चालू घडामोडी - १८ सप्टेंबर २०१८

Date : 18 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद :
  • दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून- जे- इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशाह किम- जोंग-उन यांच्यामध्ये आजपासून तीन दिवसांची चर्चा परिषद होत आहे.  १८ ते २० सप्टेंबर असे तीन दिवस उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे हे दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटणार आहेत. त्यासाठी मून स्वत: विमानाने सोल ते प्योंगयांग असा विमानप्रवास करुन गेले आहेत.

  • १९५३ साली दोन्ही देशांनी युद्धाला अर्धविराम दिल्यानंतर ६५ वर्षांनंतर शांततेच्या दृष्टीने पावले पडत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये नव्याने चर्चेस सुरुवात झाली. ६५ वर्षांमध्ये प्रथमच उत्तर कोरियाच्या एकाधिकारशहाने सीमा ओलांडून दक्षिण कोरियात प्रवेश केला.

  • पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले.  

  • मात्र हे संकेत आजिबातच स्पष्ट नसल्याचे त्यांच्या बैठकीनंतर काहीच दिवसांमध्ये उघड झाले. किम जोंग उन यांना अण्वस्त्रांचा त्याग करायचा आहे असे आपल्या अधिकाऱ्यांशी ते बोलल्याचा दावा द. कोरियाचे अध्यक्ष मून यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर भेट झाली.

५ दिवसांत लढाई जिंकली, जाणून घ्या काय होते सरदार पटेलांचे 'ऑपरेशन पोलो' :
  • मुंबई - मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम या लढ्यालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याएवढेच महत्व आहे. या लढ्यातही उस्मानाबादपासून ते अंजंठा वेरुळच्या जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.

  • हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या कारवाईला ऑपरेशन पोलो असे म्हटले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशान्वये 'ऑपरेशन पोलो' ही मोहीम राबवून हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाले आणि मराठवाडा मुक्त झाला. त्यामुळेच या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम असेही म्हटले जाते. 

  • उस्मान अली शाह आसिफ जाह सातवा हा हैदराबाद संस्थानचा त्यावेळचा प्रमुख होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 535 लहानसहान संस्थाने खालसा करण्यात आली. या सर्व संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले.

  • मात्र, हैदराबादच्या निजामाने आपले संस्थान विलिनीकरण करण्यास नकार दिला. त्यावेळी निजामाचा प्रमुख म्हणून कासिम रिजवी हैदराबाद संस्थान पाहात होता. रिजवीने रझाकार नावाची संघटना उभारली होती. जवळपास 2 हजार खासगी सैनिक या संघटनेत निजामासाठी काम करत होते. या संघटनेला पाकिस्तानचे नैतिक समर्थन होते, अशी माहिती आहे. तसेच निजामावर संस्थान खालसा करण्यासाठी भारत सरकारकडून दबाव टाकण्यात आला. 

केंद्र सरकारकडून तीन सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचं विलीनीकरण करण्याची घोषणा केली. या विलीनीकरणानंतर देशातील तिसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल. हे विलीनीकरण कर्ज देण्याची क्षमता वाढवणे तसेच, आर्थिक विकास दर वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

  • गेल्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाचं पाच सहकारी बँकांसोबत विलीनीकरण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक निर्माण झाली होती. यासोबतच महिलांसाठी असलेल्या भारतीय महिला बँकेचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. या निर्णयामुळे बँका आणखी मजबूत होतील, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विलीनीकरणाची घोषणा करताना सांगितलं.

  • अनेक बँका सध्या नाजूक स्थितीत आहेत. याचं कारण म्हणजे अतिरिक्त कर्ज आणि बुडित कर्ज (एनपीए) यामध्ये झालेली वाढ. विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या युनिट्सकडून कामकाज वाढवलं जाईल, असं अरुण जेटलींनी सांगितलं.

  • एसबीआयच्या विलीनीकरणाप्रमाणेच या बँकांच्या विलीनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असाही दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

  • तीनही बँकांचे संचालकीय मंडळं विलीनीकरणाच्या प्रस्तावावर विचार करणार आहेत, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विलीनीकरणामुळे कामकाज आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधेत चांगला बदल होईल, असं त्यांनी सांगितलं.

मुंबई-दिल्लीतील ३० टक्के महामार्ग धोकादायक :
  • नवी दिल्ली : मुंबई-दिल्लीमधील राष्ट्रीय महामार्गाचा जवळपास ३० टक्के भाग गाडी, बस आणि ट्रकसाठी धोकादायक आहे. इतकेच नव्हे तर दुचाकी आणि पायी चालणाऱ्यांसाठीही हा महामार्ग जीवघेणा बनला आहे. जागतिक बँक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासह अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. मुंबई-चेन्नई सुवर्ण चतुष्कोणचा निम्म्याहून अधिक भाग धोकादायक असल्याचेही म्हटले आहे.

  • जागतिक बँकेच्या ग्लोबल सेफ्टी, इंटरनॅशनल रोड अ‍ॅसेसमेण्ट प्रोग्राम आणि प्राधिकरणाने दोन मार्गिकांच्या सुरक्षा मानदंडाची पाहणी करून त्याला श्रेणी दिली. त्यामध्ये मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई या दोन मार्गिकांचा अभ्यास करण्यात आला. दोन्ही मार्गिकांच्या केवळ ४० कि.मी.च्या अंतराला पंचतारांकित श्रेणी देण्यात आली आहे, तर ३९ टक्के भागाला एक किंवा दोन स्टार श्रेणी देण्यात आली आहे. एक किंवा दोन स्टार श्रेणी दिलेला भाग हा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वासाठी धोकादायक आहे.

  • दिल्ली-मुंबई या सुवर्ण चतुष्कोणमधील ८२४ कि.मी.च्या भागाला एक किंवा दोन स्टार श्रेणी देण्यात आली आहे. त्यामुळे या धोकादायक भागात प्रवास करताना गाडीचा वेग प्रति किलोमीटर ८० इतकाच ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. देशातील रस्त्यांच्या जाळ्यांपैकी एकूण दोन टक्के रस्ते फक्त राष्ट्रीय महामार्गामध्ये येतात, परंतु राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हा अहवाल महत्त्वाचा आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावर होतात.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.

  • १९१९: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

  • १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

  • १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

  • १९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

  • १९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.

  • २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

जन्म

  • १९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

  • १९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

  • १९७१: अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

मृत्यू

  • १९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

  • १९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

  • २००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

  • २००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.