चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ सप्टेंबर २०१९

Date : 19 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्या प्रकरणाचा निकाल १७ नोव्हेंबरपूर्वी लागण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर देण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसेच गरज भासल्यास एक तास जास्त सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.

  • अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी 6 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या सुनावणीचा आज 26 वा दिवस आहे. यामध्ये 16 दिवस हिंदू पक्षकारांनी आपली बाजू मांडली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी आतापर्यंत 10 दिवस आपली बाजू माडंली आहे.

  • सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी अयोध्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे किंबहुना तसा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न आहे.

  • सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांचा युक्तिवाद किती दिवसात पूर्ण होईल? अशी विचारणा केली. त्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने युक्तिवादासाठी जास्तीत जास्त एक आठवडा लागेल अशी माहिती दिली. त्यानंतर रामललाच्या वतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी दोन दिवस लागतील, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षकारांनी आपली वेळ निश्चित केल्याने, निकालाची सुनावणी लवकरच पूर्ण होऊ शकेल, असं  स्पष्ट होऊ लागलं आहे.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : अमित, मनीष उपांत्य फेरीत :
  • मित पांघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे.

  • आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा ४-१ असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मनीषने ब्राझीलच्या वाँडरसन डी ऑलिव्हिराचा ५-० धुव्वा उडवला.

  • ९१ किलो गटात इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या संजीतला पराभव पत्करावा लागला. उपांत्य सामन्यात इक्वेडरच्या सातव्या मानांकित ज्युलिओ कॅस्टिलो टोरेसने संजीतला ४-१ असे नामोहरम केले.

  • आतापर्यंत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकाहून अधिक पदक कधीच मिळवलेले नाही. भारताकडून विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिदुरी यांनी कांस्यपदके जिंकली आहेत.

  • द्वितीय मानांकित अमितने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पालमला पराभूत केले होते. सेनादलात कार्यरत असणाऱ्या रोहटकच्या अमितने अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. गेल्या जागतिक स्पर्धेत अमितने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

बेल्जियममध्येही गणेशोत्सवाचा उत्साह :
  • महाराष्ट्रात जितक्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो, तितक्याच उत्साहाने भारताबाहेर स्थायिक झालेली कुटुंबदेखील परदेशात गणेशोत्सव साजरा करतात. उद्योग व्यवसाय अथवा शिक्षणासाठी परदेशात गेलेली मंडळी भारताची संस्कृती तेथे जपण्याचा प्रयत्न करतात. सण-उत्सवाच्या माध्यमातून पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतात.

  • बेल्जियममध्ये स्थायिक झालेल्या अशाच काही भारतीयांनी यावेळचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे सुशोभित पालखीतून वाजत-गाजत आगमन झाले.

  • चिकण मातीपासून बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात आली होती. त्याशिवाय, चिकण मातीपासून गजाननाची मूर्ती कशी घडवावी याची कार्यशाळादेखील घेण्यात आली. बाळगोपाळांनी यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

  • गणेशपूजननानंतर घंटानादात बाप्पाची आरती करण्यात आली. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य, शेरो-शायरी, प्रश्नमंजुषा, लावणी अशा विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी आपल्या कलेचे दर्शन घडविले

  • भारतीय दूतावासातील काऊन्सिलर धीरेंद्रसिंग गॅब्रियल कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते

जेएनयूत पुन्हा ‘लाल सलाम’, महाराष्ट्राच्या तरुणाने उमटवला ठसा :
  • दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्यांचीच सत्ता आली असून एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ, डीएसएफ या डाव्या संयुक्त आघाडीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागांवर विजयी पताका फडकावली. राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या जेएनयूमधील या निवडणुकीत डावे विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अशा या दुरंगी लढतीने विद्यापीठ आवारातील वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले होते.

  • या निवडणुकीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय)च्या आइशी घोषची अध्यक्षपदी निवड झाली. मूळ पश्चिम बंगालच्या आइशीला २३१३ मते मिळाली, आईशीने अभाविपच्या मनीष जांगीडचा पराभव केला. मनीषला ११२८ मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्राच्या एका तरुणानेही आपली छाप सोडली. मूळ नागपूरच्या साकेत मून याची उपाध्यक्षपदी निवड झाली. डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन(डीएसएफ)च्या साकेतने अभाविपच्या श्रुती अग्निहोत्रीचा पराभव केला. साकेतला सर्वाधिक ३३६५ मते मिळाली. श्रुतीपेक्षा दुप्पटीहून अधिक मते मिळवत साकेतने विजय मिळवला.

  • ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (एआयएसएफ) सतिश चंद्र यादवची सचिवपदी निवड झाली. सतिशला २५१८ मते मिळाली. तर, ३२९५ मते मिळवून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएसएफ) मोहम्मद दानिशने सहसचिवपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच ‘लाल सलाम’च्या घोषणा देत डाव्या संयुक्त आघाडीने विद्यापीठ परिसर दणाणून सोडला होता.यापूर्वी विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यापीठाला निकाल राखून ठेवण्यास सांगितलं होतं. नंतर, सहा सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने निकाल घोषीत करण्याची परवानगी दिली, त्यानंतर निकालांची घोषणा करण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

  • १९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

  • १९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

  • १९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

  • २००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

  • २००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

जन्म 

  • १५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

  • १८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

  • १९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

  • १९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

  • १९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

  • १९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

  • १९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

  • १९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

  • १९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

  • १७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

  • १८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

  • १९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

  • १९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

  • १९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ - ड्युनेडिन, न्यूझीलंड)

  • १९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

  • १९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

  • १९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

  • २००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

  • २००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

  • २००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.