चालू घडामोडी - १९ नोव्हेंबर २०१८

Updated On : Nov 19, 2018 | Category : Current Affairsचीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा, OBOR म्हणजे फक्त ‘वन वे रोड’ :
 • सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु असून अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. पापुआ न्यू गिनी येथे सुरु असलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद उमटले. शनिवारी या आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुल्क आकारणी आणि पुरवठा साखळीत अडथळा आणणे यामध्ये दूरदर्शितेचा अभाव दिसतो. हे निर्णय यशस्वी होणार नाहीत असे म्हणाले.

 • जागतिक व्यापार संघटना अधिक भक्कम झाली पाहिजे हे सांगतानाच त्यांनी आपल्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाचे समर्थन केले. काही देशांनी हा सापळा आहे असे चित्र रंगवले आहे पण ते चुकीचे आहे असे जिनपिंग म्हणाले. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे भाषण झाले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना आर्थिक आणि राजनैतिक संबंधांसाठी चीनपेक्षा अमेरिका जास्त चांगला पर्याय आहे असे ते म्हणाले.

 • चीनकडून कर्ज उचलणाऱ्या देशांना त्यांनी इशारा दिला. अमेरिका कधीही आपल्या मित्र देशांना कर्जाच्या समुद्रात बुडवत नाही किंवा वन वे रोड बनवत नाही असे ते म्हणाले. दरम्यान अमेरिकेच्या व्यापारी मागण्यांना चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे पण चार ते पाच मुद्यांवर अजून एकमत झालेले नाही असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले.

 • चीनकडून आयात होणाऱ्या मालावर अमेरिकेने शुक्ल आकारणी केली आहे. चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या मालावर शुल्क आकारणी केली आहे. ट्रम्प चिनी मालावर अजूनही शुल्क आकारु शकतात असे पेन्स शनिवारी म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळेंना 'पार्लमेंट्रियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन' पुरस्कार :
 • मुंबई : 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत.

 • कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात.

 • सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली.

 • आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले.

 • अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला.

राजस्थान निवडणुकांसाठी भाजपाची चौथी यादी जाहीर :
 • जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 24 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत विशेषकरुन कॉंग्रेस सोडून भाजपात आलेल्या महिलां नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.

 • काही तासांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ममता शर्मा यांना पिपल्दा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेसच्या बंडखोर नेत्या कल्पना राजेंना लाडपूरमधून मैदानात उतरवले आहे. कल्पना राजे या कॉंग्रसचे माजी खासदार इज्यराज सिंह यांच्या पत्नी आहेत.

 • या यादीतून विद्यमान 9 आमदारांना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सुमेरपूरचे आमदार मदन राठोड, राजपूत समाजाचे नेते आमदार भवानी सिंह राजावतसह अन्य 7 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच जयपूरचे महापौर अशोक लहोटींना सांगानेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

 • भाजपाने चौथ्या यादीत सुजानगढमधून खेमाराम मेघवाल, दौसातून शंकर शर्मा, आणि गंगापूर शहरातून मानसिंह गुर्जर या विद्यमान आमदारांचा समावेश केला आला आहे. एकूणच या यादीत कॉंग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आलं असल्याचं स्पष्ट होत आहे.

२४ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपविण्यासाठी पाकिस्तान येणार भारतात :
 • मुंबई : भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत. पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कुरापतीमुळे भारताने त्यांच्याशी क्रीडा क्षेत्रातील संबंध तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांत द्विदेशीय मालिका होतच नाही आणि त्यांच्या खेळाडूंना भारतात होणाऱ्या स्पर्धेसाठीचा व्हिसाही अनेकदा नाकारण्यात आला आहे. मात्र, आगामी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धी त्याला अपवाद ठरली आहे. ओडिशा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आला आहे. 

 • जगातील बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या समावेशाबद्दल साशंकता होती. प्रायोजक न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेतून माघार घेतो की काय असे चिन्ह दिसत होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आर्थिक मदत केल्यामुळे हॉकी संघाचा सहभाग जवळपास निश्चित झाला होता. प्रशासकीय होता तो व्हिसाचा. 

 • शनिवारी भारतीय सरकारने तोही मान्य केल्याने पाकिस्तानी खेळाडूचे भारतात येणे पक्के झाले आहे. पाकिस्तान संघाने १३ प्रयत्नांत ४ वेळा विश्वचषक उंचावला आहे. त्यांनी १९९४ मध्ये शेवटची ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे २४ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी ते उत्सुक आहेत.

धक्कादायक...अजमल कसाब भारतीय असल्याचे उत्तरप्रदेशमध्ये दिले निवासी प्रमाणपत्र :
 • औरैया : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव हाती लागलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा भारतीय रहिवासी होता, असे प्रमाणपत्र उत्तर प्रदेश प्रशासनाने दिल्याने खळबळ माजली आहे. कसाबच्या जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केले यानंतर त्वरित सावरत हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

 • बिधुना तहसील कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील आंबेडकर गावातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अजमल कसाबच्या जातीच्या आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या प्रमाणपत्रामध्ये कसाबचे जन्मगाव आंबेडकर नगर असे नोंद आहे. तर हे प्रमाणपत्र 21 ऑक्टोबर, 2018 मध्ये जारी करण्यात आले होते.

 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसाबचा फोटोही लावण्यात आला होता. तरीही हे प्रमाणपत्र देताना अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. तसेच प्रमाणपत्र देतानाही पडताळणी करण्यात आली नाही. अर्जामध्ये कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिर तर आईचे नाव मुमताज बेगम देण्यात आले होते. 

 • कोण होता कसाब - अजमल कसाबने त्याच्या काही साथीदारांसोबत समुद्रमार्गे मुंबईत येऊन 26 नोव्हेंबरला 2008 मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. शहीद तुकाराम ओंबळे यांनी त्याला गंभीर जखमी होऊनही जिवंत पकडले होते. या कसाबला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती. परदेशी नागरिकाला भारतात फाशी देण्याची ही पहिलीच घटना होती. या हल्ल्यात 166 जण ठार तर 600 पेक्षा जास्त जखमी झाले होते.

भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार :
 • गयाना : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचत ब गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार हे गतविजेत्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडयांच्यातील सामन्यानंतर ठरणार होते. विंडीजने चार विकेट राखून इंग्लंडला नमवले आणि अ गटात अव्वल स्थान निश्चित केले. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आणि विंडीजसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. 

 • भारतीय महिला संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेतेपदाच्या अपेक्षा लागल्या आहेत. त्यात उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ समोर आल्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद वाढला आहे. 2017 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडने अटीतटीच्या सामन्यात भारताला पराभूत केले होते. त्या पराभवाचा सव्याज वचपा काढण्याची संधी भारतीय खेळाडूंसाठी चालून आली आहे.

 • भारतीय महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून विजयी घोडदौड कायम राखली आहे.  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने २०१४ आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत साखळी गटातील सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. तोच पराक्रम हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने केला.

 • विश्वचषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्व सामने जिंकणारा हा तिसरा भारतीय संघ ठरला. यापूर्वी पुरुष संघाने साखळी गटात २०१४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत चार आणि २०१५ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत सहा सामने जिंकले होते. 

दिनविशेष :
 • जागतिक शौचालय दिन / आंतरराष्ट्रीय पुरूष दिन / महिला उद्योजकता दिन

महत्वाच्या घटना 

 • १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 • १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

 • १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.

 • १९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

 • १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

 • १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

 • १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

 • २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..

जन्म 

 • १८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)

 • १८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)

 • १८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)

 • १८४५: भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९३९)

 • १८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे १९५०)

 • १८७७: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९४७)

 • १८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)

 • १९०९: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)

 • १९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)

 • १९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)

 • १९२२: हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)

 • १९२८: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१२)

मृत्यू 

 • १८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

 • १९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.

 • १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

 • १९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)