चालू घडामोडी - १९ सप्टेंबर २०१८

Date : 19 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशिया चषक : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला :
  • दुबई आशिया चषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल सव्वा वर्षांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीतला भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघ नऊ दिवसांत तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.

  • रोहित शर्माच्या टीम इंडियात आशिया चषक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे. पण यंदा आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून माझी पसंती सरफराझ अहमदच्या पाकिस्तानला आहे, असं भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर यांना वाटतं.

  • टीम इंडिया आणि पाकिस्तान संघामधला आशिया चषकातला साखळी सामना काही तासांवर आलेला असताना संजय मांजरेकर यांनी हे मत व्यक्त केलंय. भारतीय क्रिकेटरसिकांना नक्कीच हिरमुसलं करणार आहे.

  • पाकिस्तानची सध्याची कामगिरी ही चढत्या भाजणीची आहे. त्यात पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे अलिकडच्या काळात संयुक्त अरब अमिरातीतच खेळलं जातं. त्यामुळे दुबई आणि अबुधाबी ही शहरं पाकिस्तान क्रिकेटचं माहेरघर बनली आहेत. योगायोगानं यंदाचा आशिया चषक हा दुबई आणि अबुधाबीतच खेळवण्यात येत आहे. त्यामुळेच आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून टीम इंडियाच्या तुलनेत आपली पसंती ही पाकिस्तानला असल्याचं संजय मांजरेकर सांगतात.

जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन आली ट्रॅकवर, ताशी वेग १४० किलोमीटर :
  • एका मर्यादेबाहेर होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत आहे. वाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. बस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमुळे कमी प्रदूषण  होत असले तरी ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.

  • हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही. या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे. मोबाइल फोन आणि अन्य घरगुती उपकरणांमध्ये ज्या बॅटरी वापरल्या जातात त्याच बॅटरीचा वापर या ट्रेनमध्ये करण्यात आला आहे. अलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन १ हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.

  • डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे. ट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा रविवारपासून जर्मनीमध्ये सुरु झाली आहे. नजीक भविष्यात आणखी अशा १४ ट्रेन चालवण्याची जर्मनीची योजना आहे.

  • ब्रिटन, हॉलंड, डेन्मार्क, नॉर्वे, इटली आणि कॅनडा या देशांकडूनही हायड्रोजन ट्रेनची मागणी नोंदवण्यात आली आहे. डिझेल लोकोमोटीव्ह ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेनची किंमत जास्त आहे. दीर्घकाळाचा विचार केल्यास ही ट्रेन चालवण्यासाठी येणारा खर्च कमी आहे. या एका ट्रेनची किंमत ७० लाख डॉलर आहे. ताशी १४० किलोमीटर वेगाने पळण्यास या ट्रेन सक्षम आहेत.

बँक विलीनीकरणामागचा हेतू काय :
  • भारतीय जनता पार्टी प्रणीत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे विलीनीकरणाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी स्टेट बँक आॅफ इंडियाने पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण केले होते. त्यामुळे पर्यायाने मोठी असलेली स्टेट बँक आणखी महाकाय झाली.

  • त्या खालोखाल पंजाब नॅशनल बँक आहे. विजया बँक, देना बँक आणि बँक आॅफ बडोदा या तिन्ही बँका एकत्रित केल्यानंतर तिसरी मोठी बँक निर्माण होईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र, विलीनीकरणामागे सरकारचा हा हेतू आहे का? असा प्रश्न पडतो.

  • यापूर्वी बँक आॅफ बडोदा ही नफ्यातील बँक असून, गेल्या वर्षी बँकेने नोटा नोंदविला होता, तर विजया बँक गेल्या वर्षी तोट्यातून नफ्यात आली आहे. भविष्यात ही चांगली बँक होऊ पाहतेय. देना बँक ही कमकुवत बँक असल्याचे सर्वश्रुत आहे, पण या बँकेची दोन वैशिष्ट्ये दिसत आहेत.

  • त्यात एक म्हणजे बँकेत जी ठेवी आहे, अर्थात बँकेतील बचत आणि करंट अकाउंचा टक्का सुमारे ४० टक्के आहे. दुसरे तोट्यात जाण्याचे कारण म्हणजे, एकूण कर्ज वाटपापैकी ७६ टक्के कर्जवाटप हे काही मोजक्याच कार्पोरेट कंपन्यांना करण्यात आले होते. ते परत आले नसल्याने बँक पूर्णपणे तोट्यात गेली आणि आरबीआयने बँकेचा कर्ज वाटपाचा अधिकारही काढून घेतला. याचा अर्थ ही बँक सरकारच्या दृष्टीने टाकाऊ होती, पण विजया बँक, बँक आॅफ बडोदा या सुस्थितीत होत्या.

दोनशे अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर अमेरिकेचा कर बडगा :
  • वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २०० अब्ज डॉलर किमतीच्या आयात वस्तूंवर १० टक्के कर लादला असून, वर्षअखेरीस हा कर २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. चीनने या विरोधात उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे.

  • चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असून जगातील या दोन मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत. ट्रम्प यांनी असा आरोप केला, की चीन आपली पक्षपाती व्यापार धोरणे बदलण्यास तयार नाही. नवीन करामुळे अमेरिकी कंपन्यांना चांगली वागणूक मिळेल अशी आशा आहे. या वर्षांत आधी ५० अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर कर लादण्यात आला होता.

  • आता २०० अब्ज डॉलस पर्यंतच्या वस्तूंवर कर लादला आहे. २४ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर १० टक्के कर आकारला जाणार असून तो १ जानेवारीला २५ टक्के करण्यात येईल.

  • अमेरिकेत लोक सुटीच्या दिवसात जी खरेदी करतात त्यात चिनी वस्तूंचे प्रमाण जास्त असते ते आता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर चीनने आमच्या शेतकऱ्यांविरोधात किंवा उद्योगांविरोधात सुडाची कारवाई केली तर आम्ही लगेच आयात कर वाढीचा तिसरा टप्पा राबवून २६७ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर कर लादू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

नऊ जिल्ह्यांना मिळणार पाइपने स्वयंपाकाचा गॅस :
  • मुंबई : राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील २०.५८ लाख कुटुंबांना पाइपने स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियमन मंडळाने (पीएनजीआरबी) त्यासाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. यामुळे या कुटुंबांना एलपीजी सिलिंडरची गरज भासणार नाही. या योजनेत राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

  • देशभरातील ८४ जिल्ह्यांमधील कुटुंबांना स्वयंपाकासाठी पाइपने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणे व त्या जिल्ह्यांमध्ये सीएनजी स्थानके उभी करण्यासाठी पीएनजीआरबीने जुलैमध्ये निविदा काढल्या होत्या. त्याद्वारे कंत्राट जिंकलेल्या कंपन्यांची यादी मंडळाने जाहीर केली आहे.

  • कंत्राट मिळालेल्या तिन्ही कंपन्यांना नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी या जिल्ह्यांमध्ये ७१७१ किलोमीटर इतक्या लांबीची पाइपलाइन टाकायची आहे. त्याखेरीज ३८१ सीएनजी स्थानकेही उभी करायची आहेत. भविष्यात बहुतांश वाहने सीएनआजी इंधनावर आधारित असावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यावेळी वाहनात सीएनजी भरण्यासाठी या स्थानकांचा उपयोग होईल.

  • भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडला अहमदनगर व औरंगाबाद आणि सातारा व सांगली या जिल्ह्यांसाठी संयुक्त कंत्राट मिळाले आहे. महाराष्टÑ नॅचरल गॅस लिमिटेडला धुळे व नाशिक जिल्ह्याला पुरवठा करण्याचे संयुक्त कंत्राटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठ्याचेही कंत्राट मिळाले आहे.

  • युनिसन एन्वायरो प्रायव्हेट लिमिटेडला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या गॅस पुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियमन मंडळाच्या या योजनेत देशभरात ४,३४६ सीएनजी स्थानके उभी होणार असून २.१० कोटी घरांना पाइपने गॅसचा पुरवठा होणार आहे. पीएनजीआरबीने सध्या फक्त कंत्राट जाहीर केले आहे. कामाचे स्वरूप, कालावधी हे त्या-त्या जिल्ह्यानुसार कंपन्यांना देण्यात येणाऱ्या आदेशात नमूद असेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

  • १९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

  • १९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

  • २००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

  • २००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

जन्म

  • १८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

  • १९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

  • १९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

  • १९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

  • १९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

  • १९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

  • १९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

मृत्यू

  • १७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

  • १८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

  • १९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

  • १९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

  • १९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

  • १९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

  • १९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

  • २००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.