चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ सप्टेंबर २०१९

Date : 18 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नोकरदार वर्गासाठी खुशखबर… पीएफच्या व्याजदरात वाढ :
  • एकीकडे रोजगार कपात होत असताना केंद्र सरकारने पीएफच्या व्याजदरात वाढ करत नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. पीएफच्या दरात मोदी सरकारने ०.१० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी दिली.

  • पीएफच्या व्याजदरात वाढीवरून करण्यावरून केंद्रीय कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात एकमत होत नव्हते. दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री गंगवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांची यासंदर्भात भेट घेतली. “ईपीएफओच्या ४६ मिलियन सदस्यांना ८.६५ टक्के व्याजदर दिल्यानंतरही ईपीएफओ सरप्लस राहणार आहे. त्याचा परिणाम होणार नाही,” असे गंगवार यांनी स्पष्ट केल्यानंतर पीएफ व्याजदराचा मुद्दा निकाला निघाला.

  • “सण उत्सव तोंडावर असतानाच सरकारने नोकरदार वर्गाला खुशखबर दिली आहे. २०१८-१९ या कालावधीत ईपीएफओच्या ६ कोटी लाभधारकांना ८.६५ टक्के व्याजदर मिळणार आहे,”अशी माहिती गंगवार यांनी दिली. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी व्याजदरात केल्याचे सांगितले. सध्या ईएफपीओतून रक्कम काढायची असेल तर ८.५५ टक्के व्याजदर दिला जात आहे.

  • सध्या ईपीएफवर दिला जाणार व्याजदर हा कोणत्याही शासकीय योजनेपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री सीतारामण यांनी जीपीएफ (जनरल प्रॉव्हिडंट फंड) आणि इतर निधीवरील व्याजदर ७.९ टक्के करण्यात आले होते. त्याची मर्यादा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार आहे.

GSTN ने जाहीर केली नवीन जीएसटी रिटर्नची ऑनलाइन आवृत्ती :
  • सध्या चालू असलेल्या नवीन जीएसटी रिटर्न्स चाचणीचा एक भाग म्हणून वस्तू व सेवा कर नेटवर्ककडून (जीएसटीएन) नवीन रिटर्न जीएसटी एएनएक्स -1 आणि जीएसटी एएनएक्स -2 ची ऑनलाईन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. करदात्यांची ओळख पटवण्याच्या दृष्टीकोनातून ही ऑनलाइन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांची माहिती जीएसटी पोर्टल www.gst.gov.in वर देण्यात आली आहे.

  • नवीन जीएसटी रिटर्न भरण्याच्या प्रस्तावित प्रणालीमध्ये सामान्य करदात्याला फॉर्म जीएसटी आरईटी -१ (सामान्य) (मासिक किंवा तिमाही आधारावर) किंवा (फॉर्म जीएसटी आरईटी) -२ (सहज) / फॉर्म जीएसटी रेट-3 (सुगम) (तिमाही आधारावर दोन्ही) दाखल करावा लागेल. या रिटर्न्सचा एक भाग म्हणून पुरवठा (एनएसटी एएनएक्स – १) आणि आवक पुरवठा एनेक्सचर (जीएसटी एएनएक्स -२) देखील अपलोड करावे लागतील.

  • प्रस्तावित नवीन रिटर्न सिस्टीम असलेल्या भागधारकांची ओळख करुन घेण्यासाठी आणि त्यांचा अभिप्राय / सूचना प्राप्त करण्यासाठी, नवीन रिटर्न ऑफलाइन साधनामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, ऑफलाइन टूलची चाचणी आवृत्ती यावर्षी जुलैमध्ये जीएसटी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

  • नवीन रिटर्न ऑफलाइन साधन (चाचणी) वरील अधिक माहिती https://dashret.gst.gov.in/dashret/trial येथे उपलब्ध आहे.

पंतप्रधान मोदी यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवडय़ात ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार देऊन बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात येणार आहे.  नेतृत्व व भारतातील स्वच्छता उद्दिष्टांची वचनबद्धता यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • पंतप्रधान मोदी हे त्यांच्या अमेरिका दौऱ्यात ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलणार आहेत. त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांचे भाषण होणार आहे. २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत स्वच्छ भारत मोहिमेत ९ कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. भारतातील ९८ टक्के खेडय़ात सध्या शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून चार वर्षांपूर्वी हे प्रमाण ३८ टक्के होते.  बिल गेट्स फाउंडेशनने २४ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे.

  • २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर मानवी हक्कांचे उल्लंघन जास्त प्रमाणात झाल्याने हा पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी दक्षिण आशियायी अमेरिकी गटाने केली आहे. त्यांनी मोदी यांना पुरस्कार देण्याबाबत टीका करणारे खुले पत्र जारी केले आहे. दरम्यान सीएनएनला बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनने पाठवलेल्या निवेदनात मोदी यांना पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

मोदींसह भाजपा नेत्यांच्या ‘लॉजिक’वर काँग्रेसने काढले ‘बंच ऑफ थॉट्स’ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढग आणि रडारच्या विधानापासून ते खासदार सत्यपाल सिंग यांच्या डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतापर्यंत भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.

  • गाजलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर काँग्रेसने डिजिटल स्वरूपात बंच ऑफ थॉट्स असा व्हिडीओ तयार केला आहे. “ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,” असे मतही काँग्रेसने व्यक्त केले आहे.

  • मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सोशल मीडियातूनही आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या अतार्किक वक्तव्यांवरून काँग्रेसने भाजपावर व्यंगात्मक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पियूष गोयल, सत्यपाल सिंग, त्रिवेंद्र सिंग, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, सुशीलकुमार मोदी आदीं नेत्यांनी केलेल्या विधानांवर काँग्रेसने व्हिडीओ स्वरूपात पुस्तक तयार केले आहे.

चांद्रयान २: … म्हणून इस्रोने मानले भारतीयांचे आभार :
  • अंतराळ संशोधन संस्था इस्रो गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रोला मदत करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही पुढे सरसावली होती. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे.

  • अशातच इस्रोने ट्विट करत आपल्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले आहेत. विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगदरम्यान अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडून सतत विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • चांद्रयान 2 या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील विक्रम लँडर हे ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा जमिनीवरील कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोकडून पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु गेल्या दहा दिवसापासून संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यानंतर नासाही इस्रोच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते. परंतु नासाकडून अद्यापही कोणती माहिती देण्यात आली नाही. याचदरम्यान इस्रोने एक ट्विट केलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयामुळे देशात आर्थिक मंदी आली” :
  • ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी देशातील आर्थिक मंदीला सर्वोच्च न्यायालय जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘मंदीची सुरुवात २०१२ साली झाली त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने टू जी स्पेक्ट्रम प्रकरणामध्ये दूरसंचार कंपन्यांचे १२२ परवाने रद्द केले. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला,’ असं साळवे एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

  • प्रसिद्ध वकील इंद्रा जयसिंह यांच्या मालकीची न्यूज वेबसाईट असणाऱ्या ‘द लीफलेट’ला साळवे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये साळवे यांनी हा आरोप केला आहे. ‘आर्थिक मंदीसाठी पूर्णपणे सर्वोच्च न्यायालय दोषी असल्याचे माझे मत आहे. टू जी प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. मात्र परदेशी कंपन्या देशामध्ये गुंतवणूक करत असतानाच सामुहिक पद्धतीने परवाने रद्द करणे चुकीचे आहे.

  • जेव्हा परदेशी कंपनी भारतामध्ये गुंतवणूक करते तेव्हा एका भारतीय कंपनीला सोबत घेऊन त्यांना गुंतवणूक करावी लागते असा नियम आहे. मात्र या कंपन्यांना परवाने कसे मिळतात हे या विदेशी कंपन्यांना ठाऊक नसते. टू जी प्रकरणातही असेच झाले. विदेशी गुंतवणूकदारांनी करोडो रुपये खर्च केले मात्र न्यायालयाने एक निर्णय देत सर्व काही संपवून टाकले. याच निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची पडझड झाली,’ असे मत साळवे यांनी व्यक्त केले आहे. साळवे यांनी ‘आर्थिक प्रकरणांसंदर्भात न्यायलय अनिश्चित असते. त्यामुळेच गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे,’ असे मत व्यक्त केले.

  • देशाला टू जी घोटाळ्यामुळे एक लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे महालेखापालने (कॅग) २०१० मध्ये म्हटले होते. यानंतर २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दूरसंचार कंपन्यांचे १२२ परवाने रद्द केले. या प्रकरणामध्ये साळवेंनी ११ कंपन्यांची बाजू न्यायलयासमोर मांडली होती. साळवे यांनी केलेले दावे न्यायलयाने फेटाळून लावत कंपन्यांच्या विरोधात निर्णय़ दिला होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले

  • १८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

  • १९१९: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

  • १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

  • १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

  • १९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

  • १९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.

  • १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

  • २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

जन्म 

  • १७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

  • १९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

  • १९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

  • १९१२: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

  • १९४५: मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

  • १९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)

  • १९७१: अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)

  • १९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

  • १९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

  • १९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.

  • २००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

  • २००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

  • २०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.