चालू घडामोडी - १९ मे २०१८

Date : 19 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शंभर टक्के बहुमत सिद्ध करु: येडियुरप्पा :
  • बंगळुरुत: कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने झटका देत येडियुरप्पांना आज दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे.

  • मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही 7 जागा कमी पडत आहेत. 

  • दुसरीकडे काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.

  • त्यामुळे भाजप आज बहुमत कसं सिद्ध करणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे

गोव्यात काँग्रेस, बिहारमध्ये राजदच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली :
  • नवी दिल्ली : जो न्याय कर्नाटकात दिला तोच गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये मिळावा यासाठी काँग्रेस आमदार आक्रमक झाले आहेत. गोव्यात काँग्रेसच्या 13 आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि बहुमताच्या आधारावर सर्वात मोठ्या पक्षाचा दावा करुन सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देण्याची मागणी केली.

  • बिहारमध्येही राजदने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. 'आम्ही सत्तास्थापनेचा दावा करत आहोत. आमच्याकडे अनेक पक्ष आणि आमदारांचं समर्थन आहे' असं पत्र राजद आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यपालांना दिलं आहे.

  • मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंह यांनीही राज्याचे कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली. राज्यपाल या प्रकरणी न्याय देतील, अशी आशा सिंह यांनी व्यक्त केली.

  • आता कर्नाटकमध्ये भाजपने फेकलेले फासे भाजपवरच उलटणार का, की त्यातूनही भाजप तिसरा मार्ग काढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

३६ हजार नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारची नवी अट :
  • मुंबई: फडणवीस सरकार दोन वर्षात तब्बल 72 हजार सरकारी पदं भरणार आहे. त्यापैकी 36 हजार यावर्षी तर 36 हजार पदं पुढील वर्षी भरण्यात येतील. मात्र या भरतीप्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे.

  • ही पदं भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर भरली जातील. त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.

  • जसे सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आहे, ती आता 5 वर्षे असेल. तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची 36 हजार पदं पहिली पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. त्यानंतर ती नियमित केली जातील.

  • राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत आणि त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

बोपय्या यांची पहिल्यांदा परीक्षा, हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीस आक्षेप :
  • नवी दिल्ली : भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे. या नियुक्तीला विरोध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.

  • सुप्रीम कोर्टाचे ताशेरे बोपय्या भाजपातर्फे विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ते २००९ ते २०१३ या काळात कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. आॅक्टोबर २०११ मध्ये सत्ताधारी भाजपामधील ११ असंतुष्ट आमदार व काही अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड करून, पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते.

  • मात्र अध्यक्ष बोपय्या यांनी या आमदारांना अपात्र ठरवल्याने येडियुरप्पा यांचे सरकार वाचले. सर्वोच्च न्यायालयाने बोपय्या यांचा निर्णय रद्द करून त्यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी या आमदारांना अपात्र ठरवण्यात घाई केल्याबद्दल त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, याचा उल्लेख करीत दोन्ही पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.

भारतातील जलसाठ्यांमध्ये झालेली घट चिंताजनक :
  • वॉशिंग्टन : शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याने भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे. मानवी कृतीमुळे ओढावलेल्या या स्थितीचा नासाने उपग्रहांद्वारे प्रथमच अभ्यास केला.

  • यासंदर्भात नासाच्या गोदार्द स्पेस फ्लाइट सेंटरने उपग्रहांची मदत घेऊन केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, उत्तर भारतामध्ये गहू व तांदळाच्या पिकासाठी पाण्याचा अतिवापर केला जातो. त्यामुळे त्या भागातील जलसाठ्यांच्या प्रमाणात खूप घट झाली आहे. अभ्यास झाला, त्या कालावधीत इथे पाऊसमान सामान्य होते. तरीही तिथे वापरता येण्याजोग्या पाण्याचा तुटवटा जाणवत होता. ही बाब निश्चितच गंभीर आहे.

  • हा लेख ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

  • अमेरिकेच्या नासाने व जर्मनीने उपग्रहामार्फत सुमारे १४ वर्षे संयुक्तरित्या राबविलेल्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपिरिअन्सेस या प्रकल्पातील निष्कर्षांचा तसेच अन्य विविध उपग्रहांनी नोंदविलेल्या निरीक्षणांचा नासाने या अभ्यासासाठी वापर केला आहे.

  • बदलत्या प्रमाणास अनेक घटक कारणीभूत नासाच्या जेट प्रॉप्युल्शन लॅबॉरेटरीतील शास्त्रज्ञ जय फमिग्लिट्टी यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर जलसाठ्यांच्या बदलत्या प्रमाणाला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यांचा अधिक सखोल अभ्यास करावा लागेल.

मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीही हिंसाचार सुरूच :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार आणि रविवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कडेकोट सुरक्षा ठेवली असूनही हिंसाचार थांबलेला नाही. गुरुवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलच्या सुरक्षा चौकीवर हल्ला करून तेथे तैनात पोलिसांकडून बंदुका पळवल्या. तर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे.

  • दोन दिवसांच्या भेटीत मोदी यांचे राज्यात भरगच्च कार्यक्रम आहेत. मोदी शनिवारी काश्मीर खोऱ्यातील बंदिपुरा जिल्ह्य़ात ३३० मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत केंद्राचे उद्घाटन करतील. तसेच कारगिल जिल्ह्यातील द्रास विभागात झोझिला बोगद्याची कोनशिला बसवतील. हा बोगदा पूर्ण जाल्यानंतर काश्मीर खोरे आणि लडाख विभाग कायमचे जोडले जातील.

  • स्ध्या हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याचा लडाखशी संपर्क तुटतो. लडाखमधील लेह शहरात मोदी लडाखचे धार्मिक नेते कुशक बाकुला यांच्या १०० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहतील. तर रविवारी नवी दिल्लीला परतम्यापूर्वी जम्मू येथे शेर-ए-कश्मीर शेतकी आणि तांत्रिक विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

  • रमझानच्या महिन्यानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी शस्त्रसंधी जाहीर केला असून दहशतवादविरोधी कारवाया थांबवल्या आहेत. मात्र दहशतवादी, फुटीर नेते आणि पाकिस्तानने त्याकडे सकारात्मकतेने न पाहता हिंसाचार सुरूच ठेवला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.

  • १७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.

  • १९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.

  • १९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.

  • १९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.

जन्म 

  • १८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)

  • १८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)

  • १९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)

  • १९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर  १९५६)

  • १९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)

  • १९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)

  • १९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी१९६५)

  • १९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)

  • १९३८: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.

  • १९६४: तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)

मृत्यू 

  • १९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७०)

  • १९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.

  • १९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.

  • १९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.

  • १९९७: बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट१९१५)

  • २००८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२८ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.