चालू घडामोडी - १९ फेब्रुवारी २०१९

Date : 19 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी :
  • मुंबई - सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबुकवरुन एक फोटो अपलोड केला आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर चक्क शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुणासोबत नागराज यांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच, असा योग कधी तरीच येतो, असे कॅप्शनही नागराजने लिहिले असून थेट अमेरिकेतून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. 

  • राज्यासह जगभरातील मराठीजणांकडून आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट अमेरिकेत शिवजन्मोत्सव साजरा केला. याबाबतचा फोटोही नागराज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन टाकला आहे. असा सेल्फी काढण्याचा मोह कधी तरीच होतो, असे कॅप्शन नागराज यांनी या फोटोला दिले असून फोटोत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला तरुण आणि पाठीमागे मावळ्यांच्या वेशात आणखी दोन तरुण दिसत आहेत. 

  • कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या शिवजयंती महोत्सवाला नागराज मंजुळेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा करुन शिवरायांचा इतिहास जागविण्याचा प्रयत्न अमेरिकेतील मराठी मंडळींकडून करण्यात येत आहे.

'एनीडेस्क' अॅप अनइन्स्टॉल करा, रिझर्व्ह बँकेचे निर्देश :
  • नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक अलर्ट जारी केला आहे. आरबीआयने म्हटलं आहे की, कोणतीही व्यक्ती एनीडेस्क (AnyDesk) अॅप वापरत असेल, मोबाईल किंवा लॅपटॉमध्ये ते इन्स्टॉल केलं असेल, तर त्याने ते त्वरित अनइन्स्टॉल करावं. सायबर चोर आता या अॅपच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यातील पैसे लंपास करत आहेत.

  • सायबर गुन्हेगारांनी लोकांच्या बँक खात्यामधील पैसे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. सायबर चोरांनी बँकांचे खोटे अॅप्स तयार केले आहेत. या अॅप्सची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातदेखील केली जाते. हे अॅप जो कोणी इन्स्टॉल करुन त्यामध्ये स्वतःच्या बँक खात्यासंदर्भातील माहिती भरेल, त्याच्या खात्यातले सर्व पैसे हे सायबर चोर लुटत आहेत. अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्याने आरबीआयने अलर्ट जारी केला आहे.

  • अशा प्रकारे चोरी केली जाते - सोशल मीडियाद्वारे या अॅप्सची जाहिरात केली जाते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजरला एक नऊ अंकी कोड मिळतो. जेव्हा तो कोड आपण अॅपमध्ये रजिस्टर करुन, तेव्हा मोबाईल या अॅपची परवानगी मागतो. परवानगी दिल्यानंतर या सायबर चोरांना आपल्या बँक खात्यासंबधीचा रिमोट अॅक्सेस मिळतो. त्याद्वारे हे चोर बँक खात्यातले पैसे लुटतात.

फेसबुकवर फक्त भारतीयांनाच देशात राजकीय जाहिरात देता येणार, नवी नियमावली २१ तारखेपासून :
  • मुंबई : फेसबुक येत्या 21 फेब्रुवारीपासून भारतात आपली नवी नियमावली लागू करणार आहे. या नव्या पॉलिसीनुसार यापुढे भारतात राजकीय आणि देशासंदर्भातील जाहिरात प्रसारित करण्यासाठी जाहिरातदार हा भारतीय नागरिक असणं अनिवार्य असणार आहे. यासाठी त्याला सरकारी ओळखपत्रासोबत आवश्यक ती कागदपत्रंही फेसबुकला देणं बंधनकारक राहील. तसंच या जाहिरातीचं शुल्कही भारतीय चलनातच अदा करणं जाहिरातदाराला असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

  • अमेरिका, इंग्लंड आणि ब्राझीलनंतर ही नियमावली लागू झालेला भारत हा चौथा देश ठरला आहे. निवडणुकीच्या काळात मतदानाच्या 48 तास आधी आपण कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिद्ध करणार नाही, असं फेसबुकसह गुगल इंडिया आणि यूट्यूबने सोमवारी हायकोर्टात स्पष्ट केलं.

  • आचारसंहितेच्या काळातील पेड जाहिराती आणि भारतात असंतोष माजवण्यासाठी शेजारील राष्ट्रांकडून समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या जाहिराती यावर आळा घालण्यासाठी ही नवी नियमावली फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील - मोदी :
  • महाराष्ट्राच्या कडेकपारीत ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले आहे. मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत. जय शिवराय.

  • ’ या ट्विटमध्ये मोदींनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोदींनी वेळोवेळी आपल्या भाषणांदरम्यान शिवाजी माहाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख आहे. या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात, ‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यांनी अनेक संकटे असतानाही आपल्या योग्यता आणि क्षमतेच्या आधारे सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला.

  • जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील आहे, ज्यांनी संघर्ष करत असतानाही सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.’ त्यापुढे मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या दाखला देत शिवाजी महाराजांची स्तृती केली आहे. ‘प्रभू रामांनी लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांची संघटन कौशल्य वापरून शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केले,’ असंही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

कोलकात्याच्या आयुक्तपदावरून राजीव कुमार यांची बदली :
  • शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची बदली करण्यात आली आहे. ‘सीएनएन न्यूज 18’ ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सीआयडी अर्थात राज्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेत राजीव कुमार यांना पाठवण्याची शक्यता आहे.

  • राजीव कुमार यांच्याकडे सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. या वृत्तानुसार, राजीव कुमार यांच्यानंतर अनुज शर्मा हे कोलकाता शहराचे नवे पोलीस आयुक्त असू शकतात. नियमानुसारच कुमार यांची बदली झाल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

  • काही दिवसांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयचे एक पथक कोलकाता येथे राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोलकात्याच्या स्थानिक पोलिसांनीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त काही वेळातच पसरलं आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

  • यानंतर केंद्र सरकार जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली आणि कारवाईविरोधात धरणे आंदोलनही केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजीव कुमार यांना अटक करण्यास मनाई केली पण चौकशीसाठी सीबीआयच्या शिलाँग येथील मुख्यालयात त्यांना उपस्थित व्हावं लागलं होतं. अखेर आता राजीव कुमार यांची बदली झाली आहे.

रिझर्व्ह बँक सरकारला देणार २८ हजार कोटी रूपये :
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सरकारला २८ हजार कोटी रूपयांची अंतरिम शिलकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली हे या बैठकीस उपस्थित होते.. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

  • रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटले आहे की, संचालक मंडळाने देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीची समीक्षा केली. त्याचबरोबर आरबीआयच्या कॅपिटल फ्रेमवर्कच्या मर्यादेत लेखापरिक्षणानंतर २८ हजार कोटी रूपये अंतरिम शिल्लक सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास हे होते.

  • मागील आर्थिक वर्षात आरबीआयने सरकारला अंतरिम शिलकीच्या रूपात १० हजार कोटी रूपये दिले होते. आरबीआयच्या या रकमेमुळे सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारला आपली आर्थिक तूट नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत मिळणार आहे.

  • या बैठकीला डेप्यूटी गव्हर्नर विरल आचार्य, एन एस विश्वनाथ, बी पी कानूनगो आणि महेश कुमार उपस्थित होते. त्याशिवाय भारत दोशी, सुधीर मांकड, मनीश सबरवाल, प्रसन्ना कुमार मोहंती, दिलीप संघवी, सतीश मराठे, एस गुरूमूर्ती, रेवती अय्यर आणि सचिन चतुर्वेदी सहभागी झाले होते.

अनिल बिलावा झाला ‘मुंबई श्री’, डॉ. मंजिरी भावसार ठरली ‘मिस मुंबई’ :
  • नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा शरीरसौष्ठवपटू अनिल बिलावा याने मुंबई श्रीचा किताब पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. नवोदित मुंबई श्री स्पर्धेत उतरण्यापूर्वी ज्या शरीरसौष्ठवपटूकडे कोणी गांभीर्याने पाहिले नव्हते. त्या अनिलने भारतातील प्रतिष्ठेच्या मुंबई श्री स्पर्धेचा किताब पटकावला. संभाव्य विजेत्यांवर त्याने सहजगत्या मात केली आणि स्पार्टन मुंबई श्रीचे जेतेपद निर्विवाद जिंकण्याचा पराक्रम केला. याचसह गेल्या वर्षी न होऊ शकलेल्या पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत डॉ. मंजिरी भावसार यांनी बाजी मारली.

  • मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून मुंबई श्री जिंकणारा अनिल बिलावा हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मिळ असा इतिहास रचला. तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली.

  • आरोग्य प्रतिष्ठानला बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने आयोजनाची संधी दिली. मुंबईकर आणि शरीरसौष्ठवपटूंच्या फिटनेससाठी प्रथमच आयोजित केलेला मुंबई फिटनेस सोहळा तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या गर्दीमुळे हिट ठरला. एकंदर ९ गटातील ४८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.

  • ५५ किलो वजनी गटात नितीन शिगवणने जितेंद्र पाटीलवर मात केली. ६० किलो वजनी गटात देवचंद गावडेचे कडवे आव्हान अविनाश वनेने मोडून काढले. उमेश गुप्ता ६५ किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले. ७० किलो वजनी गटात रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करीत गट विजेतपदावर आपले नाव कोरले, तर ७५ किलो वजनी गटात भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात १७० सेंमी उंचीच्या गटात महेश गावडे तर १७० सेंमीवरील उंचीच्या गटात शुभम कांदू अव्वल आला.

दिनविशेष :
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती

महत्वाच्या घटना 

  • १८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

  • १९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.

  • २००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

जन्म 

  • १४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)

  • १६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

  • १८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्‍हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)

  • १८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

  • १९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून१९७३)

  • १९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

मृत्यू 

  • १८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.

  • १९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)

  • १९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.

  • १९५६: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.