चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ एप्रिल २०१९

Date : 19 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुण्याचे योगेंद्र पुराणिक जपानमध्ये निवडणूक लढवणार :
  • मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपानमधील निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. योगी हे जपानच्या निवडणुकांमधील पहिलेच भारतीय उमेदवार ठरले आहेत.

  • जपानमधील महापालिका (कुगीकाई) निवडणुकीचं तिकीट योगेंद्र पुराणिक यांना मिळालं आहे. भारतीय नागरिक जपानला स्थायिक होण्यास सुरुवात झाल्यापासून पुराणिक हे निवडणूक लढवणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत.

  • बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या पेन्शनचा प्रश्न सुटावा, यासाठी आपण राजकारणात आल्याचं योगी यांनी सांगितलं.

  • योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान ( CDP)या पक्षाकडून लढत आहेत. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे. टोक्योमध्ये एकूण 23 महापालिका आहेत. त्यापैकी एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात एकूण साडेचार हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि इतर स्थानिक जपानी नागरिकांचा पाठिंबा आपल्याला आहे, असा विश्वास योगेंद्र यांनी व्यक्त केला आहे.

टीम इंडियातील १५ जणांसोबत 'हे' चार क्रिकेटपटूही विश्वचषक दौऱ्यावर :
  • मुंबई : इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी 15 जणांचा समावेश असलेल्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 क्रिकेटपटूंशिवाय आणखी चार खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांना टीम इंडियाच्या नेट सरावासाठी इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.

  • हे चौघं क्रिकेटपटू विश्वचषक दौऱ्यात भारतीय संघाला मदत करतील. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी हे चारही गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळत आहेत.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळणाऱ्या नवदीप सैनीच्या वेगवान गोलंदाजीवे सर्वजण प्रभावित आहेत. चेन्नईकडून खेळणाऱ्या दीपक चाहरने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये दहा विकेट्सही जमा झाल्या आहेत.

  • खलील आणि आवेश यांनी यंदा आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवलेली नसली, तरी त्यांच्या प्रभावी माऱ्याचा टीम इंडियाला नेट प्रॅक्सिस करताना फायदा होईल, असा विश्वास निवडकर्त्यांना वाटतो.

  • विराट कोहलीच्या नेतृत्वात 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बॅकअप विकेटकीपरच्या शर्यतीत दिनेश कार्तिकने रिषभ पंतला मागे टाकत संघात जागा मिळवली.

मोदी सरकारकडून आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर :
  • जालना : देशाच्या सत्तेत काँग्रेसच्या पाच पिढय़ा गेल्या तरी देशातील गरिबी काही हटली नाही, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीकास्त्र सोडले. २० वर्षांपासून सातत्याने हल्ले करणाऱ्या आतंकवाद्यांशी चर्चा करायची की त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, असा प्रश्न करत मोदी सरकार हे आतंकवाद्यांचा कर्दनकाळ असल्याचे प्रतिपादनही शहा यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले.

  • येथील आझाद मदानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे  महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे,पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आदींची उपस्थिती होती.  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गरिबी हटवण्याची भाषा करतात. मात्र जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणीच गरिबी हटवू शकले नाहीत.

  • ५५ वष्रे काँग्रेसचे सरकार होते. मात्र गरिबासाठी काहीच केले नाही. या उलट काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा ५५ महिन्यात प्रचंड विकास कामे केली, असे सांगताना शहा यांनी मोदी सरकारच्या काळात लोकोपयोगी विविध योजना, ओबीसी आयोगाला दिलेला संवैधानिक दर्जा, सवर्णाना दिलेले १० टक्के आरक्षण, आदींची माहिती दिली. अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने १३व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ४ लाख ३८ कोटी रुपये दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • यूपीएच्या सरकारच्या काळात घुसखोर देशात हल्ले करत होते. काँग्रेस सरकार कोणतेच प्रतिउत्तर देत नव्हते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोटमध्ये हवाई सर्जकिल स्ट्राईक करून अतिरेक्यांना ठार करण्याचे आदेश देत अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेखही शहा यांनी या वेळी केला.

प्रचाररथ, रिक्षाचालकांचीही उत्तम कमाई :
  • लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार रथाचे चालक.. रथावर बसून प्रचारपत्रके वाटणारे कार्यकर्ते..  कण्र्यावरून प्रचाराची वर्दी देणाऱ्या रिक्षांच्या फेऱ्या.. उमेदवारांच्या कार्याची माहिती नाटय़ाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचविणारे पथनाटय़ सादर करणारे कलाकार..  अशा साऱ्यांची गेल्या दहा दिवसांपासून जणू लगीनघाई सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

  • लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर म्हणजे ८ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा कामाला लागल्या. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या स्वपक्षातील लोकांची भेट घेऊन त्यांना प्रचारामध्ये सामील करून घेण्यात काही उमेदवारांचे चार-पाच दिवस गेले. गुढीपाडव्यापासून प्रचाराची सुरुवात करीत विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तेव्हापासून प्रचाराने गती घेतली. रविवारी (२१ एप्रिल) प्रचाराच्या तोफा थंडावणार असून उर्वरित तीन दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वच उमेदवार आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

  • भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या प्रचाराची सूत्रे जंगली महाराज रस्त्यावरील निवडणूक कार्यालयातून, तर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची सूत्रे काँग्रेस भवन येथून हलविण्यात येत आहेत. पदयात्रा आणि जाहीर सभांबरोबरच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रचार रथ, उमेदवाराच्या कार्याची माहिती ध्वनिवर्धकावरून देत फिरणाऱ्या रिक्षा आणि पथनाटय़ाचे सादरीकरण अशा पारंपरिक आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर असा आधुनिक मार्गही अवलंबण्यात आला आहे.

  • प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दोन रथ, १६ ते २० रिक्षा, सायकल रिक्षा सध्या प्रचार करण्यामध्ये गुंतल्या आहेत. रथ, रिक्षाचालक आणि सायकलरिक्षाचालक अशा अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. पथनाटय़ सादर करणाऱ्या हौशी कलाकारांना मानधनाबरोबरच भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वेगवेगळ्या मार्गानी असंख्य हात प्रचार कार्यामध्ये गुंतले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

  • १९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

  • १९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

जन्म 

  • १८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

  • १८९२: शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)

  • १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)

  • १९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

  • १९८७: रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)

  • १८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

  • १९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)

  • १९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)

  • १९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)

  • १९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)

  • २००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

  • २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)

  • २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)

  • २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.