चालू घडामोडी - १९ जानेवारी २०१९

Date : 19 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उत्तर प्रदेशमध्येही खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण लागू :
  • लखनौ -  खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटनेही खुल्या प्रवर्गातील गरिबांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे आरक्षण लागू करण्यारे देशातील सहावे राज्य ठरले आहे. 

  • केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यासंदर्भात मोदी सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेने मोठ्या बहुमतासह मंजुरी दिली होती. तसेच राष्ट्रपतींनीही या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.

  • त्यानंतर विविध राज्यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यात या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तरखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही या आरक्षणाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली होती. 

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय :
  • मेलबर्न : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 7 गडी आणि 4 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. महेंद्रसिंग धोनीने भारताला हा सामना जिंकून दिला आहे. धोनीने 114 चेंडूत 87 धावा केल्या, तर त्याला केदार जाधवने 57 चेंडूत 61 धावा करत चांगली साथ दिली. त्याअगोदर कर्णधार विराट कोहलीने 62 चेंडूत 46 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेले 231 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले

  • दरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी मेलबर्नच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 48.4 षटकात अवघ्या 230 धावांत गुंडाळला आहे. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हॅन्ड्सकॉम्ब याने सर्वाधिक 58 धावा केल्या.

  • 231 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारतातर्फे महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक 87 धावा केल्या त्याला केदार जाधवने 61 धावा करत उत्तम साथ दिली.

  • मेलबर्नच्या वन डेवर आज सकाळपासून पावसाचे सावट होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. यजुवेंद्र चहलने 42 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम :
  • नवी दिल्ली : निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु शकतं, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडण्याची शक्यता आहे.

  • सध्या सुरु असलेल्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 ला संपणार आहे. त्यापूर्वी आगामी निवडणुका कोणत्या महिन्यात आणि किती टप्प्यात घेण्यात येणार? ही प्रक्रिया आयोगाने सुरु केली आहे. आयोगाने 2004 चा लोकसभा निवडणूक कार्यक्रम 29 फेब्रवारीला जाहीर केला होता. या निवडणुका चार टप्प्यात झाल्या होत्या. तसेच 2009 मध्ये 2 मार्चआणि 2014 मध्ये 5 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मागील तीन लोकसभा निवडणुका एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान झाल्या.

  • लोकसभा निवडणुकांसह आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सिक्किम विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे. तर आंध्र प्रदेश, ओदिशा, आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांचा जून महिन्यात कार्यकाळ पूर्ण होईल.

  • दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी पक्षाची सत्ता होती. मात्र भाजप सत्तेतून पडला होता आणि तेथे राज्यापाल शासन लागू करण्यात आलं होत. सध्या तेथे राष्ट्रपती राजवट सुरु आहे. निवडणूक आयोगाला मे महिन्यात काश्मीरमध्ये निवडणुका घेणं अनिवार्य आहे. परंतू काश्मीरमधील निवडणुकांसाठी सुरक्षेबाबत विचार केला जाईल. जम्मू काश्मीरचा सहा वर्षाचा निर्धारित कार्यकाळ 16 मार्च 2021 पर्यंत होता. मात्र कोणत्याही पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये काश्मीर विधानसभा भंग करण्यात आली आहे.

भारतासाठी अमेरिकी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण :
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याबाबत भारतासमवेत चर्चा सुरू केली आहे. भारतासमवेत संरक्षण संबंध बळकट करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे पेण्टागॉनने म्हटले आहे. भारताला चीन आणि पाकिस्तानकडून असलेले आव्हान लक्षात घेता अमेरिकेकडून हे तंत्रज्ञान मिळाले तर ते  अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जी रणनीती आहे त्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. पेण्टागॉनच्या ८१ पानांच्या क्षेपणास्त्र संरक्षण आढावा अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेकडून भारताला अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर चीन आणि पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे.

  • भारत पाच अब्ज डॉलर खर्च करून रशियाकडून एस-४०० हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकत घेणार होता. भारताच्या या निर्णयावर अमेरिकेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. क्षेपणास्त्र क्षमता आता केवळ जगातील काही भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. दक्षिण आशियातील अनेक देश आता अत्याधुनिक आणि विविध टप्प्यांपर्यंत मारक क्षमता असलेली बॅलेस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित करीत आहेत, असे पेण्टागॉनच्या अहवालामध्ये म्हटले आहे. अमेरिकेने भारतासमवेत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याची चर्चा केली.

  • रशिया आणि चीनच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून अमेरिकेला धोका असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. यापूर्वी भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देण्याबाबत अमेरिकेने स्वारस्य दाखविले नव्हते. आता अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जी रणनीती आहे त्यामध्ये ट्रम्प प्रशासनाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दर्शविली आहे.

गेल्या चार वर्षांतच सर्वाधिक गुंतवणूक :
  • रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणुकीत भरघोस वाढ आवश्यक असून गेल्या चार वर्षांच्या आमच्या कारकीर्दीत परकीय गुंतवणूक सर्वाधिक झाली आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक परिषदेत केले.

  • जगभरातून आलेल्या राजकीय आणि अर्थ क्षेत्रातील नेते आणि धुरीणांसमोर ते म्हणाले की, ‘‘गेल्या चार वर्षांत २६३ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक देशात झाली. ही गेल्या १८ वर्षांच्या कालावधीतील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४५ टक्के गुंतवणूक ठरली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीचे ९० टक्के प्रस्ताव हे नियमनरहित थेट मार्गाने मंजूर झाल्याने परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडील ओघ वाढत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

  • गेल्या चार वर्षांत आर्थिक विकासदर ७.३ टक्क्यांवर राहिला आहे. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाणही १९९१ पासून सर्वाधिक आहे, असेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ‘‘भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे. या देशात नफा कमावण्यासाठी येणाऱ्या गुंतवणूकदारांना म्हणूनच आम्ही सांगतो की, तुम्ही इथे रोजगार संधी वाढतील, लोकांचे जीवन अधिक सुखकर होईल, याकडेही लक्ष द्या.’’

संरक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; सैन्य पोलिसांत २० टक्के महिलांची भरती होणार :
  • संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता मिलिटरी पोलिसांत २० टक्के महिलांची जवान म्हणून भरती होणार आहे.

  • लष्कराच्या मिलिटरी पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, महिलांना जवान म्हणून वर्गीकृत पद्धतीने यात सामील केले जाणार आहे. त्यामुळे लष्काराच्या कोर ऑफ मिलिटरी पोलिसांत २० टक्के महिलांची भरती करण्यात येणार आहे.

मुस्लिम व्यक्तीने साकारली जगातील सर्वांत उंच दुर्गा मूर्ती; लिम्का बुकमध्ये नोंद :
  • एका मुस्लिम मूर्तिकाराने जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे. नुरुद्दीन अहमद असे त्यांचे नाव असून त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने ‘कलाकाराला कोणताही धर्म नसतो’ असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही दिला आहे.

  • अहमद हे गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील रहिवासी आहेत. त्यांनी गुवाहाटीतील विष्णुपूरमध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये बांबूपासून ९८ फूट उंच दुर्गामातेची मूर्ती साकारली होती. त्यावेळी त्यांच्या या कामगिरीची बरीच चर्चा झाली होती. यावर बोलताना अहमद म्हणतात, अनेक लोक माझ्या कामाचे कौतुक करतात, मला त्रासही देत नाहीत. मात्र, काही लोक मला जाणीवपूर्वक विचारतात की या कामामध्ये माझा धर्म अडथळा ठरत नाही का? मात्र, मी त्यांना सांगतो की, यात धर्माची बाब येते कुठून. कलाकारांचा कोणताही धर्म नसतो.

  • सप्टेंबर २०१७ मध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्हीही समुदायांच्या ४० लोकांनी मिळून अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली ती विशाल मूर्ती बनवली होती. ती मूर्ती पाहण्यासाठी विष्णुपूरामध्ये एक लाख लोक आले होते.

  • अहमद यांनी केवळ ७ दिवसांमध्ये ही मूर्ती बनवली होती. अहमद म्हणाले, ही मूर्ती साकारण्यासाठी आम्ही ४० दिवस निश्चित केले होते. त्यानुसार ती १७ सप्टेंबरपर्यंत तयारही झाली होती. मात्र, एका वेगाने आलेल्या वादळामध्ये दुर्गा पुजेच्या आठवडाभर आधीच या मूर्तिची मोडतोड झाली. त्यानंतर आठवड्याभराचे आव्हान पेलत आम्ही पुन्हा सुरुवातीपासून ती साकारली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

  • १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

  • १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

  • १९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

  • १९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

  • १९८६: (c) brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

  • १९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

  • १९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

  • २००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

जन्म 

  • १७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

  • १८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

  • १८९८: मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर१९७६)

  • १९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

  • १९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन.

  • १९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०)

  • १९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१)

  • २०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.