चालू घडामोडी - १९ ऑक्टोबर २०१८

Date : 19 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचं दिल्लीत आगमन :
  • श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे यांचा हा दौरा होत आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मत्रिपाल सिरीसेना यांनी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ वर श्रीलंकन पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, असं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं.

  • मात्र, श्रीलंका सरकारच्या अधिकृत सुत्रांकडून हे चुकीचे वृत्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे विक्रमसिंघे यांच्या या दौऱ्याला वेगळं महत्त्व आहे. दुसरीकडे, ‘रॉ’ वर आपण आरोप केलेले नाहीत. हा खोडसाळपणाचा आणि चुकीचा प्रकार असल्याचं स्वतः सिरीसेना यांनी बुधवारी मोदींना फोन करुन सांगितलं आहे.

  • नियोजित दौऱ्यानुसार विक्रमसिंघे हे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. श्रीलंकेतील जाफना येथे भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये सविस्तर चर्चा होईल अशी माहिती आहे. याशिवाय तामिळ विस्थापितांच्या विषयावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत.

SBI च्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी :
  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.

  • भट्टाचार्य यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

  • अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे ४० वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

भारतात श्रीमंतांची संख्या ७३०० ने वाढली - अहवाल :
  • मुंबई : भारतात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही नेहमीच चिंतेची बाब राहिलेली आहे. याचदरम्यान एक अहवाल आला आहे. जून 2017 ते जून 2018 पर्यंत देशात दहा लाख डॉलर म्हणजे 7.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे. एका अहवालानुसार, भारतात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 3.43 लाखापर्यंत पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे.

  • आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट सुसीचा हा अहवाल आहे. या अहवालानुसार, भारत सर्वाधिक महिला अब्जाधीशांची संख्या (एक अब्ज डॉलर म्हणजेच 73.5 अब्ज रुपये) असणारा देश आहे. या अभ्यासादरम्यान जगातील 18.6 टक्के अब्जाधीश महिला या एकट्या भारतात आहेत, असं आढळून आलं.

  • या अहवालानुसार, जून 2018 पर्यंत देशात 10 लाख डॉलर किंवा त्यापेक्षा अधिकची संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 343000 राहण्याचा अंदाज आहे. गेल्या एका वर्षात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे.

  • नव्या श्रीमंतांमध्ये 3400 जणांची संपत्ती पाच कोटी डॉलर (जवळपास 36.5 कोटी रुपये) आणि 1500 जणांची संपत्ती 10 कोटी डॉलर (जवळपास 73 कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे. या काळात देशाच्या संपत्तीत 2.6 टक्क्यांची वाढ दिसून आली असून एकूण संपत्ती आता सहा हजार अब्ज डॉलर झाली आहे. पण प्रति व्यक्ती संपत्ती 7020 डॉलर एवढीच आहे. कारण, रुपयाची घसरण सुरुच आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचं निधन :
  • नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्य मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचं आज (18 ऑक्टोबर) निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिलेले एन डी तिवारी मागील वर्षी भाजपमध्ये सामील झाले होते.

  • राजकीय प्रवास : एनडी तिवारी 1952 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले. तर 1976 मध्ये त्यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले तर तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. नारायण दत्त तिवारी 1980 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. इंदिरा गांधींनी त्यांना नियोजन मंत्री बनवलं. यानंतर तिवारी यांनी अर्थ, परराष्ट्र यांसारखी खातीही सांभाळली.

  • राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. परंतु ते निवडणूक हरले आणि सत्तेच्या सर्वात मोठ्या खुर्चीजवळ असतानाही तिथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळेच ते काँग्रेसपासून दूर गेले होते. परंतु सोनिया गांधी अध्यक्षा झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

तिवारींची राजकीय कारकीर्द - तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (1976–77, 1984–85, 1988–89)

  • 1986 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री बनले
  • 2002 मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते 2002 पासून 2007 पर्यंत मुख्यमंत्रीही होते.
  • 2007 पासून 2009 पर्यंत आंध्र प्रदेशचे राज्यपालही बनले.
  • 2009 मध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर त्यांन राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर :
  • शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी उत्सवाचा आज समारोप होणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीत येऊन साईचरणी लीन होणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिर्डी विमानतळावर लँड होईल. त्यानंतर सव्वा दहानंतर मोदी साईंच्या दर्शनाला मंदिरात पोहोचलीत. सव्वा अकराच्या सुमारास मोदी जनतेला संबोधणार आहेत.

  • तसेच, राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी 2० हजार लाभार्थ्यांना या कार्यक्रमात घरकुल वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर साडे बाराच्या सुमारास मोदी शिर्डीतून निघतील.

  • पंतप्रधान ज्यावेळी साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येतील, त्यावेळी इतर भविकांनाही दर्शन घेता येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र पंतप्रधान कार्यलयातूनच भाविकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्यात.

  • शिर्डी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचारी असा 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत :
  • नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रम आणि संसदेतील भाषणामुळे ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी शक्यता आहे. तसे संकेत अमेरिकेकडून मोदी सरकारला देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

  • प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आमंत्रण मोदी सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलं आहे. मात्र अमेरिकेच्या संसदेत भाषण करायचं असल्यानं ट्रम्प नोव्हेंबरपासून अतिशय व्यस्त असणार आहेत. या भाषणातून ट्रम्प पुढील वर्षासाठी आखण्यात आलेला अजेंडा संसदेसमोर ठेवतील. याशिवाय सरकारच्या कामगिरीचीदेखील माहिती देतील.

  • त्यामुळे ट्रम्प यांचं भाषण पुढील राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. मात्र 2015 मध्ये संसदेत भाषण द्यायचं असूनही तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. 

  • जानेवारीत ट्रम्प यांचे काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत. मात्र याआधी मोदी आणि ट्रम्प अर्जेंटिनातील जी-20 परिषदेत भेटतील. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयरिसमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण अमेरिकेत होणारी ही पहिलीच जी-20 परिषद असेल. या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात होणारी चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोदींनी त्यांच्या अमेरिकादौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं होतं. 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर 2017 मध्ये अबूधाबीचे राजे सोहळ्याला उपस्थित होते. 

‘या’ शहरात ७५ दिवस साजरा होतो दसरा :
  • दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी दाराला तोरण बांधणे, गोडाधोडाचे जेवण आणि खरेदी हे ठरलेले असते. आता दसऱ्याचा हा सण याच दिवशी साजरा केला जातो हे आपल्याला माहित आहे.

  • पण देशात असेही एक शहर आहे ज्याठिकाणी हा सण एक, दोन नाही तर तब्बल ७५ दिवस साजरा केला जातो. हा सण या शहरात देवी दंतेश्वरीसाठी साजरा करण्याचा प्रघात आहे. छत्तीसगडमधील बस्तर याठिकाणी साधारण अडिच महिने दसरा साजरा होतो. बस्तरमध्ये असलेल्या दंडकारण्यात रामाने वनवासातील बराच काळ घालवल्याने या भागाला विशेष महत्त्व आहे.

  • दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला त्यामुळे याठिकाणी दसरा साजरा होत नाही तर देवी दंतेश्वरीची पूजा केली जाते. या कार्यक्रमाची तयारी जवळपास ७० ते ७५ दिवस आधीपासून सुरु होते. विशेष म्हणजे दसऱ्यानंतरही हे रीतीरिवाज सुरुच राहतात. या काळात याठिकाणी एक दरबारही भरतो. त्यामध्ये बस्तरचे महाराज गावातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर तोडगाही काढतात. यावेळी दसऱ्याच्या दिवशी विशेष रथयात्रा काढली जाते. यामध्ये असणारा रथ उपस्थितांचे विशेष आकर्षण असतो.

  • रथ तयार करण्याची परंपरा ६०० वर्षांपासून सुरु असून केवळ संवरा जमातीचे लोक ते करतात. पण मागच्या काही काळात ही जमात देशातून जवळपास लुप्त झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या जमातीच्या लोकांना हा रथ तयार कराव लागतो. मात्र त्यासाठी या लोकांना आपली जात बदलावी लागते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.

  • १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

  • १९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.

  • १९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

  • १९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.

  • १९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.

  • १९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

  • २०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

  • २००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

जन्म 

  • १९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

  • १९१०: तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

  • १९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

  • १९२५: वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल२००१)

  • १९३६: गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००९)

  • १९५४: रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

मृत्यू 

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)

  • १९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

  • १९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

  • १९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८८७)

  • १९९५  बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.

  • २०११: भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.