चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० एप्रिल २०१९

Date : 20 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अध्यक्षीय निवडणुकीतील हस्तक्षेपप्रकरणी ट्रम्प पुराव्याअभावी निर्दोष :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपाबाबत दोन वर्षे करण्यात आलेल्या चौकशीअंती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निर्दोष ठरवण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता विल्यम बार यांनी गुरुवारी दिली आहे. ट्रम्प यांची  प्रचार यंत्रणा व रशिया सरकार यांच्यात कुठलेही साटेलोटे नव्हते, किंबहुना त्याबाबत पुरावे सापडलेले नाहीत, असे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या रॉबर्ट म्युलर यांच्या चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे.

  • गुरुवारी या चौकशी अहवालातील काही भाग जाहीर करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, रशियन सरकारने अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, पण रशियाच्या हस्तकांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांना अध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या प्रचार मोहिमेतील वरिष्ठ अधिकारी यांनी सहकार्य केले नाही. या प्रकरणी चौकशी करण्याकरिता अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या कार्यालयातील वकील म्युलर यांना  उप महाधिवक्ता रॉड रोसेनस्टेन यांनी नेमल्याचे मे २०१७ मध्ये एफबीआय संचालकपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना समजले होते त्यावेळी सेशन्स यांच्या कार्यालयातील प्रमुख जॉडी हंट व व्हाइट हाउसचे वकील डॉनमॅकगन उपस्थित होते असे सीएनएनने म्हटले आहे.

  • चौकशीची बातमी समजताच अध्यक्ष ट्रम्प हे खुर्चीत मागे रेलून बसत असे म्हणाले होते की, हे तर फार भयानक आहे, हा माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अंत आहे.  ट्रम्प खूप संतापले होते व रशियाच्या हस्तक्षेपाबाबत चौकशीतून सेशन्स यांनी माघार घेतल्याने ते भडकले. जेफ तुम्ही असे कसे होऊ दिलेत. तुम्ही माझे रक्षण कराल असे वाटले होते. त्यानंतर त्यांनी सेशन्स यांना राजीनामा देण्यास सांगितले त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे राजीनामा पत्र ट्रम्प यांनी खिशात ठेवले व तुम्ही महाधिवक्ता पदावर राहण्यास तयार आहात का असे अनेकदा विचारले.  त्यावर ते तुम्हीच ठरवा असे उत्तर सेशन्स यांनी दिले होते. सेशन्स त्या पदावर राहू शकले असते पण नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांची ट्रम्प यांनी हकालपट्टी केली.

मालीच्या पंतप्रधानांचा राजीनामा :
  • बमाको : वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला. राष्टÑाध्यक्ष इब्राहिम बुबकर किटा यांनी मॅगा सरकारचा राजीनामा स्वीकृत केला आहे.

  • सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे खासदार बुधवारी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. मॅगा आणि त्यांचे सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप खासदारांनी केला. लवकरच नवीन पंतप्रधान नियुक्त करून नवीन सरकार स्थापन केले जाईल.

  • नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स विधेयकाची तलवार बांगलादेशी स्थलांतरितांच्या डोक्यावर असल्यामुळे मुस्लिम मते ही तृणमूल काँग्रेस उमेदवाराला एकगठ्ठा मिळू शकतील. पर्यायाने अभिजित मुखर्जींच्या अडचणी वाढल्या आहेत.

ऑक्सफर्डमध्येे रंगणार OMPEGचा तृतीय वर्धापनदिन :
  • यूकेतल्या काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ओएमपीईजी संस्थेला यंदा तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 27 एप्रिलला ऑक्सफर्डमध्ये शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १७५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संप्पन होणार आहे.

  • गतवर्षीच्या कार्याचा आढावा, उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि व्यवसायव्रुद्धीेत भरीव काम केलेल्या सदस्यांचा सत्कार, पुढील उपक्रम, भेटीगाठी, व्यावसायिक देवाणघेवाण, समविचारी सदस्यांमध्ये नवीन उपक्रम अशा वैविध्याने हा सोहळा रंगणार आहे.

  • मराठी व्यवसाय विश्वात ओएमपीईजीचं नाव आदराने घेतलं जातं. महाराष्ट्रीयन समाज इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून वास्तव्य करून आहे. हा समाज सांस्कृतिक, समाजपयोगी कार्यामध्ये १९३२ पासून कार्यरत आहे. व्यवसाय वृद्धीसाठी OMPEG गेली ३ वर्षे कार्यरत आहे.

  • व्यवसाय वृद्धीसाठी संस्था सुरु झाल्यापासून गेली ३ वर्षे सातत्याने इंग्लंडमधील स्थायिक महाराष्ट्रीयन मंडळींना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणे, व्यवसायाच्या वृद्धीसाठी मार्गदर्शन आणि मदत करणे, अनेक नवीन व्यवसायांना विविध उपक्रमांमधून व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे सर्व उपक्रम OMPEG ने शक्य करून दाखवले आहेत. जागतिक स्तरावर महाराष्ट्रीयन मंडळींसाठी व्यवसायवृत्ती वृद्धिंगत करण्यास सक्रियपणे काम करणारी अशी ही संस्था आहे.

  • संस्थेचे १२५ पेक्षा जास्त वर्गणीदार सदस्य आहेत. या मध्ये २५ % महिलांचा समावेश आहे. विषेश म्हणजे सर्व महिला सदस्य व्यवसाय करत आहेत. गेल्या ३ वर्षात संस्थेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन ३० पेक्षा अधिक कार्यशाळा आणि विविध चर्चासत्रे आयोजित केली. या विविध कार्यक्रमाद्वारे अंदाजे १००० महाराष्ट्रीयन मंडळी या संस्थेशी जोडली गेली आहेत.

बालाकोट कारवाईत पाकिस्तानी नागरिक मारले न जाण्याची दक्षता घेतली - स्वराज :
  • अहमदाबाद : फेब्रुवारीत बालाकोट येथे दहशतवादी छावणीवरील हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेलेला नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

  • भाजप महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वराज यांनी  सांगितले, की पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने लष्कराला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी मोकळीक दिली होती. त्यातून लष्कराने बालाकोट येथे हल्ला केला. त्यात एकही पाकिस्तानी नागरिक व सैनिक ठार झालेला नाही.

  • पाकिस्तानी लष्करावर ओरखडाही उमटलेला नाही. आम्ही लष्कराला स्वसंरक्षणार्थ कारवाईसाठी मोकळीक दिली पण पाकिस्तानी नागरिक व जवान ठार मारले जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले होते.

  • त्या पुढे म्हणाल्या की,  पुलवामात चाळीस जवानांचा बळी घेणाऱ्या जैशच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यास आम्ही मुभा दिली होती. त्यातूनच लष्कराने बालाकोट येथे जैशचा तळ उद्ध्वस्त केला. भारताने स्वसंरक्षणार्थ हवाई हल्ले केले. तशी कल्पना आंतरराष्ट्रीय समुदायास देण्यात आली होती. सगळा आंतरराष्ट्रीय समुदाय भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांत पाठीशी होता

नव्या पिढीतील मतदार राजासाठी ‘फ्लिपकार्ट’चा जागर :
  • मुंबई : फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्समंचाने भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम राबविली आहे.

  • नव्या मतदारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट आपल्या नवीन चित्रफितीद्वारे करत असून मतदान केल्यानंतर काय घडते, याबाबत प्रेक्षकांना जागरुकदेखील करत आहे.

  • समानतेच्या दिवसाबद्दल मत मांडताना, फ्लिपकार्टचे नाममुद्रा विपणन संचालक अपूर्व सेठी यांनी सांगितले की, सामाजिकदृष्टय़ा संबंधित विषयावर प्रभाव टाकणारा संवाद निर्माण करण्यासाठी आम्ही फ्लिपकार्ट समूहात नेहमीच प्रयत्नशील असतो. यापूर्वी लैंगिक समानतेच्या मुद्दय़ाला आम्ही पाठबळ दिले होते.

  • तर आता देशाच्या लोकशाहीतच समाविष्ट असलेल्या नवीन समानतेच्या कथेमध्ये गुंतवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून, ग्राहकांशी आम्हाला जोडण्याची, मतभेद विसरून एकत्र येण्याची वेळ म्हणून निवडणुकांकडे पाहण्यासाठी गरज असल्याचे आम्हाला वाटते.

  • मतदानाच्या समान अधिकारानुसार, मतदानाच्या दिवशी कोणाही व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसतो, यावर फ्लिपकार्टने या मोहिमेद्वारे भर दिला असल्याचे सांगण्यात आले.

‘११२’ एकल आपत्कालीन मदत क्रमांकाला २० राज्यांची स्वीकृती :
  • नवी दिल्ली : संकटाच्या वेळी मदत मिळविण्यासाठी संपूर्ण भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे. संकटात असलेला कोणीही या क्रमांकावर फोन करून मदत मागवू शकतो.

  • ११२ हा मदत क्रमांक पोलीस (१00), अग्निशामक दल (१0१) आणि महिला मदत केंद्र (१0९0) या सर्व सेवांना एकत्रितरीत्या सामावून घेतो. या एकाच क्रमांकावरून तिन्ही सेवांची मदत घेतली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

  • अमेरिकेतील ९११ या आपत्कालीन क्रमांकाच्या धर्तीवर भारत सरकारने ११२ हा क्रमांक सुरू केला आहे. संपूर्ण अमेरिकेत कुठल्याही प्रकारच्या संकटात असलेली व्यक्ती ९११ या क्रमांकावर फोन करून मदत मागू शकते.

  • गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ११२ हा क्रमांक स्वीकारणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, दादर व नगर हवेली, दमन व दीव जम्मू व काश्मीर आणि नागालँड यांचा समावेश आहे.

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट, १०० वैमानिकांसह शेकडो कर्मचाऱ्यांना दिली नोकरी :
  • मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मात्र आता जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट धावून आलं आहे. जेट एअरवेजच्या 100 वैमानिकांसह 500 कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटने नोकरी दिली आहे. भविष्यात देखील जेटच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची तयारी असल्याचे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.

  • स्पाईसजेट कंपनी येणाऱ्या काळात अधिक विमानं आणि नव्या मार्गांवर सेवा सुरु करणार आहे. या कंपनीने २७ नवी विमानं येणार असल्याचं सांगितलं आहे. जेट एअरवेजने सेवा बंद झाल्यानंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सेवांची संख्या कमी झाली आहे. ही क्षमता भरून काढण्यासाठी स्पाईसजेट काम करणार असल्याचे सांगितले आहे.

  • स्पाईसजेटच्या भरतीमध्ये जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले.

  • बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. यामुळे जेट एअरवेज कर्मचाऱ्यांचा जेट एअरवेजच्या ऑफिसबाहेर आंदोलन देखील केले होते. 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.   यामुळे हजारो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.

  • जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने 17 एप्रिलच्या रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद करण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

  • १९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

  • १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

  • २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या  इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.

जन्म 

  • १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

  • १८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)

  • १८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल१९४५)

  • १८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

  • १९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)

  • १९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)

  • १९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

  • १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)

  • १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

  • १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.