चालू घडामोडी - १९ मार्च २०१८

Date : 19 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार जाहीर :
  • नागपूर : 'संगीत सम्राट' व 'सा रे ग म लिटील चॅम्प्स'चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे विजेते ठरले आहेत.

  • लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे वितरण शुक्रवार, २३ मार्च रोजी नागपुरात होत आहे.

  • मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंजली गायकवाड व ब्रजवासी ब्रदर्स यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

  • संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.

  • लोकमत सखी मंच व कॅम्पस क्लब सदस्यांसाठी लोकमत कार्यालयात पासेस उपलब्ध असतील.(source :lokmat)

पुतिनच पुन्हा रशियाचे अध्यक्ष :
  • रशियामध्ये रविवारी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यांत रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते.

  • परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे.

  • पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

श्वास रोखून धरणारे ते सहा चेंडू आणि थरारक विजय :
  • कोलंबो : काल झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडू खेळताना संपूर्ण सामना फिरवला. त्याने दोन चौकार व तीन षटकारांची आतषबाजी करत बांगलादेशच्या हातातून सामना अक्षरश: खेचला.  

  • कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला थरारक विजय मिळवून दिल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना आपली निराशा लपवता आली नाही. 

  • काल झालेल्या अंतिम सामन्यात कार्तिकच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताने विजेतेपदाचा करंडक उचलला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.(source :lokmat)

तुम्ही निवडा यंदाचे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' :
  • मुंबई - गर्जा महाराष्ट्र माझा असे म्हणत ज्यांनी या महाराष्ट्राशी नाते जोडले, महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले अशा महाराष्ट्रातील लोकांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूह 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्काराचाचे नवे पर्व घेऊन आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची नामांकने... (इथे क्लिक करुन तुम्ही तुमचे मत नोंदवा

  • यावर्षीची नामांकने ठरवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातील लोकमतच्या विविध आवृत्त्यांचे संपादक चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेली लोकमत वार्ताहरांची टीम यांच्या मदतीने आकाराला आली आहेत. यावर आता जगभरातील मराठी वाचकांची मोहर उमटेल, नामवंत ज्युरी आपला कौल देतील आणि निवडले जातील यावर्षीचे  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' विजेते. 

  • "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" "वैद्यकीय" यासरख्या विविध क्षेत्रातील मान्यमारांची नामांकने येथे दिली आहेत. आपण ही नामांकने आणि त्यांच्याविषयी दिलेली माहिती वाचून आपले मत देऊ शकता. आपले बहुमूल्य मत ठरवेल  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर'चे विजेते...

मोदी सरकारविरोधात आज संसदेत ‘अविश्वास ठराव’ :
  • नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. काही पक्ष सोडल्यास, बहुतेक सगळ्याच विरोधी पक्षांनी या ठरावाला समर्थन घोषित केले आहे.

  • टीडीपी आणि टीडीपीचे कट्टर विरोधी असणाऱ्या वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली आहे.

  • भाजपवरील विश्वास संपुष्टात आला आहे, त्यामुळे आम्ही अविश्वास ठराव आणत आहोत, असे टीडीपीचे खासदार रविंदर बाबू म्हणाले. तर वायएसआर काँग्रेसचे खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, “संपूर्ण देशाला माहित पडावं की, आंध्र प्रदेशातील लोक कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे आम्ही हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणत आहोत. सर्व विरोधी पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सर्वजण सोबत आहेत. ज्यावेळी आम्ही संसदेत अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडू, त्यावेळी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, एसपी आमच्यासोबत असेल.”

  • मोदी सरकारविरोधातील या पहिल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला डावे पक्ष आणि काँग्रेसनेही समर्थनाची घोषणा केली आहे.

  • अविश्वास ठरावासाठी लागणाऱ्या 54 मतांची जुळवाजुळव करण्यात आली असल्याचे काँग्रेस नेते अश्विनी कुमार म्हणाले. शिवाय, मोदी सरकारवर पहिल्यापासूनच अविश्वास असल्याचे सांगायलाही अश्विनी कुमार विसरले नाहीत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.

  • १८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

  • १९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

  • १९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

  • २००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

  • २००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

  • १८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)

  • १८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म.

  • १९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)

  • १९३६: स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस यांचा जन्म.

  • १९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

  • १९८२: फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

मृत्यू

  • १८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५)

  • १९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)

  • १९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

  • १९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचे निधन. (जन्म: १३ जून १९०९)

  • २००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

  • २००५: डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)

  • २००८: विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.