चालू घडामोडी - २० डिसेंबर २०१७

Date : 20 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा राजीनामा :
  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी 19 डिसेंबर रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना आता वेग येणार आहे.

  • नवे सरकार स्थापन होईपर्यंत सिंह आणि त्यांचे मंत्रिमंडळ काळजीवाहू म्हणून कार्यरत राहील. विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधी लाट आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या कॉँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

  • 68 जणांच्या विधानसभेत कॉँग्रेसला जेमतेम 21 जागा मिळाल्या. भाजपने 44 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. माकपला एक, तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

  • हिमाचल प्रदेशातील शाही कुटुंबात जन्मलेले वीरभद्र सिंह 83 वर्षांचे असून, त्यांनी अर्की विधानसभा मतदारसंघातून 6 हजार 51 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. त्यांनी भाजप उमेदवार रतनसिंह पाल यांना पराभूत केले.

गुजरातमध्ये २५ डिसेंबरला भाजपाचं नवीन सरकार शपथ घेण्याची शक्यता :
  • अहमदाबाद- गुजरातमध्ये भाजपाचं नवीन सरकार 25 डिसेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपातील सुत्रांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नावं निश्चित करावं? याबद्दलची चर्चा सध्या भाजपामध्ये सुरू आहे.

  • सुत्रांच्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी गुजरातचे नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असतो. तसंच 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

  • भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातची निवडणूक भाजपा, मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उप-मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्त्वात लढेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, असं जाहीर केलं होतं. सुत्रांच्या मते, यावेळी भाजपाला मिळालेल्या विजयात कमी अंतर असल्या कारणाने पक्ष नेतृत्व मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर विचार करू शकतात

  • भाजपाने यावेळी गुजरातमध्ये माझ्या चेहऱ्याबरोबर निवडणुक लढविली. पण मुख्यमंत्रिपदाबद्दलचा अंतिम निर्णय संसदीय बोर्डाकडूनच केला जाईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार ? या पत्रकारांच्या प्रश्नावर विजय रूपाणी यांनी उत्तर दिलं आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला 99 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या.

जगातील स्थलांतरितांत भारत प्रथम :
  • परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण 1.7 कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

  • मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या 0.6 ते 1.1 कोटी आहे, असे 2017 च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे 1.3 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.

  • रशियाचे 1.1 कोटी, चीनचे 1 कोटी, बांगलादेशचे 0.7 कोटी, सीरियाचे 0.7 कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी 0.6 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.

  • सध्या जगात 2.58 कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. 2000 पासून 49 टक्के वाढले आहे.

रायगड प्राधिकरण अध्यक्षपदी संभाजीराजे छत्रपती :
  • किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी आदर्श ठरावा व त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

  • खासदार संभाजीराजे यांनी 6 जूनला दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा करणे सुरू केले. हा सोहळा पुढे लोकोत्सव बनला. खासदार संभाजीराजे यांनी रायगडचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती. रायगडावर 2016 च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगड संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती.

अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती
  • वॉशिंग्टन - अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

  • चीनच्या वन बेल्ट वन रोड आणि चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र विचारात घेऊन ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, चीनचा वाढता प्रभाव पाहता एनएसएसचद्वारे दक्षिण आशियाई देशातील आपली अखंडता कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल. 

  • एनएसएसमध्ये दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्ष धोरण जाहीर केले आहे. आम्ही भारताच्या एक वैश्विक शक्ती आणि भक्कम रणनीतिक व संरक्षण सहकारी म्हणून झालेल्या उदयाचे स्वागत करतो.

  • आम्ही संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेचा मोठा सहकारी असलेल्या भारताशी असलेले आपले संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवू. तसेच संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भारताच्या वाढत असलेल्या संबंधाना सहकार्य करू.  

महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी  चीनला पुन्हा आली डोकलामची आठवण :
  • बीजिंग - भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आल्याने निर्माण झालेला डोकलाम विवाद मिटून आता चार महिने उलटले आहे. मात्र या प्रकरणात भारताच्या पवित्र्यामुळे झालेली कोंडी चीनला अद्याप विसरता आलेली नाही. त्यामुळे डोकलाम विवादाची खपली काढून या वादाची आठवण कायम ठेवण्याच प्रयत्न चीनकडून करण्यात येत असतो.

  • आताही भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चीनला डोकलाम विवादाची आठवण आली आहे. डोकलाम विवाद हा भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांची कसोटी होती. त्यातून आपल्याला धडा शिकला पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यापासून वाचता येईल, असे चीनने म्हटले आहे.

  • चीनने हे वक्तव्य भारत आणि चीनमधील सीमाविवादासंदर्भात होणाऱ्या 20व्या फेरीतील बैठकीपूर्वी केले आहे. ही बैठक भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे स्टेट कांउन्सिलर यांग जेची यांच्यात ही बैठक होणार आहे.  

  • मात्र 22 डिसेंबरला होणाऱ्या या बैठकीबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला डोकलाम विवाद 78 दिवस चाललेल्या तणावानंतर 28 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता. आता 22 डिसेंबरला चर्चा झाल्यास डोकलाम विवाद संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्न सोडवण्यासाठी झालेली ती पहिली अधिकृत बैठक ठरेल. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

  • १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.

  • १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

  • १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.

  • १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

  • २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी१९३८)

  • १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६७)

  • १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)

  • १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)

  • १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.

  • १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)

मृत्यू

  • १७३१: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन. (जन्म: ४ मे १६४९)

  • १९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)

  • १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन. (जन्म: २२ मे१८७१)

  • १९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)

  • १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)

  • १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.

  • १९९६: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर१९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.)

  • १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)

  • १९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

  • २००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)

  • २०१०: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)

  • २०१०: लेखक सुभाष भेंडे यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.