चालू घडामोडी - १९ एप्रिल २०१८

Date : 19 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही म्हणून पाठिवर वार करतो – नरेंद्र मोदी :
  • पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करणारा कारखाना आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला त्यावेळी भारत आता असे हल्ले खपवून घेणार नाही हा संदेश देण्याचा त्यामागे उद्देश होता. आम्हाला शांतता हवी आहे पण त्यासाठी दहशतवादाला खतपाणी घालणे, दहशतवादाची निर्यात अजिबात सहन करणार नाही.

  • त्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल. दहशतवाद अजिबात सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. लंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • प्रश्न-उत्तर असे स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात एका व्यक्तिने त्यांना सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेताना तुमच्या काय भावना होत्या ? असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले कि, भारताकडे सर्जिकल स्ट्राइकचा हजारो वर्षे जुना इतिहास आहे.

  • भारताने कधीही इतरांच्या भूभागावर डोळा ठेवला नाही किंवा कोणाचा प्रदेश बळकावला नाही. पण कोणी जर दहशतवादाचा कारखाना चालवून आमच्या निरपराध लोकांचा बळी घेत असेल, आमच्या नागरिकांवर हल्ले होत असतील तर अशावेळी त्याच भाषेत कसे उत्तर द्यायचे ते मला चांगले कळते असे मोदी म्हणाले. पाकिस्तानकडे युद्ध लढण्याची क्षमता नसून तो पाठिवर वार करतात असेही मोदींनी सांगितले.

आयकर परताव्यात चुकीची माहिती भरल्यास कारवाई :
  • नवी दिल्ली : आयकर परतावा भरताना एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. टॅक्स वाचवण्याच्या नादात चुकीचा आयटी रिटर्न भरल्यास करदात्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. फक्त दंडात्मक कारवाईच नाही, तर तुम्हाला तुरुंगवारीही घडू शकते.

  • पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाइल न करण्याचा इशारा आयकर विभागाने दिला आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल, तर त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत माहिती दिली जाणार आहे.

  • आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवणं किंवा कपात वाढवून दाखवणं यासारख्या 'शक्कल' न लढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आयकर विभागाच्या बंगळुरुतील मध्यवर्ती कार्यालयामार्फत करदात्यांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे.

  • बनावट करसल्लागारांच्या जाळ्यात अडकू नका. परताव्यात उत्पन्न कमी दाखवणं किंवा कपात वाढवून दाखवणं असे प्रकार नियमांनुसार दंडनीय आहेत आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.

चंद्रपूरच्या लेग स्पिनरची चर्चा, थेट राष्ट्रीय शिबिरात निवड :
  • चंद्रपूर : सध्या लेग स्पिन गोलंदाजांसाठी सुगीचे दिवस आहेत. त्याच सुमारास भारतातल्या अंडर नाईन्टिन क्रिकेटमध्ये रोहित दत्तात्रय या लेग स्पिनरच्या नावाची चर्चा होऊ लागली. चंद्रपूरच्या या गुणी लेग स्पिनरनं यंदाच्या मोसमात अशी काय कामगिरी बजावली, की धर्मशालातल्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी त्याची निवड झाली.

  • एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या कूचबिहार करंडकात रोहित दत्तात्रयच्या लेग स्पिननं यंदा धुमाकूळ घातला. त्यानं नऊ सामन्यांमध्ये तब्बल ३५ फलंदाजांना माघारी धाडून बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं.

  • रोहितची हीच कामगिरी विदर्भाच्या कूचबिहार करंडकातल्या यशात मोलाची ठरली. साहजिकच बीसीसीआयच्या अंडर नाईन्टिन राष्ट्रीय शिबिरासाठी रोहित दत्तात्रयची निवड झाली आहे.

  • चंद्रपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहितला बालपणापासून क्रिकेटची आवड होती. पण चंद्रपुरात क्रिकेटची पायाभूत सुविधा नसल्यानं, रोहितला क्रिकेट खेळू द्यावं की नाही याबाबत त्याच्या पालकांच्या मनात शंका होती. पण रोहितनं आपल्या खेळात सातत्य ठेवून आपल्या पालकांचा विश्वास जिंकला.

  • रोहितनं वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या थोरल्या भावाचा आदर्श घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रोहितची खेळातली गती पाहून त्याची पहिल्यांदा विदर्भाच्या अंडर थर्टिन संघात निवड झाली. त्यानं राजसिंग डुंगरपूर करंडकातल्या पदार्पणात १० विकेट्स काढून आपली निवड सार्थही ठरवली. विदर्भानं विजय मर्चंट करंड जिंकला, त्या वेळी रोहितनं आठ विकेट्स काढून अंतिम सामन्याला कलाटणी दिली होती. यंदा अंडर नाईन्टिन वयोगटातही त्यानं आपल्या लेग स्पिनचा करिश्मा दाखवून दिला.

कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; राष्ट्रपती कोविंद संतप्त :
  • कतरा (जम्मू) : जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये बालिकेवर झालेल्या बलात्काराची दंशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली असतानाच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची दखल घेऊन, आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेची शरम वाटते, असे ते म्हणाले.

  • स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही भारतात अशा घटना घडत आहेत. या घटना देशासाठी लज्जास्पद असून, आपण कोणत्या प्रकारचा समाज घडवत आहोत, याचा आता आपण विचार करायला हवा, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी आपला संताप व्यक्त केला.

  • देशात कोणत्याही मुलीच्या किंवा महिलेच्या बाबतीत अशी घटना घडणार नाही, ही जबाबदारी आपली सर्वांची, समाजाची आहे. प्रत्येक मुलीचे रक्षण आपणच करायला हवे, असे सांगून राष्ट्रपतींनी कथुआ बलात्कार प्रकरणातही न्याय झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी आलेले रामनाथ कोविंद कथुआ बलात्कार प्रकरणाविषयी बोलणार का, आपली नाराजी व्यक्त करणार का, अशी चर्चा सुरू होती.

  • देशातील मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही मेरी कोम, मनिका बत्रा, संगीता चानू, मीराबाई चानू यासारख्या देशाच्या कन्यांनी सुवर्ण पदके पटकावून देशाचे नाव मोठे केले, याचाही उल्लेख त्यांनी केला. 

आधारच्या अटी मोडल्यामुळे एअरटेल, अ‍ॅक्सिस बँकेला दंड :
  • नवी दिल्ली : आधार पडताळणीसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न केल्याबद्दल दूरसंचार कंपनी एअरटेल, तसेच अ‍ॅक्सिस बँक यांना आधार प्राधिकरणाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राधिकरणाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.

  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. ए. एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या पीठासमोर ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी ही माहिती दिली. द्विवेदी म्हणाले की, आधार डाटा सुरक्षेबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण आम्ही स्वीकारले आहे. त्यानुसार, एअरटेल व अ‍ॅक्सिस बँकेला दंड ठोठाविण्यात आला आहे.

  • कोणत्या प्रकरणात हा दंड ठोठावला याची माहिती मात्र द्विवेदी यांनी दिली नाही. गेल्या डिसेंबरमध्ये प्राधिकरणाने भारती एअरटेल व एअरटेल पेमेंट बँकेला आधार यंत्रणेवरील पडताळणीस तात्पुरती बंदी घातली होती. त्याच्याशी संबंधित हा दंड आहे का, हेही सांगितले नाही. दंडामागचे कारणही सांगितले नाही.

  • आधार कायदा-२0१६ च्या कलम ५७ अन्वये आधार पडताळणीची परवानगी खासगी संस्था आणि कंपन्यांना देण्यात आली आहे का, अशी विचारणा न्यायालयाने प्राधिकरणाकडे केली, तसेच आधारच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे, असा प्रश्नही विचारला.

  • त्यावर द्विवेदी यांनी सांगितले की, कलम ५७ मध्ये दोन ठोस तरतुदी आहेत. सरकारला वित्तीय व अन्य सबसिडीव्यतिरिक्त कारणांसाठी कुणाची ओळख पडताळणी हवी असेल, तर संबंधित विधानसभेला तसा कायदा करावा लागेल. विशिष्ट उद्दिष्टासाठी ओळख पडताळणीचा कायदा केल्यानंतरच सरकार आधार डाटा पडताळणीसाठी प्राधिकरणाला संपर्क करू शकते.

नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु, वेळापत्रक जाहीर :
  • नाशिक: नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरु होणार आहे.

  • नाशिककरांच्या मागणीनुसार ओझरहून सकाळी 6 वाजता विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. हे विमान 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. तर दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणे सहाला नाशिकमध्ये पोहोचेल.

  • मग नाशिकहून पुण्याला 6 वाजून 5 मिनिटांनी विमान उड्डाण घेईल, तर पुण्याहून नाशिकच्या दिशेने 7 वाजून 5 मिनिटाने विमानाचे उड्डाण होणार आहे. रात्री पावणे आठला ते ओझर विमानतळावर येणार आहे

  • कधी तांत्रिक कारण, कधी पायलटची कमतरता, तर कधी स्लॉटची मर्यादा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक- मुंबई, नाशिक- पुणे विमानसेवा रखडली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु होत आहे. एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर 20 एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु ठेवले आहेत. बहुतांश नाशिककरांना विमानसेवा सुरु झाल्याबाबतची माहिती नव्हती.

  • नवीन वेळापत्रकानुसार उद्यापासून सेवा सुरळीत सुरु होणार आहे.  लोकांचा ओघ वाढावा यासाठी सवलतीच्या दरात काही तिकीटं ठेवले आहेत. निवडक प्रवाशांना अवघ्या 573 रुपयात मुंबई गाठता येणार आहे.

वेळापत्रक

  • ओझर-मुंबई : सकाळी 6 वा निघेल, 6.50 ला मुंबईत पोहोचेल
  • मुंबई-ओझर: दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून उड्डाण, पावणे सहाला नाशिकमध्ये लँड
  • ओझर - पुणे - 6.5 मिनिटांनी उड्डाण, 7.05 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५२६: मुघल सम्राट बाबर यांनी मुघल सत्तेचा पाया घातला.

  • १९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

  • १९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

  • १९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

जन्म

  • १८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

  • १८९२: शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)

  • १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

  • १९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

  • १९८७: रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)

  • १९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)

  • १९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे१९०७)

  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.

  • १९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.

  • २००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

  • २००४: गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.

  • २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.