकांची संख्या 50 कोटी इतकी आहे. हे सर्व मोबाईल क्रमांक बंद झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे याबद्दल उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. या ग्राहकांना नवीन कागदपत्रं जमा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे संकेत सरकारकडून देण्यात आले.

  • काल दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. याशिवाय दूरसंचार विभागानं यूनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरटी ऑफ इंडियाशी चर्चा करुन या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सरकारला मोबाईल ग्राहकांची चिंता असल्यानं लवकरच यातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती अरुणा सुंदरराजन यांनी दिली. आधार क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेणाऱ्यांमध्ये रिलायन्स जिओच्या ग्राहकांचं प्रमाण सर्वाधित आहे. जिओनं सप्टेंबर 2016 मध्ये सेवा देण्यास सुरुवात केली होती.

गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा दुसरा देश :
  • ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या घोषणेनुसार देशात गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. गांजाच्या वापरास अधिकृत परवानगी देणारा कॅनडा हा दुसराच देश ठरला आहे.

  • वैद्यकीय मारिजुआना यापूर्वीच कॅनडात कायदेशीर असून आता ड्रग म्हणूनही तिथे गांजाला परवानगी मिळाली. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत गांजा (मारिजुआना) कायदेशीर करण्याची घोषणा ट्रुडो यांनी केली होती. त्यानुसार 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. रात्री 12 च्या ठोक्याला दुकानांमध्ये गांजाची विक्रीही सुरु झाली.

  • यापूर्वी फक्त उरुग्वे देशात गांजा कायदेशीर होता. आता कॅनडा हा गांजा अधिकृत करणारा दुसरा आणि सर्वात मोठा देश ठरला आहे. अभिनेता उदय चोप्रानेही भारतात गांजा कायदेशीर करण्याची मागणी केली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांसह ट्विटराईट्सनी त्याचा समाचार घेतला होता.

  • संघटित गुन्हेगारांचे खिसे भरण्यापासून रोखण्यासाठी गांजाची विक्री अधिकृत करण्यात आल्याचं पंतप्रधान ट्रुडो यांनी जून महिन्यात सांगितलं होतं. बार किंवा हॉटेल गांजाची विक्री करता येणार नाही, मात्र सरकारी दुकानांमध्ये नागरिकांना गांजा खरेदी करता येईल.

दिनविशेष :
  • जागतिक रजोनिवृत्ती दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

  • १८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.

  • १९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.

  • १९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.

  • १९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.

  • १९६७: सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

  • १९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.

जन्म 

  • १८६१: न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९३८)

  • १९२५: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म.

  • १९३९: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

  • १९५०: अभिनेता ओम पुरी यांचा जन्म.

  • १९६५: इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म.

  • १९७४: भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७१: पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १७९१)

  • १९०९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ – कलकत्ता)

  • १९५१: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)

  • १९७६: भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८९५)

  • १९९३: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन.

  • २००४: चंदन तस्कर वीरप्पन यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९५२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.