चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ मे २०१९

Date : 19 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सनी देओल यांना निवडणूक आयोगाची नोटीस :
  • निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार सनी देओल यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबत नोटीस जारी केली आहे. सनी देओल यांनी पठाणकोट येथे जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतरच्या काळात सभा घेतली असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यात ध्वनिवर्धकांचाही वापर करण्यात आला. एकूण दोनशे लोक या सभेस उपस्थित होते.

  • शांतता काळात प्रचार सभा घेणे हा आचारसंहितेचा भंग असून मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचार बंद करायचा असतो. रविवारी पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. देओल हे गुरूदासपूर मतदारसंघात काँग्रेसचे सुनील जाखड यांच्या विरोधात लढत देत आहेत.

  • फेसबुकवर फॅन्स ऑफ सनी देओल हे पान सुरू केल्यानंतर त्याचा खर्च भाजपचे गुरूदासपूर येथील उमेदवार असलेल्या सनी देओल यांच्या नावावर निवडणूक खर्च म्हणून लावण्यात आला आहे. देओल यांच्या निवडणूक खर्चात या पानाचे १७४६४४ रुपये धरण्यात आले आहेत.

  • काँग्रेसने ६ मे रोजी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुदासपूर येथील माध्यम प्रमाणन व निरीक्षण संस्थेने याबाबत चौकशी केली. ‘फॅन्स ऑफ सनी देओल’ या पानाच्या अ‍ॅडमिन व भाजप उमेदवार सनी देओल यांना नोटीस देऊन स्पष्टीकरण मागवण्यात आले होते, पण त्यांनी वेळेत उत्तर दिले नाही.

अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

  • अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. त्यांचे भवितव्य १० कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने १ लाख १२ हजार मतदान केंद्रे उभारली आहेत.

  • लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील मतदानासोबतच पणजी आणि तमिळनाडूतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीच्या सहा टप्प्यांमध्ये सरासरी ६६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

भारतीय बॅडमिंटनपटूंचे पदक पटकावण्याचे लक्ष्य :
  • अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत अद्याप एकदाही उपांत्य फेरीत पोहोचता आलेले नसल्याने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेत भारतासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.

  • भारतीय संघ यापूर्वी २०११ आणि २०१७ साली उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यापुढे भारताला मजल मारता आली नाही. ‘१ड’ या गटातून पुढे जाण्यासाठी भारतासमोर बॅडमिंटनमध्ये बलाढय़ मानला जाणारा चीन आणि मलेशिया या दोन संघांचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाची मदार प्रामुख्याने एकेरीतील खेळाडू सिंधू, सायना, यांच्यासह पुरुष गटातील किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा यांच्यावरच राहणार आहे. एकेरीतील हे खेळाडू कामगिरी कशी करतात, त्यावर दुहेरीतील भारताचे आव्हान टिकून राहणार आहे. भारतीय संघाला सोमवारी मलेशियाच्या संघाशी तर मंगळवारी अनेक वेळच्या माजी विजेत्या चीनशी झुंजावे लागणार आहे.

  • १३ सदस्यीय भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले आहे. अद्यापही आजारपणातून तंदुरुस्त न झाल्याने ली चोंग वेई या स्पर्धेत खेळणार नसल्यामुळे मलेशियाचा संघ पुरुष गटात ली झी जिया याच्यावर तर महिला गटात गोह जिन वेई आणि सोनिया चीह यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय संघ एकेरीत तरी त्यांच्यापेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांची अवहेलना :
  • जांभूळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात शहीद झालेल्या १५ जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची तातडीची मदत आणि नोकरीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पूर्ण वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांना मानवंदना देताना केली होती. या घोषणेला १८ दिवस होऊनही शहिदांची कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.

  • कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे १ मे महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे १५ जवान शहीद झाले. या दुर्घटनेनंतर २ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांना मानवंदना देताना त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ लाखांची मदत आणि नोकरीच्या कालावधीपर्यंत पूर्ण वेतन देण्याची घोषणा केली होती.

  • पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही पत्रकार परिषदेत शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ लाखांसह एकूण एक कोटीपेक्षा अधिक मदत मिळेल, त्याचबरोबर हल्ल्यात मृत्यू झालेला वाहनचालक तोमेश्वर सिंगनाथ याला शहीद दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

  • मुख्यमंत्र्यांची २५ लाखांची मदत तर सोडाच साधी विम्याची रक्कमही मिळालेली नाही. परिणामी, या हल्ल्यात शहीद झालेल्या आरिफ तौसीफ शेख यांची पत्नी आणि दोन मुलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरक्षा विम्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे २० लाख रुपये मिळाले नसल्याचे शेख यांच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले. याच स्फोटात शहीद झालेले पुरणशाह प्रतापशाह दुगा यांचा भाऊ किरणशाह दुगा यानेही मुख्यमंत्र्यांची २५ लाखांची मदत वा विम्याचे पैसे मिळाले नसल्याची व्यथा ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली.

निवडणूक आयोगात मतभिन्नता स्वाभाविक :
  • आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या भंगाबाबत येणाऱ्या तक्रारींवर सुनावणी करताना त्यात निवडणूक आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभेद होण्याची बाब नवीन नाही. कारण हे सदस्य एकमेकांचे क्लोन (प्रतिरूप) नसतात. त्यांच्यात मतभिन्नता स्वाभाविक आहे, असे मत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी व्यक्त केले आहे.

  • निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आदर्श आचारसंहिता भंगाच्या सुनावणीतून माघार घेण्याचे जाहीर केले होते. आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात आपली मतभिन्नता ही नोंदवली जात नाही तोपर्यंत आपण सुनावणीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका लवासा यांनी घेतली होती. लवासा यांच्या माघारीच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाची पूर्णस्वरूपी बैठक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आता अरोरा यांनी निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांबाबत प्रथमच जाहीर निवेदन करताना हे सगळे टाळता आले असते असे म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी पाच वेळा दोषमुक्त ठरण्याच्या निर्णयाला लवासा यांनी विरोध केला होता, हे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रथम दिले होते.

  • याबाबत संपर्क साधला असता लवासा यांनी सांगितले, की ही निवडणूक आयोगाची अंतर्गत बाब असून त्यावर आपण प्रतिक्रिया देणार नाही. अरोरा यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाची मागील बैठक १४ मे रोजी झाली होती, त्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात जे वाद उपस्थित होतील त्यावर विचार करण्यासाठी गट स्थापन करण्याचे एकमताने ठरले होते. त्यात १३ मुद्दे होते, त्यात आदर्श आचारसंहितेचा मुद्दाही होता. निवडणूक आयुक्त हे एकमेकांचे क्लोन (प्रतिरूपे) नसतात, त्यामुळे त्यांच्यात मतभेद होणे हे स्वाभाविक आहे.

विश्वचषक विजेत्या संघाला आजवरचं सर्वोच्च इनाम :
  • मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विजेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या संघावर बक्षिसांची खैरात होणार, हे साहजिकच. विश्वविजेत्याला यंदा किती रुपयाचं इनाम मिळणार याची माहिती समोर आली आहे. विजेत्या संघाला तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे 28 कोटी 13 लाख 92 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

  • यंदा उपविजेत्याला मिळणारी रक्कमही थोडी-थोडकी नसून त्याच्या निम्मी म्हणजेच दोन मिलियन डॉलर अर्थात 14 कोटी 6 लाख 96 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे उपान्त्य फेरीत धडक मारलेल्या दोन पराभूत संघांनाही प्रत्येकी आठ लाख डॉलर (5 कोटी 62 लाख 78 हजार 400 रुपये) मिळतील. तर लीग मॅचेसपर्यंत मजल मारणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी 40 हजार डॉलर्स (28 लाख 13 हजार 920 रुपये) ची बक्षिसी मिळेल.

  • चार दशलक्ष डॉलर हे आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2015 मधील क्रिकेट विश्वचषकात विजेच्या ऑस्ट्रेलिया संघाला 3.75 मिलियन डॉलर मिळाले होते. विश्वचषकातील एकूण पारितोषिकांची रक्कम ही गेल्यावेळ प्रमाणेच 10 मिलियन डॉलर इतकी आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.

  • १७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.

  • १९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.

  • १९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.

  • १९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.

जन्म 

  • १८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)

  • १८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)

  • १९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)

  • १९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर  १९५६)

  • १९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ - बंगळुरू)

  • १९२५: ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)

  • १९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)

  • १९२६: आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.

  • १९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)

  • १९३८: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.

मृत्यू 

  • १२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.

  • १९०४: आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८३९)

  • १९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे

  • निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७०)

  • १९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.

  • १९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.

  • १९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.

  • १९९७: बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)

  • १९९९: काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.