चालू घडामोडी - १९ ऑगस्ट २०१८

Date : 19 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राकडून केरळला मदतीचा हात, २० कोटींची आर्थिक मदत जाहीर :
  • केरळमध्ये पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोक वेगवेगळया भागांमध्ये अडकून पडले असून अन्न-पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत. परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन देशाच्या वेगवेगळया भागातून केरळकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही घोषणा केली. केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात आहे.

  • केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एमसीएचआय-सीआरईडीएआयने दीड कोटी रुपयांची अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि जितो इंटरनॅशनलने प्रत्येकी ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत ११ टन कोरडया अन्नाची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील ६ टन अन्न आज संध्याकाळी पाठवण्यात येणार आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केरळी जनतेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या कठिण प्रसंगात केरळी जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • केरळच्या मदतीला पुणेकर धावले - पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे.

संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन :
  • नोबेल शांतता पुरस्काराने गौरविले गेलेले संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.  संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी आलेले ते पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी मुत्सद्दी होते. १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर २००६ अशी त्यांचा कार्यकाल होता. मात्र २०१३पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रांसाठी अन्य जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडल्या होत्या.

  • सोविएत युनियनची पडझड झाल्यानंतर सहा वर्षांनी अन्नान संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी आले होते. त्यानंतर ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला; या कसोटीच्या क्षणी ते या पदावर होते.

  • आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांना मानवतावादी कार्यासाठी मोठय़ा प्रमाणात सज्ज केले होते. जागतिक दहशतवादविरोधी लढय़ाबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील एड्स रोखण्यापासून ते जगभरातील आरोग्य प्रश्नांवरील आणि दारिद्रय़ निर्मूलन कार्याला त्यांनी मोठी चालना दिली होती. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना २००१मध्ये नोबेल शांतता पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठित नागरी पुरस्कार देण्यात आला होता.

  • घाना या देशांत ८ एप्रिल १९३८ रोजी जन्मलेले अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ राहावा यासाठी संयुक्त राष्ट्र विकास समूहाची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रोहिंग्या आणि सीरियातील शरणार्थीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘दी एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाबद्दल जागतिक स्तरावर शोक व्यक्त होत आहे.

जीमेलचे नवे फीचर - ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट :
  • अनावश्यक मेलमुळे भ्रमणध्वनीची मेमरी फूल होण्याचा प्रकार आणि ती डिलीट करण्यात वाया जाणारा वेळ यापासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलने एक नवे फीचर आणले असून त्यामुळे तुम्ही एखाद्याला पाठवत असलेला मेल ठरावीक कालावधीनंतर आपोआर डिलीट होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठविलेले खासगी मेल फॉरवर्ड किंवा कॉपी करता येणार नाहीत.

  • ‘कॉन्फिडेन्शल मोड’ असे या फीचरचे नाव असून ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवत आहात त्यांच्या मेल बॉक्समध्ये तो मेल किती दिवस ठेवायचा आहे याचा निर्णय तुम्हाला घेता येणार आहे. मेल कम्पोझ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कॉन्फिडेन्शलचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून मेल कधी डिलीट करावयाचा त्याची तारीख निश्चित करावयाची आहे.

  • तुम्ही सेट केलेल्या तारखेला त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समधील मेल डिलीट होईल. जीमेलचे हे नवे फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध आहे.

‘अटल’रत्नाला मॉरीशसची श्रद्धांजली, सायबर टॉवरला दिलं वाजपेयींचं नाव :
  • जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी शनिवारपासून मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी ज्या सायबर टॉवरच्या निर्मीतीमध्ये वाजपेयींनी सहकार्य केलं होतं, त्या सायबर टॉवरला ‘अटल बिहारी वाजपेयी’ नाव देण्याची घोषणा केली.

  • संमेलनाच्या सुरूवातीला दोन मिनिट मौन धारण करुन वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यादेखील उपस्थित होत्या.

  • संमेलनात भारतीय नेत्यांसह जगभरातील विविध देशांचे नेत्यांनीही भाग घेतला. यापूर्वी वाजपेयींचा सन्मान म्हणून मॉरीशसने त्यांचा राष्ट्रध्वजही खाली घेतला होता.

  • हिंदी संमेलनात सहभागी होण्यासाठी जवळपास २९० अधिकारी लुईस पोर्टवर दाखल झाले होते. देशातील २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधींनी या संमेलनात पहिल्यांदाच भाग घेतला आहे. हे संमेलन ३ दिवस चालणार आहे. दरम्यान, या संमेलनात विविध हिंदी आणि भारतीय संस्कृतीवरील ८ विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदींनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळसाठी केंद्राकडून ५०० कोटींची मदत :
  • कोची : महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. केरळातील या पूरपरिस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाहणी केली. केरळला 500 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. काल रात्रीच मोदी तिरुवअनंतपुरममध्ये दाखल झाले होते. आजही केरळमधील पूरपरिस्थिती कायम आहे. हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर केला आहे.

  • पुरातील मृतांचा आकडा 324 वर - दरम्यान केरळमधील भीषण पूरात 324 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. एकूण 82 हजार लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळही अद्याप बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु आहे.

  • पूरग्रस्तांना विविध राज्यातून मदत - महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत.

  • टेलिकॉम कंपन्यांकडून पुढील सात दिवस विनामूल्य सेवा - केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला आता अनेक टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य देण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.

भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा :
  • अझहर शेख, नाशिक : भारतातून सौदी अरेबियामधील मक्का शहरात सर्व हज यात्रेकरुन सुखरुप पोहचले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन सर्व भारतीय हजयात्रेकरंनी एकत्र येत उत्साहात मक्कामध्ये साजरा केला.बुधवारी (दि.१५) सकाळी भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली.

  • ‘मिना’ परिसरात सर्व यात्रेकरु मुक्कामी आहे. या ठिकाणी जगभरातून आलेल्या यात्रेकुरंना एकसारखे निवास तंबु सौदी सरकारकडून उभारण्यात आलेले आहेत. यामुळे कोण यात्रेक रु कुठले आहेत, याची ओळख पटविण्यासाठी तंबूंच्या परिसरात असलेले राष्ट्रध्वजांची महत्त्वाची भूमिका असते. ‘मिना’ भागात भारतीय हज यात्रेकरुं च्या तंबूंच्या परिसरात फडकणाऱ्या तिरंगा ध्वजाला सर्व भारतीयांनी एकत्र येत मानवंदना दिली.

  • जिल्ह्यातून सुमारे एक हजार दोनशे यात्रेकरू हजयात्रेसाठी रवाना झाले आहेत. रविवारी (दि.१२) अखेरच्या तीन विमानांनी मुंबईमधून सौदीच्या जेद्दाह विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले. राज्यभरातून सुमारे १५ हजार यात्रेकरू हजला रवाना झाले आहेत. यावर्षी प्रती यात्रेकरूला सुमारे १२ हजारांचा फटका एकूण खर्चामध्ये बसला आहे.

  • दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ या उर्दू महिन्यात धनिक मुस्लीम बांधव हजयात्रेसाठी रवाना होतात. इस्लामच्या पाच मुलस्तंभांपैकी एक स्तंभ ‘हज’ असल्याचे धर्मगुरू सांगतात. ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा दरवर्षी पार पडते. देशभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू हजयात्रेला रवाना झाले आहेत. यावर्षी हजयात्रा महागली जरी असली तरी उत्साह कायम असल्याचे दिसते.

दिनविशेष :
  • जागतिक छायाचित्रण दिन

महत्वाच्या घटना

  • १८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.

  • १९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.

  • १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

  • १९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.

जन्म

  • १८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९४८)

  • १८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)

  • १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)

  • १९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)

  • १९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)

  • १९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)

  • १९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)

  • १९२२: मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म.

  • १९४६: अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा जन्म.

मृत्यू

  • १६६२: फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल यांचे निधन. (जन्म: १९ जून १६२३)

  • १९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९०६)

  • १९७५: शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)

  • १९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.

  • १९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)

  • १९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.

  • १९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)

  • २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.