चालू घडामोडी - २० ऑगस्ट २०१८

Date : 20 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेमबाज दीपक कुमारला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एक पदक :
  • जकार्ता  - भारताच्या दीपक कुमारने 10 मीटर एअर रायफल पुरूष गटात रौप्यपदकाची कमाई केली. मात्र रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

  • आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध विजयी सुरूवात केली आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिली एकेरीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर 21-18, 21-19 असा विजय साजरा करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे. 

  • - #SepakTakraw सापेकटक्रावमध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात इराणवर 21-16, 19-21, 21-17 असा विजय मिळवला.

  • दुहेरीत सारा सुनील आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभप पत्करावा लागल्याने जपानने सामन्यात 1-1 असे पुनरागमन केले आहे. जपानच्या सयाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी 21-15, 21-6 असा सहज विजय मिळवला. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७४वी जयंती, दिग्गजांनी वाहिली आदरांजली :
  • नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत हे यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.  1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. (राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडता येणार नाही; केंद्र सरकारची भूमिका)

  • राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी  महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.

यूपीएससी न देताच केंद्रात नोकरी, १० पदांसाठी सहा हजार अर्ज :
  • केंद्र सरकारकडून खासगी क्षेत्रातील व्यक्तींसाठी सहसचिव पदाच्या १० जागांसाठी तब्बल ६००० हून अधिक अर्ज आले आहेत. सरकारने खासगी क्षेत्रातील योग्य व्यक्तीला संधी देण्याच्या उद्देशाने या पदांसाठी अर्ज मागवले होते. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने ‘लॅटरल एंट्री’ अंतर्गत सहसचिव पदाच्या १० जागांवर नियुक्तीची घोषणा केली होती. या अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचारी करारातंर्गत सरकारशी जोडले जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६,०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • महसूल, आर्थिक सेवा, अर्थ व्यवहार, कृषी, शेतकरी हित, रस्ते आणि परिवहन, जहाज व बंदरे, पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन, अपारंपारिक ऊर्जा, विमान आणि वाणिज्य विभागात सहसचिव पदाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही ३० जुलै होती.

  • एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्ज छाननी करण्याचे काम सुरू केले आहे. सामान्यपणे सहसचिव पदासाठी यूपीएससीद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस नियुक्त केले जातात. मनमोहन सिंग सरकारच्या काळात योजना आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले माँटेकसिंग अहलुवालिया यांचीही ‘लॅटरल एंट्री’ द्वारेच नियुक्ती करण्यात आली होती. अशा नियुक्तींमुळे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर चुकीचा प्रभाव पडणार नाही, अशी ग्वाही सरकारने गेल्या महिन्यात संसदेत दिली होती.

  • यापूर्वी मनमोहन सिंग, माँटेकसिंग अहलुवालिया, विजय केळकर, विमल जालान, शंकर आचार्य, राकेश मोहन, अरविंद वीरमणी, अरविंद पनगडिया, अरविंद सुब्रमण्यम आणि वैद्य राजेश कटोच यांचीही अशीच नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली होती. या माध्यमातून नवीन प्रतिभेला संधी देणे आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने ‘लॅटरल एंट्री’ अंतर्गत नियुक्ती करणार असल्याचे ते म्हणाले.

इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात २१ जणांचा समावेश :
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २१ सदस्यांचे मंत्रिमंडळ जाहीर केले असून त्यातील अनेकांनी माजी अध्यक्ष मुशर्रफ यांच्या काळात महत्त्वाची पदे भूषवली होती. २१ नावे त्यांनी जाहीर केली असून त्यातील १६ मंत्री तर पाच जण सल्लागार असतील, अशी माहिती पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी सांगितले.

  • इम्रानखान यांचा देशाचे बाविसावे पंतप्रधान म्हणून शनिवारी शपथविधी झाला. चौधरी यांनी ट्विटरवर मंत्र्यांची यादी टाकली असून त्यात शहा महमूद कुरेशी यांना परराष्ट्रमंत्रिपद देण्यात आले. कुरेशी हे पक्षाचे उपाध्यक्ष असून ते २००८ ते २०११ दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. त्या वेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. मुंबईत हल्ला झाला त्या वेळी ते दिल्लीत होते. परवेझ खट्टक यांना संरक्षणमंत्री करण्यात आले असून असाद उमर हे अर्थमंत्री झाले आहेत.

  • खट्टक यांनी २०१३ -१८ दरम्यान खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. असाद उमर हे माजी लेफ्टनंट जनरल महंमद उमर यांचे पुत्र असून जनरल उमर हे १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी लष्करात सहभागी होते. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी अध्यक्षीय प्रासादात उद्या होणार आहे. यातील बारा जणांनी मुशरफ यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. मुशर्रफ यांचे माजी प्रवक्ते, वकील व अनेक  सदस्य या मंत्रिमंडळात आहेत.

  • मुशर्रफ यांच्या काळात काम केलेले फरोग नसीम, तारिक बशीर चिमा, गुलाम सरवर खान, झुबैदा जलाल, फवाद चौधरी, शेख रशीद अहमद, खालीद मकबूल सिद्दीकी, शफकत मेहमूद, मखदूम  खुस्रे बख्तियार, अब्दुल रझाक दाऊद, डॉ. इशरत हुसेन व अमीन असलम यांचा त्यात समावेश आहे. कुरेशी व खट्टक यांच्यासह पाच कॅबिनेट मंत्री हे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमधील आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी :
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून भारत सरकारने परत आणाव्यात, असे आवाहन त्यांच्या कन्या अनिता बोस-पाफ यांनी केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवान येथे १८ ऑगस्ट १९४५ रोजी मृत्यू  झाला होता. त्यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात सप्टेंबर १९४५ पासून पडून आहेत. अनिता बोस म्हणाल्या, की नेताजींच्या ७३ व्या स्मृतिदिनी मी त्यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन पुन्हा एकदा करीत आहे.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात परत येण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे किमान त्यांच्या अस्थी तरी स्वतंत्र भारतात आणाव्यात. माझे वडील हे हिंदू होते, त्यामुळे परंपरेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत करणे आवश्यक आहे. हिरोजी हिराबायाशी हे टोकियोतील जपान भारत असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  • हिराबायाशी हे जपानचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनी सांगितले, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या असून त्याबाबत भारताकडून अधिकृत विनंतीची गरज आहे. रेणकोजी मंदिरात काल नेताजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी तैपेईतील विमान अपघातात मरण पावले व नंतर त्यांच्या अस्थी टोकियोत आणण्यात आल्या. त्याचे काही पुरावे आशिष राय यांच्या अलिकडील पुस्तकात आले आहेत.

  • ‘लेड टू रेस्ट-द  कन्ट्रोव्हर्सी ओव्हर सुभाष चंद्र बोस डेथ’ या रोली बुक्सने प्रसिद्ध केलेल्या अनिता बोस यांच्या पुस्तकात म्हटले आहे, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अवशेषांच्या ज्या डीएनए चाचण्या  केल्या तर त्यातून सर्व काही स्पष्ट होईल. १९७९ मध्ये नेताजी ज्या विमान अपघातात मृत्यू पावले, त्यात वाचलेल्या एका व्यक्तीची मुलाखत प्रा. लिओनार्ड गॉर्डन यांनी टोकियोत घेतली होती, तेव्हा मी उपस्थित होते. त्यातून नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे स्पष्ट झाले, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे.

शाळेच्या अभ्यासक्रमात अटल बिहारी वाजपेयींचा धडा :
  • देशाचे माजी पंतप्रधान तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले. अटलजींची राजकीय तसेच साहित्यिक कारकिर्द दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या याच कार्याची ओळख येणाऱ्या पिढीला व्हावी यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा धडा अभ्यासक्रमात असावा यादृष्टीने मध्यप्रदेश शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. येथील शाळांच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी याबाबतची माहिती दिली.

  • अटलजींचे कार्य हे देशापुरतेच स्तिमित नव्हते तर त्यांची महती जगभरात होती. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या कथांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला जातो. त्याअंतर्गत अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार असल्याचे देवनानी यांनी सांगितले. आधुनिक भारतात अटलजी यांच्यासारखा दुसरा राजकीय नेता नाही. त्यांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रांचा पाठ्यपुस्तकात सहभाग करणे हीच खरी त्यांना शिक्षण विभागाची श्रद्धांजली ठरेल, असंही ते म्हणाले.

  • अद्याप कोणत्या इयत्तेसाठी हा धडा असेल याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या धड्यात अटलजींचे बालपण, त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय, आणीबाणी, कारगील युद्ध यासंदर्भातील माहिती देण्यात येईल. याआधीही अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावर उत्तम कार्य केलेल्या लोकांच्या जीवनपटाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. आता त्यामध्ये अटलजींच्या धड्याची भर पडेल. यानिमित्ताने मध्यप्रदेशातील मुलांना अटलजींची ओळख होईल.

दिनविशेष :
  • जागतिक मच्छर दिन / भारतीय अक्षय ऊर्जा दिन

महत्वाच्च्या घटना

  • १६६६  शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

  • १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

  • १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

  • १९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

  • १९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

  • १९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.

  • १९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.

  • २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.

जन्म

  • १७७९: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)

  • १८३३: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९०१)

  • १८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)

  • १९४०: भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.

  • १९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)

  • १९४४: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)

  • १९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)

  • १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)

  • १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)

  • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.

  • १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)

  • २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.

  • २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.

  • २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)

  • २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.

  • २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)

  • २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.